निरागस
झाली असतील या गोष्टीला आता १२-१३ वर्षे. गल्फचा कंटाळा आल्याने आम्ही मुंबई किंवा इतरत्र स्थायिक होण्याचे ठरवले तेव्हाची. सॉफ्टवेअर व्यवसायाची तेव्हा चलती असल्याने आम्हाला दोघांनाही सहज नव्या नोकर्या मिळून गेल्या. माझ्या ऑफिसात मराठी माणसे तशी कमीच, त्यामुळे आम्हा ४-५ जणांचा चांगलाच कंपू बनला होता. मी, माझ्या टीममध्ये असणारा संदेश, नेटवर्किंगमधला सुनील, लायब्ररीयन आणि ऍडमिनिस्ट्रेशन पाहणारी वैशाली, एच.आर.मध्ये माझ्यानंतर लागलेली माधवी आणि दुसर्या एका प्रोजेक्टवरचा सिनिअर डेवलपर राहुल. केवळ सहकारी न राहता एकमेकांच्या घरी-दारी येण्यापर्यंत आमची मैत्री घट्ट झाली होती. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसमधली डोकी एकत्र आल्याने फावल्यावेळातला आमच्या डिटेक्टिवगिरीचा व्यवसायही झोकात होता. एक मात्र होतं की आमच्यातल्या गप्पा कधी बाहेर गेल्या नाहीत.
असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. लहानशीच दिसत होती. नुकतीच कॉलेजातून बाहेर पडली असावी. ऑफिसच्या वातावरणाला दबल्यासारखी वाटत होती.
"मीट माय फ्रेंड उर्मी, उर्मीला पटेल. शी'ज जॉईन्ड अस टूडे अँड उर्मीला मीट प्रियाली. उर्मी, सायरसबरोबर काम करणार आहे. माझ्या एका जवळच्या मित्राची मावसबहीण आहे. प्रियालीची वट आहे हं इथे! तुला काही हवं असल्यास बिनधास्त तिला गाठ. ही देखील माझी चांगली मैत्रिण आहे."
सवयीचं "वेलकम!" वगैरे झाल्यावर मी तिला हसत म्हटलं, "याचं काही ऐकू नकोस. माझी काही वट वगैरे नाहीये, उगीच लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असतात पण सायरसवर कधी फायरिंग करायचं असेल तर सांग. आपलाच बंदा आहे."
उर्मीलाने असिस्टंट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर म्हणून नोकरी पत्करली होती. सायरसला, आमच्या प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटरला गेल्या काही दिवसांपासून व्याप वाढल्यामुळे एका असिस्टंटची गरज होती. सायरस खरास हा एक मस्त मनुष्य. मनमिळाऊ आणि हाडाचा गरीब. झुरळ पाहिलं तरी घाबरून पळत सुटेल असा. आम्ही त्याला मागून "वेडा बावा" म्हणायचो.
दुपारी सुनिल माझ्या डेस्कपाशी थबकला. "ए तू त्या उर्मीला भेटलीस का? आयटम आहे."
"ऑफिसात तरी तोंड सांभाळून बोलत जा रे." सुनिलच्या शर्टाची सर्व बटणे आज लावलेली आहेत हे लक्षात येत होते.
"राहुलच्या मित्राची मामेबहीण आहे असं कळलं."
"मला वाटतं तो मगाशी म्हणाला मावसबहीण." मी लगेच चूक सुधारून दिली.
"असेल."
संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारी बस पकडली. सराईतांना बसमध्ये चढल्याचढल्या कोणत्या जागा रिकाम्या होणार आहेत हे चटकन कळतं. मला बूड टेकवायला जागा मिळाली आणि तेव्हाच मागून बसमध्ये चढणारी उर्मीही दिसली. गर्दीत स्वतःला सावरत कशीबशी उभी होती. तिच्या बाजूचा मळकट कपड्यांतला मनुष्य तिच्या अंगचटीला येत होता असं वाटलं. आमची नजरानजर झाली तशी ती ओशाळवाणं हसली.
'अगं! मोठ्यानं बोल की गधडे त्याला की बाजूला सरक म्हणून.' मी मनात म्हटलं पण मग लक्षात आलं की बहुधा असल्या प्रसंगांची तिला सवय नसावी.
"इथे ये. माझ्याजागेवर बस." मी तिला ओरडून सांगितलं. "हिम्मत है तो इधर आके कुछ करके दिखा उसको" त्या माणसाकडे पाहून मी ओरडले. आता बसमधली माणसं त्यांच्याकडे वळून बघू लागली तशी त्या माणसाने चालत्या बसमधून उतरून पोबारा केला.
"थँक्स हं! मला काय करावं हेच सुचत नव्हतं. किती किळसवाणी माणसं असतात नै."
"अगं असे महाभाग रोजच भेटतात. त्यांचा फाजीलपणा तेवढ्यापुरताच असतो. अंगात काही धमक नसते. आपण आवाज चढवला की काम होतं. पाहिलंस ना कसा पळून गेला ते. यांचा फाजीलपणा असाच बाहेर काढायचा असतो."
"मला अनुभव नव्हता पण आता लक्षात ठेवेन."
