प्रकार

Monday, May 02, 2011

चुकलेली वाट

सूचना: खालील लेखनप्रकार हा केवळ अनुभव असून सत्यकथा आहे. केवळ पात्रांची नावे बदलली आहेत. असे अनुभव अनेकांनी आयुष्यात अनुभवल्याची शक्यता असल्याने त्यात नावीन्य मिळणे कठिण आहे. कथा त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून असल्याने एकांगी आहे. त्यात दोन्हीकडील बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. ही भयकथा किंवा गूढकथा नाही.





८:३२ ची गाडी आज नक्की चुकणार होती; गाडी चुकली की १० वाजताची मीटिंगही. घरातून निघायलाच उशीर झाला. जेव्हा वेळा साधायच्या असतात तेव्हा हमखास काहीना काही गडबड असतेच. आज काय? कामवालीला उशीर झाला. तिचं काम होईपर्यंत मला खोळंबून राहावं लागलं. तरी स्टेशन फार लांब नाही. पायी दहा मिनिटं लागतात पण हल्ली पायी स्टेशनपर्यंत पोहोचणं म्हणजे मोठं कठिण काम. रिक्शा, बाइक्स, बसेस, फेरीवाले यांनी रस्ता असा अडवलेला असतो की त्यातून वाट काढत चालणं तारेवरल्या कसरतीपेक्षा वेगळं नाही.

पिंपळाच्या पारापाशी नितीश आळसावून बसलेला दिसला. मळकटलेले कपडे, विस्कटलेले केस, पायाला बांधलेलं चिंध्या झालेलं बँडेज. त्याच्या अंगाला गेला महिनाभर तरी पाण्याचा स्पर्श झाला नसावा. मी पारापासून चार हात दूरून जायचं ठरवलं. आधीच उशीर आणि त्यात भल्या सकाळीच याचं नको असलेलं दर्शन.

"ए मला वीस रुपये दे ना! काल सकाळपासून काही खाल्लं नाही. प्लीज, डोंट से नो. " त्या गर्दीत वाट काढत, लंगडत तो कसा माझ्यापाशी पोहोचला देवजाणे. आपले पिवळे पडलेले दात दाखवत आणि चेहर्‍यावर वाढलेले खुंट खाजवत तो ओशाळवाणे हसून मला विचारत होता. त्याच्या अंगाला येणार्‍या त्या घाणेरड्या भपकार्‍याने मला मळमळून आले.
माझ्या चेहर्‍यावरचे त्रासिक भाव लपवणे मला शक्य नव्हते. "हे बघ! मला आधीच उशीर झाला आहे आणि मी तुला अजिबात पैसे देणार नाही. याआधीही दोनदा दिले आहेत. दूर हो आता! "

"ए नाही नको ना म्हणू! दे ना. भूक लागली आहे. " त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत हात पसरला. रस्त्यावरचे लोक आता वळून तमाशा पाहत होते. मला आणि नितीशला या भागात ओळखणारेही अनेक होते. मला उगीचच लाजल्यासारखं वाटलं. मी पुढे एक चकार शब्द न काढता पर्समधून चटकन वीस रुपयांची नोट काढली, त्याच्या दिशेने फेकली आणि तिथून पळ काढला. ८:३२ ची लोकल चुकली होतीच. मनातल्या मनात दोनचार शिव्या हासडून मी पुढली लोकल पकडली. पाठ टेकवून उभं राहायला मिळालं हेच खूप होतं. ट्रेन हलली आणि डोळ्यांसमोर पुन्हा नितीश उभा राहिला.


***


गोरेगावला आम्ही इमारतीत राहायला आलो तेव्हा मी फक्त दीड वर्षांची होते. मोजून ३० कुटुंबे होती इमारतीत; बरीचशी तिशी-चाळिशीची नोकरदार मंडळी. पै-पै जमवून, गृहकर्ज काढून आपल्यासाठी मुंबईत हक्काचा निवारा मिळवण्यास धडपडणारी.

