प्रकार

Tuesday, April 03, 2012

तिच्या बुडण्याचे शतसांवत्सरिक

ते त्या काळी पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. जहाजात जलाभेद्य कक्ष असल्याने ते कधीच बुडणार नाही अशी त्याची ख्याती होती. ७५ हजार टन वजनाचे हे पोलादी जहाज भक्कम बांधणीचे होते. या जहाजावर १९ जलाभेद्य कक्ष होते आणि संकटसमयी किंवा अपघातात त्यातील ९ कक्ष पाण्याने भरले तरी हे जहाज पाण्यावर तरंगण्याची क्षमता राखून होते. अमेरिकेकडून इंग्लंडकडे त्याचा पहिला प्रवास चालला होता. या विलासी जहाजावर श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश होता.

न्यू यॉर्कवरून यात्रा सुरू करून एप्रिलच्या महिन्यात हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये प्रवासात होते. त्या भागात समुद्र बर्फाळ होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं. अशा या धोकादायी वातावरणात अचानक मध्यरात्रीच्या सुमारास जहाजाची टक्कर हिमनगाशी झाली आणि हिमनगामुळे जहाजाची उजवी बाजू (स्टारबोर्ड) चिरत गेले. जहाजात पाणी शिरू लागलं. ३००० प्रवाशांनी खच्चून भरलेल्या जहाजावर केवळ २४ लाइफबोटी होत्या. त्यावेळच्या कायद्यानुसार अशा आकाराच्या जहाजांवर किमान २४ लाइफबोटी लागत पण खच्चून भरलेल्या या जहाजावर २४ ही संख्या फारच कमी होती.

टक्कर झाल्यावर जहाजात पाणी घुसू लागले आणि जहाज पाण्याखाली जाऊ लागले. जहाजातील बायका मुलांना लाइफबोटींवर चढवण्यात आले पण तरीही जहाजावरले अर्धेअधिक प्रवासी गारठलेल्या समुद्रात बुडून मेले. समुद्राने दया दाखवली नाही.

ही प्रसिद्ध गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित आहे पण कदाचित काही चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल की ही कथा "टायटॅनिकची" नाही. टायटॅनिक हे जहाज अमेरिकेतून इंग्लंडकडे जात नव्हते तर ते इंग्लंडहून निघून अमेरिकेतील न्यू यॉर्क सिटीकडे चालले होते आणि या प्रचंड जहाजावर वर म्हटल्याप्रमाणे अवघ्या २४ लाइफबोटीही नव्हत्या!

वर दिलेली ही घटना सत्य नसून एक कल्पितकथा आहे. बरील कथानक फ्युटिलिटी: ऑर द रेक ऑफ टायटन या १८९८ मध्ये मॉर्गन रॉबर्टसनने लिहिलेल्या दीर्घकथेतील टायटन या जहाजाच्या अपघाताबद्दल आहे. टायटॅनिक या जहाजाचा अपघात होण्यापूर्वी सुमारे १४ वर्षे आधी प्रकाशित झालेल्या या दीर्घकथेत आणि टायटॅनिकच्या गोष्टीत काही महत्त्वाची साम्यस्थळे आहेत.

विशेषतः जहाजांच्या नावांतील सारखेपणा, त्यांची जलाभेद्यतेबद्दल प्रसिद्धी, मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर अटलांटिकमध्ये हिमनगाशी टक्कर होणे, जहाजावर लाइफबोटींची कमतरता असणे, जहाजावरील प्रवाशांची अदमासे संख्या वगैरे योगायोग विशेष वाटतात. अन्यथा, दीर्घकथा म्हणून ही एक अतिसामान्य कथा आहे आणि टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघाताशी मेळ न खाणारे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणारे अनेक प्रसंग कथानकात आहेत.

तरीही या सामान्य कथानकाला टायटॅनिकच्या अपघाताशी असणाऱ्या असामान्य साम्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचे मूळ कारण अर्थातच १५ एप्रिलला झालेला टायटॅनिकचा अपघात हे होते. या दुर्दैवी अपघाताला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव उपक्रमावर हा धागा सुरू करणे अपरिहार्य वाटले.


