प्रकार

Saturday, January 17, 2009

दयामरण हवे का नको?

आजचा सुधारकमध्ये श्रीमती मंजिरी घाटपांडे यांचा दयामरणाला अनुमती देण्याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. तो येथेही वाचता येईल. त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून माझी अंकात प्रकाशित झालेली प्रतिक्रिया येथे देत आहे.




सर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.

मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.

इच्छामरण

इच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.

आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.

सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.

दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.

प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.

एखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे? अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.

लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.

दयामरण

दयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.

पुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.


संपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.

marathi blogs