तळमजल्यावर नायकांचे कुटुंब राहायला आले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींचा सुसज्ज दोन बेडरूमचा फ्लॅट होता. त्यांचा मुलगाही माझ्या एवढाच, दीड वर्षांचा होता. आसपास याच वयाची आणखीही बरीच मुलं इमारतीत होती. गाडी, फोन, उंची फर्निचर या चैनीच्या आणि श्रीमंतीच्या गोष्टी समजल्या जात असा तो काळ होता आणि राष्ट्रीय बँकेत उच्चपदस्थ असणारे सुरेशकाका फोन, गाडी, ड्रायव्हर सर्व बाळगून होते. तळमजल्यावर राहत असल्याने सुरेशकाकांची गाठभेट अनेकदा होई. सर्वांशी अदबाने बोलणारे, आमचा फोन खुश्शाल वापरा, कधी गरज लागली तर आपली गाडी आहे हं! असे आवर्जून सांगणारे सुरेशकाका इमारतीत सर्वांना आवडत. सुमनकाकीही मिळून मिसळून वागणार्‍या होत्या. लोकांना पहिले काही दिवस एका गोष्टीचे कुतूहल होते, ते म्हणजे हे दांपत्य चाळिशीला आलेले होते पण त्यामानाने त्यांचा मुलगा फार लहान होता. लवकरच या गोष्टीचा उलगडा लोकांना झाला. नितीश हा त्यांचा दत्तक मुलगा होता.

नितीश काका-काकूंचा मुलगा नाही ही गोष्ट मला लहानपणीच माहीत झाली होती. नेमकी कुणी सांगितली ते आठवत नाही पण काही मोठ्या मुलामुलींकडून समजली असावी. मुलांनी या गोष्टीला खूप महत्त्व दिल्याचे आठवत नाही. या गोष्टीवरून इमारतीतील मोठ्यांमध्येही फार चर्चा झाल्याचे आठवत नाही. सर्वांनी तो सुरेश आणि सुमनकाकींचाच मुलगा आहे हे मनापासून स्वीकारले होते. खुद्द नितीशला या गोष्टीची कल्पना नसावी बहुधा आणि कधी त्याला कुणी दुखवून सांगितले असेही आठवत नाही.

लहान बाळं सर्वांनाच गोड, गोजिरी वाटतात आणि आवडतात पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी प्रत्येक मुलातले गुणदोष इतरांना कळू लागतात. नितीशसारख्या गुटगुटीत, गबदुल लहान बाळाचे कौतुक सर्वांनी केले तरी थोड्याच काळात या बाळाचे रुपांतर अंगाने अस्ताव्यस्त सुटलेल्या खादाड मुलात होईल याची कल्पना कुणाला नव्हती. ५-६ वर्षांच्या नितीशचे कौतुक होण्यापेक्षा मुलांमध्ये हसू होऊ लागले आणि केवळ त्याचा जाडेपणाच त्याला कारणीभूत होता असे नाही. नितीशचे गुण-दुर्गुणही हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागले. माझ्या ५ व्या वाढदिवसाची घटना...

त्या काळी आतासारखे वाढदिवसानिमित्त मोठ्ठे खर्च करायची पद्धत पडली नव्हती. आईने इमारतीतल्या लहान मुलांना बोलावले होते. घरी केक केला होता आणि बटाटेवडे तळले होते. केक कापायची वेळ झाली तशी आईने केक आणून टेबलवर ठेवला आणि सुरी आणण्यासाठी ती आत गेली. परत येऊन पाहते तो काय नितीश केकचा भलामोठा ढलपा हाताने तोडून चापण्यात मग्न होता. बाकीची मुलं आ वासून बघत होती आणि मी भोकांड पसरलं होतं. इतक्या लहान मुलाला ओरडावं तरी कसं म्हणून आई गप्प बसली. असाच अनुभव थोड्याफार फरकाने अनेकांना आला होता. कधी कुणी खाण्याची सर्वांमध्ये ठेवलेली बशी एकट्याने हिसकावून त्यावर ताव मारणे, वाढदिवसाला, पूजेला कुणी बोलावले तर हावरटासारखा खाण्यावर आडवा हात मारणे, इतरांच्या प्लेटमधले पदार्थ हिसकावून घेणे अशा अनेक प्रसंगांतून लहान आणि मोठेही मागून त्याची चेष्टा करू लागले. गोष्ट केवळ इतक्यावरच राहती तर मोठा प्रश्न होता असे वाटत नाही पण...