प्रवासी वाहनांना जे अनेक अपघात झाले आहेत त्यात टायटॅनिक आपले नावामागचे प्रसिद्धीचे वलय राखून आहे. इतिहासात टायटॅनिकपेक्षा मोठ्या जहाजांना अपघात घडलेले आहेत आणि टायटॅनिकपेक्षा मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झालेली आहे; पण मग या अपघातात विशेष असे काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे देता येतील.

  • युद्धकालीन परिस्थिती नसताना; टायटॅनिकचा अपघात हा पहिल्या महायुद्धा आधी घडलेला आहे हे लक्षात घेतल्यास इतक्या मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याचे हे महत्त्वाचे उदाहरण आहे. टायटॅनिकच्या अपघातात दीड हजारांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. यांत अनेक बायका आणि लहान मुलांचा समावेश होता. अर्ध्याहून अधिक लोकांची प्रेतेही हाताला लागली नाहीत.
  • हजारोंच्या संख्येने प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असताना केवळ २० लाइफबोटी जहाजावर असणे हा व्यवस्थापनाच्या हलगर्जीचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवता यावे. या घटनेनंतर जहाजांवर किमान लाइफबोटी आणि संरक्षक साधनांविषयी नियम कडक करण्यात आले.
  • टायटॅनिकचा प्रवास महागडा होता. १९१२ साली टायटॅनिकमधून पहिल्या वर्गाच्या प्रवासासाठी ४००० डॉ. च्या वर किंमत मोजावी लागत होती. टायटॅनिक हे सुखदायी प्रवासासाठीच बांधलेले जहाज होते. इलेक्ट्रिसिटी, उबदार वातावरण, गरम पाण्याचा तरण तलाव, तुर्की अंघोळ, व्यायामशाळा, बँड रुम वगैरे अनेक सोयी या "लक्झरी लायनर"वर होत्या.
  • आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "आढ्यता". हे जहाज कधीच बुडणार नाही अशी प्रसिद्धी जहाज बांधताना करण्यात आली होती पण निसर्गाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रचंड महागडे जहाज आपल्या पहिल्या प्रवासातच समुद्राने गिळंकृत केले. या निमित्ताने जहाजबांधणी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाकडे, बांधल्या जाणाऱ्या जहाजांकडे बारकाईने पाहण्याची उपरती झाली. किंबहुना, टायटॅनिकच्या अपघाताची नोंद जागतिक जलवाहतूकीने गांभीर्याने घेतली. यांत इंटरनॅशनल आईस पॅट्रोलची स्थापनेचा समावेश आहे.

या शिवायही अनेक कारणे येथे देता येतील. लोकांना एखाद्या घटने सभोवती कथानक निर्माण करून तिला प्रसिद्धी देण्याची सवय असते, त्या कथानकात टायटॅनिक चपखल बसत होती. समुद्रावरील खलाशांच्या अंधश्रद्धा, टायटॅनिकच्या प्रवाशांनी अपघाताला धैर्याने दिलेले तोंड, अपघातातून वाचलेल्यांचे अनुभव, निसर्गापुढे माणूस थिटा आहे ही श्रद्धावंतांनी केलेली कारणमीमांसा, किंवा श्रीमंत आणि गरीब असे जहाजात वर्ग असले तरी निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो ही नीतिकथा, अशा अनेक कारणांमुळे इतिहासात टायटॅनिक अजरामर झाली. तिच्यासोबत अनेक कथांना आणि आख्यायिकांनाही प्रसिद्धी लाभली. यापैकी मला आवडणारी कथा/ आख्यायिका टायटॅनिकच्या बँडबद्दल आहे.

--------

टायटॅनिकवर आठजणांचा चमू बँड वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत होता. जहाजाची हिमनगाशी टक्कर होऊन संकटाची वेळ आली तेव्हाही हा चमू लोकांमध्ये घबराट उडू नये आणि त्यांचे चित्त ठिकाणावर राहावे म्हणून वाद्ये वाजवत होता. असं सांगितलं जातं की या बँडचा प्रमुख वॉलेस हार्टली याने जहाजाला झालेला अपघात आणि लाइफबोटवर माणसांना चढवण्याची लगबग लक्षात घेऊन आठजणांच्या आपल्या चमूला जहाजाच्या पहिल्या वर्गाच्या आरामकक्षात (लाउंज) गोळा केले. तेथेच लाइफजॅकेटस घालून अनेक प्रवासी गोळा झाले होते आणि आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत होते. त्या परिस्थितीत आपला गणवेश घालून आठजणांचा हा चमू शांतपणे वाद्ये वाजवत होता. जहाज जसजसे बुडू लागले तसे हा चमू आरामकक्षातून जहाजाच्या डेकवर पोहोचला आणि तेथे धून आळवू लागला. आणि बुडत्या जहाजाबरोबर समुद्राच्या पोटात गेला. या चमूने शेवटची धून कोणती वाजवली असावी, इतरांची धावपळ बघत असताना त्यांची स्वतःची मन:स्थिती कशी असावी यावर अद्यापही चर्चा झडतात.