हम्म! येशील हळूहळू अंड्यातून बाहेर येशील. रेल्वेचा ब्रिज चढताना मी तिला विचारले "तू कुठे राहतेस? सेंट्रल का वेस्टर्न?"
"वेस्टर्न, मालाडला."
"हो का? मीही मालाडलाच. लिबर्टी गार्डनजवळ."
"मीही लिबर्टी गार्डनजवळच राहते." मी तिला माझ्या इमारतीचे नाव सांगितले. ती माझ्यापासून दोन चार इमारती सोडून राहत होती.
"पण मी आधी कधी पाहिले नाही तुला." तिने विचारले.
"अगं आम्ही आताच आलो. हा फ्लॅट माझ्या बहिणीचा आहे. तात्पुरते राहतो आहोत. माझं घर बनतं आहे. बांधकाम झालं की आम्ही शिफ्ट होऊ. हा तुझा पहिलाच जॉब का गं?"
"अलमोस्ट! मी याच वर्षी बी. कॉम. झाले मग एके ठिकाणी दोन महिने काम केलं पण मला ना मल्टीनॅशनलमध्ये जॉब हवा होता. काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला." तिच्या पाणीदार डोळ्यांत बरीच स्वप्नं तरळून गेल्यासारखी वाटली.
'निरागस आहे.' मी मनात म्हटलं.
दोन-चार दिवसांनंतरची गोष्ट. उर्मीचा सकाळीच फोन आला.
"राहुल है क्या वहां?"
"नाही. इथे नाहीये."
"अजून कसा नाही आला? १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो? तुला माहित आहे का?"
"आज मंगळवार ना! राहुल आणि वैशाली पहाटे ४ वाजल्यापासून सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असतात. आज उशीर झाला असावा."
दुपारी राहुल तणतणत आला. "तुला कोणी सांगितलं होतं त्या उर्मीला सांगायला की मी आणि वैशाली सिद्धिविनायकाच्या लायनीत उभे राहतो ते."
"का काय झालं? क्लासिफाईड इन्फो आहे का ती?"
"नाही पण तिला माझ्याबद्दल जास्त काही सांगत जाऊ नकोस."
"अरे पण तुझी मैत्रिण आहे ना ती. बरं! अरे तुला माहित्ये का? ती माझ्या घराशेजारीच राहते."
"मला माहित्ये पण तू तिच्यापासून चार हात लांब रहा."
"अं! का रे?"
"सांगेन मग कधीतरी." म्हणून राहुलने काढता पाय घेतला. राहुलचा हा विचित्रपणा पास-ऑन करणे आवश्यक होते. मी वेळ झाल्यावर वैशालीला त्याच्याबद्दल सांगितले.
"अय्या! गंमतच आहे." वैशाली उत्साहाने म्हणाली. "मलाही त्या उर्मीने दोन-चारदा फोन करून राहुलबद्दल विचारलं. मलाही विचारत होती - तुझा मित्र आहे ना तो. किती चांगला मित्र आहे वगैरे. मला वाटतं ती राहुलवर लाईन मारत असावी. गीतूला सांगायला हवं हं!"
गीतांजली ही राहुलची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. दोघांचेही प्रकरण घरांत पसंत होते. दोघांना थोडे सेटल व्हायचे होते म्हणून लग्न झाले नव्हते इतकेच. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचे ठरले होते. "फिरुन फिरुन थकले आणि लग्नाला लागले." असं संदेश म्हणायचा त्यांना.
"ती उर्मी लाईन मारते का रे तुझ्यावर?" संधी मिळाल्यावर आम्ही राहुलची थोडी खेचली.
"माहित नाही. तिला थोडं लांबच ठेवायला हवं. उगीच गळ्यात पडते आहे." राहुल रुक्षपणे म्हणाला.
"तूच आणलीस तिला. मी सांगू का रे गीतूला?" संदेशने आणखी थोडी खेचली.
"प्लीज. माझ्या आयांनो आणि बापांनो, तुम्ही त्या उर्मीपासून लांब रहा आणि कृपा करून गीतूला काही सांगू नका."
"हे बघ! उर्मी तुझ्या गळ्यात पडत असेल तर तू तिला स्पष्ट सांग की तुझं लग्न ठरलं आहे. ती आताच कॉलेजातून बाहेर पडली आहे. लहान आहे. तिला अद्याप पोच नसावी. मला तर ती अगदी निरागस वाटते."
"निरागस! माय फूट! तिचा विषय नको आता. तिला माझ्यापासून कटवायचं हे मात्र नक्की. तिला कसलीही माहिती देऊ नका आणि तुम्हीही लांब रहा. माझ्या मित्राची बहीण आहे ती. तिच्यामुळे माझे संबंध खराब होता कामा नयेत."
"ठीक आहे." आमचा करार वगैरे झाला.