नितीशच्या अंगात उपजतच खोडकर गुण होते; आठ-नऊ वर्षांच्या कळत्या वयातही ते कमी झाले नाहीत. आपल्यापेक्षा लहान आणि दुर्बळ मुलांना बडवून काढणे, त्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांच्या खोड्या काढणे, त्यांना शिव्या देणे अशा अनेक प्रसंगांतून तो लवकरच मुलांमध्ये अप्रिय होऊ लागला. लहान मुलांची न्यायशक्ती दांडगी असते म्हणे. ते काळ्याला काळे आणि पांढर्‍याला पांढरे म्हणायला कचरत नाहीत. यथावकाश मुलांनी नितीशला हळूहळू चोख उत्तर देणे सुरू केले. त्याला खेळातून कटाप केले जाई, घेतले तरी पकडापकडीचे, लपाछपीचे राज्य सतत त्याच्यावर दिले जाई. क्रिकेट खेळताना बॅटिंग आणि बोलिंग त्याच्या वाट्याला येत नसे. फक्त फिल्डिंग करशील तरच आमच्यात खेळ असे त्याला सुनावले जाई. अर्थातच, त्याचा फारसा उपयोग होत नसेच. मनात आले की नितीश कोणीतरी दुसरे गिर्‍हाईक शोधी किंवा एखाद्या मुलाला एकटे गाठून प्रसाद देई. एकदा त्याने खेळायला गेलेल्या तीन-चार वर्षांच्या लहान मुलांना झाडाच्या पडलेल्या फांदीने अंगावर वळ उठेपर्यंत सपासप फोडून काढले होते. त्या प्रसंगानंतर मोठेही नितीशपासून आपल्या मुलांना दूर राहण्याचा सल्ला देऊ लागले.

नितीशच्या तक्रारी सतत त्याच्या आईवडीलांकडे जाऊ लागल्या. "काकी, नितीशने मारलं.", "काकू, नितीश बघा थुंकतो आमच्या अंगावर. आम्ही नाही घेणार त्याला खेळायला. " "अहो, समजवा तुमच्या नितीशला. काल मारलं त्याने आमच्या नमूला." नितीश असे का करत असेल, त्याला एखादी मानसिक व्याधी होती की नाही ते जाणून घेण्याचा आणि उपचार करण्याचा तो काळ नव्हता. कदाचित त्याला उपचारांची गरज असू शकते, समुपदेशन करावे लागेल हे इतरांना कधी जाणवलं नाही तसं त्याच्या आई-वडिलांनाही ते जाणवलं नसावं. आपल्या मुलाला इतर मुले नावे ठेवतात. त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला चिडवतात या गोष्टींनी सुमनकाकी कानकोंड्या झाल्या. पोटचं मूल नसण्याचं दु:ख आणि नितीशच्या रूपाने आपले ममत्व प्रकट करायची त्यांना मिळालेली संधी यातून त्या इतरांच्या तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागल्या. याचा परिणाम असा झाला की नितीश दिवसेंदिवस अधिकच निगरगट्ट होऊ लागला.

एके दिवशी तक्रारी ऐकल्यावर वैतागाने सुमनकाकींनी पोरांची हजेरी घेतली. "तुम्ही सर्व नितीशला उगीच नावं ठेवता. मुद्दाम त्याला त्रास देता. त्याला तुमची गरज नाही. मी खेळेन त्याच्याशी. तुमची अरेरावी मी खपवून घेणार नाही. चल, नितीश, आजपासून आपण दोघे घरात खेळू. " असं म्हणून त्या तरातरा त्याला ओढत घेऊन गेल्या. आता हा पायंडाच पडला होता. नितीशची तक्रार गेली की सुमनकाकी आमच्यावरच करवादून त्याला खेचून घेऊन जात. मोठ्यांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सुरेशकाकांच्या कानावरही नितीशच्या तक्रारी आल्या होत्या. ते समजूतदारपणे तक्रारी ऐकून घेत. नितीशला प्रेमाने, धाकाने समजवण्याचा प्रयत्न करत. सुरेशकाकांचा धाक नितीशला होता त्यामुळे तोही समजल्यासारखे दाखवी. आम्ही मुलेही समजूतदार होत असू; त्याला पुन्हा आमच्यात खेळायला घेत असू परंतु काही दिवसांनी... ये रे माझ्या मागल्या!

लहानांनी त्याचे क्रौर्य अनुभवलेले असले तरी मोठ्यांशी बोलताना नितीशचे बोलणे अतिशय अदबशीर असे. सुरेशकाकांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते आणि घरातही ते बरेचदा त्याच्याशी इंग्रजीतून बोलत. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याची सवय त्याला लागली होती. इंग्रजी माध्यमात त्या काळी आजच्या मानाने कमी मुले जात त्यामु़ळे नितीशच्या सफाईदार इंग्रजीचे कौतुक करणारे बरेचजण होते. अभ्यासातही नितीश तल्लख होता. दरवर्षी ७५-८० टक्के गुण सहज मिळवत असे. त्याच्या गुबगुबीत शरीरयष्टीमुळे इमारतीतील नाटकांत, फॅन्सी ड्रेस स्पर्धांत तो सर्वांना हवा असे. त्यामुळे कितीही नावडता असला तरी मुलांनी त्याला आपल्यात सामावून घेतले होते.