सुमारे दोन आठवड्यांनी वॉलेस हार्टलीचा गारठलेला मृतदेह सापडला तेव्हाही वाद्याचा पट्टा त्याच्या शरीराशी बांधलेला होता. टायटॅनिकबद्दल अशा अनेक कथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत.


--------

आख्यायिकांसोबत हे जहाज बुडण्याची नेमकी कारणे कोणती यावर आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अद्याप संशोधन होते. हिमनगाशी टक्कर हे मुख्य कारण असले तरी त्या सोबतीने इतर काही कारणे या जहाजाला बुडवण्यात कारणीभूत ठरली असावीत का काय यावर अभ्यास केला जातो. नुकत्याच वाचलेल्या टाइम मासिकातील एका लेखानुसार हिमनगासह चंद्रालाही या अपघाताचा धनी बनवण्यात आले आहे.

टेक्सास युनिवर्सिटीतील काही शास्त्रज्ञांच्या मते १९१२ च्या जानेवारी महिन्यात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. ही घटना सुमारे १४०० वर्षांनी घडत होती. याचा प्रभाव समुद्राची भरती आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांनी हिमनगाला ग्रीनलॅंडकडून वळवून एप्रिलपर्यंत न्यू फाउंडलंडजवळ; जेथे टायटॅनिकचा अपघात घडला तेथे आणून पोहोचवले असावे.

भविष्यातही टायटॅनिकविषयी असे निष्कर्ष, शंका निघतच राहतील. इतके ग्लॅमर या जहाजाने नक्कीच मिळवले आहे.

-------

टायटॅनिक आणि ग्लॅमरचा विषय निघाला की जेम्स कॅमेरुनचा सुप्रसिद्ध चित्रपट टाळून पुढे जाता येत नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट हॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी दहा चित्रपटांतील एक गणला जातो. या चित्रपटाचं यश टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघातात होतं की प्रणयकथेत हे ठरवायचे झाले तर प्रणयकथेचे पारडे जड होईल असे वाटते. असं म्हटलं जातं की हा चित्रपट यशस्वी होण्याचे एक कारण प्रेक्षकांनी तो पुन्हा पुन्हा येऊन बघितला हे आहे. हा भीषण अपघात असो की प्रणयकथा; टायटॅनिकनेच "आय ऍम फ्लाइंग" ही प्रणय-प्रसिद्ध अदा सिनेजगताला दिली. टायटॅनिकच्या अपघाताच्या शंभरीनिमित्त १९९७ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वेळेस त्रिमित तंत्राच्या साहाय्याने पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.


टायटॅनिकच्या निमित्ताने पुढील काही दिवसांत सर्वत्र चर्चा झडतील. गप्पा होतील. उपक्रमावरही या घटनेची नोंद व्हावी म्हणून हा धागा सुरू करत आहे. टायटॅनिकसंबंधीच्या कथा, आख्यायिका, इतिहास, चित्रपट परीक्षण वगैरेसाठी हा धागा सदस्यांनी वापरावा.


.

.



हे पुस्तक वाचावे असे मी सुचवणार नाही. उत्सुकता असल्यास तासभरात भराभर डोळ्याखालून घातल्यास संदर्भ लागू शकतील.
जीवन संरक्षक होडक्यांत स्त्रिया आणि मुलांनी सर्वप्रथम बसावे अशी सूचना असतानाही अनेक स्त्रिया आणि मुले यांचा समावेश मृतांत आहे यावरून खरी परिस्थिती काय असावी हे लक्षात येते. वाचलेल्या लोकांत गर्भश्रीमंत प्रवाशांचा भरणा होता.



वरील चित्रे विकिपिडीया आणि jamescameronstitanic.wikia.com वरून साभार घेतली आहेत.

marathi blogs