काही दिवसांनी उर्मीचे चौकशीचे फोन बंद झाले. त्यावर आमचे चर्वितचर्वणही झाले. 'ऑल वेल! ब्याद टळली आहे असे दिसते.' असं संदेश म्हणाला. राहुलही निर्धास्त दिसला. उर्मीला ऑफिसात लागून आता तीन-चार महिने उलटले होते. ऑफिसातल्या अनेकांना तिचं आकर्षण वाटतंय हे सर्वांच्या लक्षात आले होते. तिच्या डेस्कपाशी घुटमळणारे, तिला लंचला बाहेर घेऊन जाणारे अनेक होते. राहुलच्या तंबीमुळे संदेश आणि सुनील सांभाळून होते. शिवाय राहुलच्या मित्राची बहीण असल्याचेही कारण असावे.
"सायरस माझ्याशी फटकून वागतो. अजिबात मदत करत नाही." उर्मी एक दिवस ट्रेनमध्ये बोलता बोलता म्हणाली. तशा तिच्या आणि माझ्या वेळा वेगळ्या होत्या पण कधीतरी गाठ पडतच असे.
"सायरस? आणि फटकून वागतो. काहीतरीच काय? त्याच्यासारखा गरीब मनुष्य ऑफिसमध्ये नाही."
"अगं खरंच!"
"बरं मला वेळ झाला की मी विचारेन त्याला सहज म्हणून."
मी आणि सायरस हॉलवेमध्ये काहीतरी बोलत होतो आणि समोरून राहुल येताना दिसला.
"केम छो बावा?" राहुलने त्याला खास पारशी हेल काढत विचारले.
"शाला तूने फसाया है मेरेको कैसा सॅम्पल लाया है यार?" राहुल ऐकून फिसकन हसला. हे वाक्य उर्मीसाठी आहे हे लक्षात येत होतं.
"अरे ती उर्मी सांगत होती मागे की तू तिला हेल्प करत नाहीस म्हणून." मी संधी मिळताच विचारलं.
"अरे येडी, हेल्प मेरेको चाहिये उसको क्या हेल्प? ये राहुलने बुरा फसाया है" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय? मला उर्मी आवडत होती. तिच्यासारख्या मुलीने थोडं सांभाळून वागायला हवं असं वाटत होतं. तिच्याशी एकदा बोलून बघायला हवं.
त्या दिवशी सकाळीच डेस्कवरचा फोन खणखणला. माधवी होती. लंचला सर्वांनी बाहेर जाऊया असं सांगत होती. काहीतरी जबरदस्त खबर होती तिच्याकडे. तशाही माधवीकडे बातम्या असायच्याच. कोणत्या डायरेक्टरने रिझाईन केले? कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे? कोणी कोणाची एच आर मध्ये तक्रार केली वगैरे वगैरे. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत ठरला होता.
"एक सॉलिड खबर द्यायची आहे. तुमचा विश्वासही बसणार नाही. काल तो राकेश भाटिया उर्मीची चौकशी करत होता." माधवी उत्साहाने सांगत होती.
"राहुल, सायरस आणि आता राकेश. सही जा रही है बाप!" सुनिलने तोंड उघडलं.
"का रे? तुझा चान्स लागला नाही म्हणून जळतोस काय?" संदेशने नाक खुपसलं.
"तिला प्रेमात पडण्याची घाई असावी. राहुल वटलेला चेक, सायरस वेडा बावा तेव्हा आता राकेशची पाळी." वैशालीने आपली बोली लावली. माणसं गॉसिप करायला लागली की एक एक तर्क कुतर्क लढवू लागतात.
"ही काय सॉलिड खबर आहे का?" मी खट्टू होऊन विचारले.
"मला बोलू द्याल तर खबर कळेल ना. तुमची मुस्काटं आवळा मग सांगते." माधवी सरसावून म्हणाली, "राकेश बराच गोंधळलेला होता. उर्मीची चौकशी करत होता. थोडीशी पर्सनल."
"गटलेला दिसतो." इति संदेश.
"ऐक रे! उर्मीने म्हणे त्याला शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी बीचवर भेटायला बोलावलं आहे."
"कुठेतरी नाही. गोराईला असणार संध्याकाळी साडे सहाला." राहुलने पहिल्यांदाच तोंड उघडले.
"हो गोराईच म्हणत होता बहुतेक. तिथे म्हणे तिने बंगला बुक केला आहे दोन-तीन तासांसाठी. राकेश म्हणत होता की या आधीही ऑफिसातल्या एक दोन जणांना तिने अशी आमंत्रणे दिलेली आहेत. तो थोडासा टरकला होता. तक्रार अशी करत नव्हता पण एच आरच्या कानावर जावं असं त्याला वाटत होतं."
सायरस काय म्हणत होता, राहुल तिला का चुकवत होता त्याचा पत्ता आता लागत होता. बोंबला!
"तुला कसं कळलं गोराई? म्हणजे तू ही..... तुझ्या मित्राची बहीण आहे ना ती." माझी ट्यूबलाईट लख्ख पेटली होती.
"खीखीखी! माझ्या मित्राची कसली आली आहे बहीण. याहू चॅटवर भेटली होती."
च्यामारी! आणि ती आम्हाला विचारत असे की तुम्ही राहुलच्या मैत्रिणी ना!
(मूळ अनुभवातील पात्रे, स्थळ, प्रसंग बदलले आहेत.)