वयाच्या ११-१२ व्या वर्षीच त्याला आम्हा मुलांपैकी कुणीतरी लपून सिगरेट ओढताना पाहिले. बातमी पोरांमध्ये कानोकानी पसरली. "ए त्याच्या आईला सांगायचं का? " हा प्रश्न ज्याने उपस्थित केला त्याला दटावण्यात आले. "त्याची आई मागे काय म्हणाली होती माहित्ये ना. तुम्ही मुद्दाम त्याला त्रास देता आणि त्याच्या खोट्या तक्रारी करता. आपण कशाला मध्ये पडायचं? " वयानुसार नितीशचा खोडकरपणा इतरत्र वळला होता. अक्कल नको त्या दिशेने वाहवत चालली होती.

"ए तुला माहित्ये, त्याच्याकडे ती तसली चित्रं असतात. "
"तसली म्हणजे? "
"तसली म्हणजे उघड्या नागड्या बायकांची. " नम्रता एक दिवस माझ्या कानात कुजबुजली.
"तुला काय माहीत? "
"अगं, माझी मामेबहीण आहे त्याच्या वर्गात. ती म्हणत होती. नितीशच्या दप्तरात पाहिली काही मुलांनी. "
"होऽऽ? म्हणजे तो राजरोस जवळ बाळगतो? शाळेतही.. इइइ" मी डोळे विस्फारले. "शी! अशा घाणेरड्या मुलाशी फार बोलायचं नाही हं आपण. अंतर राखून राहिलं पाहिजे. " त्या वयात फार मोठा धक्का होता आमच्यासाठी.
"अगं, शाळेतही त्याच्याशी फारसं कोणी बोलत नाही. त्याची कुणाशी मैत्री नाही. मधल्या सुट्टीत ना, तो शाळेजवळचे फेरीवाले, पानवाले यांच्याशी गप्पा मारत असतो. गुटखा-बिटखाही खात असणार."

पुढे कधीतरी नितीशला जवळच्या विडिओ पार्लरमधून बाहेर पडताना पाहिले. दुपारच्या वेळी तिथे एक्स-रेटेड चित्रपट दाखवले जात. शाळेतल्या लहान मुलाला तेथे खरेतर प्रवेश नव्हता पण असे नियम पाळतो कोण? बातमी आम्हा मुलांमध्ये लगेच कर्णोपकर्णी झाली.
"बरं कुणाला सांगणार नसशील तर तुला एक गोष्ट सांगते. " नम्रता काळजीने सांगत होती.
"कुठली गोष्ट? " मी उत्सुकतेने विचारलं.
"माझी आईला चौथ्या मजल्यावरची सोनाली आहे ना तिच्या आईने सांगितलं. खूप रागात होती सोनालीची आई. "
"का गं? "
"अगं परवा लाइट गेले होते ना संध्याकाळी तेव्हा सोनाली क्लासमधून परत येत होती. लिफ्ट बंद होती ना त्यामुळे तिला चौथ्या मजल्यापर्यंत जिने चढावे लागले. त्या नितीशने तिला येताना पाहिलं असावं. तिच्या मागे मागे तो ही गेला आणि म्हणे तिला मागून करकचून मिठी मारली. ती घाबरून ओरडली ना तशी पळून गेला, घाणेरडा! "
"इइइइ विकृत आहे. सोनालीची आई काही बोलली नाही का? "
"ती घरी गेली होती ना नितीशच्या. पुढे मागे बघणार नाही. समोर आला तर दोन लगावून देईन म्हणाली. सुमनकाकीने हात जोडून क्षमा मागितली. डोळ्याला पदर लावला. सोनालीची आई गप्प झाली. "
"बरं झालं सांगितलंस. आजपासून मी त्या घाणेरड्याला हाय सुद्धा म्हणणार नाही. आपण सावध राहायला हवं. "

एस. एस. सी. ला आम्ही एकाच वर्षी होतो. स्वतःच्या रिझल्टबरोबरच नितीशचे काय होईल हे सुप्त कुतूहलही मनात होते. परीक्षेत त्याला ७७% पडले. याचे पुढे कसे होणार याची काळजी करणार्‍या सर्वांच्या तोंडाला कुलुपं लागली. सुरेशकाका आणि सुमनकाकींनी आनंदाने सर्वांना पेढे वाटले. मार्क चांगले असले तरी उत्तम नव्हते परंतु बी. कॉम केले की आता वेगवेगळे कंप्युटर कोर्सेस करता येतात, एम. बी. ए किंवा सी. ए. करता येतं असं नितीशला पटवून सुरेशकाकांनी त्याला कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन दिली.

कॉलेजला असताना सिगरेट ओढत, येणार्‍या जाणार्‍या पोरींच्या उभारीवरून आशाळभूत नजर फिरवणारा नितीश कधीतरी स्टेशनावर दिसायचा. कधी समोर आलाच तर त्याचे ते बेरकी हास्य डोक्याला त्रास देऊन जायचे. एक दिवस चौथ्या मजल्यावरचे काळे काका सांगत आले की त्यांनी नितीशला बाजारातल्या डान्सबारमधून तर्र अवस्थेत बाहेर येताना पाहिले. त्यानंतर कळले की ही गोष्ट इमारतीतल्या इतर काही मोठ्या मुलांना आधीच ठाऊक होती. १८व्या-१९व्या वर्षी त्याला हे सर्व करण्यास पैसे आणि प्रोत्साहन कसे मिळत होते कळण्यास मार्ग नव्हता. काळेकाकांनी ही गोष्ट तत्परतेने सुरेशकाकांच्या कानी घातली तसे सुरेशकाका हबकलेच. आपल्या मुलाचे गुण या आधी त्यांना कधी जाणवलेच का नाही हे गूढ होते. इमारतीतल्या लोकांच्या मते सुमनकाकींनी सुरेशकाकांना घरात काय चालते याचा कधी थांगपत्ताही लागू दिला नव्हता. त्याला पॉकेटमनीसाठी मोठी रक्कम हातात देणार्‍या, वेळोवेळी त्याला पाठीशी घालणार्‍या, त्याच्याविषयी येणार्‍या तक्रारींवर पांघरूण घालणार्‍या सुमनकाकीच होत्या.

त्या रात्री सुरेशकाकांच्या घरात मोठमोठ्याने आवाज येत होते. सुमनकाकींच्या रडण्याचा, नितीशच्या आणि सुरेशकाकांच्या भांडणाचा. आम्हाला अगदी दुसर्‍या मजल्यापर्यंत ऐकू येत होते. शेवटी इमारतीतील कुणीतरी मध्ये पडलं. सुरेशकाकांनी या प्रकरणानंतर नितीशच्या वागणुकीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तो कधी घरी येतो, कधी बाहेर पडतो, त्याची प्रगती, पॉकेटमनी यावर ते जातीने लक्ष देऊ लागले. परिस्थिती निवळल्यासारखी झाली. सर्व काही सुरळीत सुरू झाले.

नितीशच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुरेशकाका रिटायर झाले पण लगेचच त्यांना फॉरेन बँकेत अ‍ॅडवायझर म्हणून बोलावणे आले. तिथे त्यांनी नितीशसाठी शब्द टाकला; तो नाकारला जाणे केवळ अशक्य होते. ग्रॅज्युएट झाल्याक्षणी नितीशला उत्तम पगाराची नोकरी हातात पडली. "चला! गंगेत घोडं न्हालं. आता हा मुलगा बिझी राहिल, चांगल्या संगतीत राहिल. हे असले उद्योग बरीच पोरे करतात या वयात पण जबाबदारीची जाणीव झाली की येतात सगळे लायनीवर." असे म्हणून सर्वांनी सुटकेचे निश्वास सोडले. पण नाही..तसं काही घडायचं नव्हतं.

नितीश आता स्वतंत्र झाला होता. पॉकेटमनीसाठी त्याला वडिलांवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. लवकरच रोजचं पिणं, नशेत तर्र होऊन घरी येणं, डान्सबार, सिगरेटी सर्व पूर्ववत सुरू झालं. सक्काळी सातला इमारती समोरच्या पानवाल्याने शटर वर केलं की त्याचे पहिले गिर्‍हाइक नितीश असे. "याने कोणतंही व्यसन बाकी ठेवलेलं नाही." असं लोक म्हणू लागले. काही काळाने या सर्वाच्या सोबतीला नितीशची कोणी एक बाई आहे. तिच्याकडे तो नियमित जातो अशी बातमीही कानावर पडली. बातमी खरी का खोटी हे माहित नाही पण सुरेशकाकांच्या घरातून दररोज भांडणाचे आणि रडारडीचे आवाज ऐकू येत. आता शेजारपाजारचेही त्रासले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींची पुण्याई मोठी म्हणून सगळे गप्प होते एवढेच. अशातच एका भांडणानंतर अ‍ॅम्ब्युलन्सच्या आवाजाने सर्व चकीत झाले. सुरेशकाकांना हृदयविकाराचा झटका आला होता. इमारतीतील सर्वांनी वेळीच धावाधाव केली म्हणून प्रसंग निभावून नेता आला.

दिवसेंदिवस नितीश अधिकच शिरजोर होत चालला होता. काकांच्या आजारपणामुळे धाक थोडा कमी झाला होता आणि पंचविशीच्या मुलाला आणखी किती धाकात ठेवणार होते काका? ते हॉस्पिटलमधून घरी आले होते. काठी घेऊन घरातल्या घरात, बाहेर अंगणात फिरत, आल्या गेलेल्याशी चार शब्द बोलत पण काका मनाने खचले होते. काकी तशाही नितीशला काही बोलत नसत. पुत्रप्रेमात गाढ बुडलेल्या काकींनी डोळ्यांवर झापडे ओढून घ्यायचेच ठरवले होते. या सर्व मनःस्तापात आपले काही खरे नाही हे काकांना कळून चुकले होते. त्यांनी तातडीने एक शहाणपणाची गोष्ट केली. आपले मृत्यूपत्र तयार केले. घर,ठेवी, विमा आणि जी काही संपत्ती होती ती आपल्या पश्चात केवळ आपल्या बायकोची आहे असे लिहून ठेवले. नितीशला हे कळल्यावर घरातला ताण आणखी वाढला. त्याची गलिच्छ शिवीगाळ नेहमीची झाली होती पण आता त्याने काका-काकींवर हात उगारणेही सुरु केले होते. अशाच एका भांडणात सुरेशकाका त्राग्याने बोलून गेले -

"तू पोटचा मुलगा असतास तर असा नसता वागलास पण वळचणीचे पाणी वळचणीला जायचे. आमचे रक्त असते तर असे झाले नसते." सुरेशकाकांच्या बोलण्याला फारसा अर्थ नव्हता. पोटची पोरंही बिघडतात, वाया जातात हे त्यांना पुरेपुर माहित होते पण त्राग्यातून शब्द निघून गेले. नितीश नेमका कुणाचा मुलगा आहे याची कल्पना त्यांना होती का याची कल्पना नाही पण आपण आपल्या आईवडिलांचे पोटचे मूल नाही ही बातमी नितीशला आणखीनच वेडेपिसे करणारी ठरली. त्याने साफ ताळतंत्र सोडून दिले. कोणी म्हणायचे तो कधी बँकेत जातो, कधी जात नाही. त्याची फोरासरोडला कुणी बाई आहे. तिच्याकडेच पडलेला असतो. एक दोनदा त्याला इमारतीतल्या लोकांनी रस्त्यात दारू पिऊन अक्षरशः लोळताना पाहिला आणि घरी आणून सोडला. या सर्वाचा परिणाम व्हायचा तो झाला. काकांना आलेला पुढला झटका प्राणघातक ठरला.

घरात आता सुमनकाकी आणि नितीश दोघेच होते. नितीशला पगाराचे पैसे पुरे पडत नसत. तो काकींकडे पैशांसाठी तगादा लावत असे. त्याची नोकरीही सुटली होती. कोणी म्हणत त्याने बँकेत अफरातफर केली होती. रक्कम खूप मोठी नव्हती आणि सुरेशकाकांच्या पुण्याईमुळे बँकेने ते प्रकरण कसेबसे गुंडाळले होते आणि नितीशला नोकरीतून कमी केले. नोकरी गेली तरी नितीशचे शौक कमी झाले नव्हते; अंगात कली तर फार पूर्वीच घुसला होता. तर्र होऊन, झोकांड्या खाणार्‍या नितीशपासून लोक चार हात दूर राहत. त्याला स्वतःचे मित्र-मैत्रिणी असे कधी नव्हतेच त्यामुळे त्याला सांभाळेल, समजावेल असे कोणी उरलेच नव्हते. सुमनकाकींना आता तो पैशांसाठी धमकावत असे. भांडत असे, मारहाणही करत असे पण काकींनी स्वतःहून कधी तोंड उघडून लोकांकडे तक्रारच केली नाही.

एक दिवस मात्र बांध फुटला. मध्यरात्री घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या सुमनकाकींनी शेजार्‍यांची ठणाठणा बेल वाजवली. शेजार्‍यांनी दार उघडलं तसं त्या झटकन आत शिरल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. नितीश गेले काही दिवस त्यांच्या मागे लागला होता की हे घर विकून टाक आणि पैसे देऊन मला मोकळा कर. काकींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करत होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी काकी कसेबसे हे सर्व सहन करत होत्या. मुकाट्याने सर्व सहन करत होत्या. त्या रात्री उशीरापर्यंत नितीश घरी आला नव्हता. रात्री साडे अकराच्या सुमारास तर्र होऊन परतला तसा काकींनी त्याला जेवणाबद्दल विचारले. त्याने नकार दिला म्हणून काकी जाऊन आपल्या खोलीत झोपल्या. मध्यरात्री उलटून गेली असावी. काकींना झोप लागली होती. अचानक नितीशने काकींच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या नाकातोंडावर उशी दाबली. काकींच्या कृश शरीरात कसे कोणजाणे पण नशेत लडखडणार्‍या नितीशला धक्का देण्याचे बळ आले. त्या जोराचा हिसडा देऊन पळाल्या आणि थेट शेजारच्यांकडे पोहोचल्या.

प्रकरण आता अतिशय गंभीर झालं होतं. पांढरपेशा मध्यमवर्गीय फ्लॅट संस्कृतीत लोक शेजार टिकवून असले तरी एक विशिष्ट मर्यादा राखून असतात. फ्लॅटच्या बंद दारांचा आडोसा अनेक गुपिते लपवून ठेवतो. काकींच्या घरातले हे गुपीत आता बाहेर पडले होते. काकींनी यापुढे नितीशसोबत राहणे धोक्याचे होते. इमारतीतल्या लोकांनी आता एकत्र व्हायचे ठरवले आणि पोलिसांत तक्रार केली. त्या रात्रीच नितीशला अटक झाली, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलांवर केलेलं प्रेम इतकं घट्ट असतं की तिथेही ती माऊली पोलिसांना डोळ्यांत पाणी आणून इन्स्पेक्टरना विनंती करत होती, "त्याला मारू नका हां, त्याला उपाशी ठेवू नका हां. तो सुधारेल, त्याला समजून घ्या."

नितीशला अटक झाली आणि एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. नितीशने सुमनकाकींना कफल्लक करून सोडले होते. नितीश जबरदस्तीने त्यांच्या सह्या चेकवर घेई. त्यांची फिक्स्ड डिपॉझिट्स त्याने तोडायला लावली होती. दागिने नेऊन कधीच्या कधी विकले होते. सर्व हिशेब केला तेव्हा काकींच्या नावावर घर आणि केवळ ८०० रुपये शिल्लक होते. आता काय करायचे? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. काकींची जबाबदारी कोण घेणार? त्यांचा मोठा भाऊ होता पण तोच वृद्ध होता आणि आपल्या मुलांकडे राहत होता. घर विकण्यावाचून पर्याय नव्हता. इमारतीतील लोकांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून घर विकून टाकण्याचा निर्णय घेतला. काकींची काळजी घेतली जाईल अशा एका वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले आणि घर विकून मिळालेले पैसे त्यांच्या खर्चासाठी ठेवण्यात आले. काकींच्या इच्छेनुसार पैशांचा काही हिस्सा नितीशलाही देण्यात आला. अनेकांनी या गोष्टीला विरोध केला होता पण काकी बधल्या नाहीत. त्यांनी नितीशवर केसही केली नव्हती त्यामु़ळे नितीश लवकरच बाहेर आला. त्याचा हिस्सा त्याला देऊन लोकांनी त्याला मोकळा केला. काकींची रवानगी कोठे होत आहे याची त्याला खबर लागू दिली नाही.

या घटनेनंतर मिळालेले पैसे घेऊन नितीशने तोंड कुठे काळे केले ते कळले नाही. कोणी म्हणत त्याने कुठल्याशा चाळीत जागा घेतली आहे. कुणी म्हणत तो त्या बाईकडे फोरासरोडला राहतो. कालांतराने लोकांना नायक कुटुंबातील सनसनाटी गोष्टींचा विसर पडला. ८-१० महिने निघून गेले. अचानक नितीश पुन्हा इमारतीच्या आसपास घुटमळताना दिसू लागला. रया गेली होती. घाणेरडा झाला होता. त्याला कसल्यातरी गुप्त रोगांची लागण झाली आहे असे लोक म्हणत. अनेक दिवसांत पाण्याचा स्पर्श नसलेले घाणेरडे शरीर, मळकटलेले फाटके कपडे आणि पायाला बांधलेले बँडेज घेऊन तो भ्रमिष्टागत भटकताना दिसे. त्याच्या पायाला गँगरिन झाले आहे असे कोणीतरी म्हणे. दोन बोटे कापली होती. कधी इमारतीतील कुणी दिसले तर त्यांच्याकडे तो पैसे मागत असे. लोकांच्या मनात तिरस्कार आणि करूणा एकत्रच दाटून येत असे. कधीतरी कुणी पैसे देई तर कधीतरी त्याला हाकलून लावी.

कोपर्‍यावरच्या बंगलीतले दिक्षितकाका एके दिवशी माझ्या वडिलांना म्हणाले - "तो तुमच्या इमारतीतला नायकांचा मुलगा हो, तो रात्रीचा आमच्या अंगणात घुसून आंब्याच्या झाडाखाली झोपतो. हे सगळे दुर्दैवाचे दशावतार बघायच्या आधी नायक गेले ते बरे झाले म्हणायचे. मी एकदा दोनदा हटकला त्याला पण देतो झोपायला कधीतरी. चांगल्या घरचा मुलगा ना म्हणून वाईट वाटतं पण आमच्या सूनबाईला आवडत नाही ते. जांघेत खाजवत असतो सारखा. नाती ११-१२ वर्षांच्या झाल्यात. त्यांच्यावर याची नजर नको असं म्हणते. तिचंही बरोबर आहे."

दादर स्टेशनाला गाडी लागली तशी माझ्या विचारांची शृंखला गळून पडली. 'माणूस तरी किती नको ते ताप डोक्याला लावून घेतो.' एक सुस्कारा सोडून मी थांबत आलेल्या गाडीतून उडी मारली आणि जिन्याच्या दिशेने धाव घेतली.


***


एखाद दोन महिने उलटून गेले असतील वरल्या घटनेला. कधीतरी धावपळीत स्टेशनाकडे येता-जाताना नितीश पारापाशी बसलेला दिसायचा. कधी नाही दिसायचा. मनाने त्याची नोंद ठेवणे सोडून दिले होते. नकोशा असणार्‍या तिर्‍हाईत गोष्टींकडे आपण आपसूक दुर्लक्ष करू लागतो तसेच.

आज वेळेवर ऑफिसात येऊन टेकले होते. सकाळीच डेस्कवरला फोन वाजला तसा मी रिसिव्हर कानाला लावला.
"आहे का गं वेळ ५-१० मिनिटं? मोबाईलवर फोन करत होते पण लागला नाही म्हणून इथे करून पाहिला." नम्रताचा आवाज कानावर आला.
"आहे ना. सेलफोन सायलंटवर आहे बहुधा. इतकं काय अर्जंट काम काढलंस?"
"अगं, अर्जंट असं काही नाही पण मनाला रुखरुख लागली होती म्हणून तुझ्याशी बोलावसं वाटलं. नितीश गेला काल."
"गेला म्हणजे?" नितीश प्रकरणाची परिणीती अशीच होईल याची कल्पना होती तरीही अचानक आलेल्या बातमीने आश्चर्य वाटायचे ते वाटलेच.
"अगं, काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो. ऋषीचा वाढदिवस होता ना. परतताना रात्रीचे १० वाजून गेले होते. पारापाशी गर्दी जमली होती म्हणून विचारलं तर कळलं की नितीशची बॉडी होती. म्युनिसिपल्टीची गाडी आली होती. बे..." नम्रताने आवंढा गिळला. "बेवारशी प्रेतांना उचलून न्यायला येते ना."
"अरेरे!" मला पुढे काय बोलावे ते कळेना. काळजात सूक्ष्म कळ उमटली.

मुलं बिघडतात. एका विशिष्ट वयांत अनेक उद्योग करून पाहतात. त्यातली बरीचशी मुलं चुकलेली वाट सुधारून पुन्हा मार्गी लागतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची मदत घेतात किंवा एके दिवशी काहीतरी चुकतंय ही जाणीव झाल्याने स्वतःच मार्ग बदलतात. मध्यमवर्गी पांढरपेशा वातावरणात माणसं एकमेकांना दबून राहतात. अशा परिस्थितीत सर्व बंधनं झुगारून स्वतःला गर्तेत झोकून देणारे विरळाच. सोबत वाढलेला, खेळलेला, शिकलेला, नंतर निगरगट्ट झालेला, व्यसनी आणि शेवटी भ्रमिष्टागत भीक मागत फिरणारा नितीश डोळ्यासमोरून पुन्हा तरळून गेला. कधीकधी एखादी नकोशी व्यक्तीसुद्धा हुरहुर लावून जाते खरी.


***

marathi blogs