गाठ माझ्याशी आहे - २
“आई बाबा, हे बघा काय आहे माझ्या खोलीत. ” रविवारचा दिवस होता. सकाळी शम्मी उठली आणि खोलीतूनच जान्हवी आणि सुधीरला हाका मारू लागली.
“काय गं? ” म्हणत सुधीर तिच्या खोलीत शिरला आणि आतलं दृश्य बघून चकित झाला. शम्मी पलंगावर उठून बसली होती आणि थरथरत होती. तिची खोली अस्ताव्यस्त होती. कपाटातले कपडे, पुस्तकं, तिचे खेळ खोलीभर पसरले होते पण सुधीरला जाणवले ते भिंतींवर खरडलेले शब्द. शम्मीच्या खोलीतल्या सर्व भिंतींवर कुणीतरी गिचमीड अक्षरांत "घर माझं आहे. " असं अनेकदा लिहून ठेवले होते.
“हे काय आहे? ” जान्हवी आत येत म्हणाली तशी शम्मी ताडकन उठून जान्हवीला बिलगली.
“मला नाही माहीत. मी नाही केलं. मी झोपले होते. मी नाही लिहिलं भिंतीवर. ” शम्मी थरथरत होती. जान्हवीने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या लक्षात आले की शम्मीच्या हातावर काळे निळे वळ होते. जसे काही कोणाची तरी बोटे उमटली असावीत.
“हे काय आहे गं? हे वळ कसले? ” जान्हवीने काळजीने विचारलं.
“कसले वळ आई? मला नाही माहीत. ” शम्मीने आपल्या हातांकडे पाहिलं आणि ती मुसमुसायला लागली.
सुधीरने जान्हवीला इशारा केला तशी ती शम्मीला घेऊन खोलीबाहेर आली.
“तू राजवाडेकाकांना फोन करून विचारतेस का जान्हवी? ” एकांतात सुधीरने जान्हवीला प्रश्न केला. त्याने सर्वात आधी फोन करून आपल्या साईटवरच्या माणसाला बोलवून खोली ताबडतोब रंगवून घेतली होती.
“हो विचारते पण सुधीर या घरात काही वावगं नाही ना! ”
“हम्म! काय वावगं असणार? तू फोन करून विचार काकांना. ”
राजवाडेकाका, जान्हवीच्या बाबांचे जुने मित्र. मुरलेले मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबईला त्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टीस होती. आता वयोमानानुसार त्यांनी प्रॅक्टिस कमी केली असली तरी काही निवडक केसेस ते हाती घेत.
“काका, तुमचा सल्ला हवा होता. ” जान्हवीने तातडीने काकांना फोन लावला आणि घडला प्रकार सांगितला.
“वयांत येणार्या मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांबाबत इतरांशी बोलावे, अडचणी सोडवून घ्याव्यात इतक्या समजूतदारपणाची अपेक्षा त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकत नाही आणि मग या बदलांना तोंड वेगवेगळ्या प्रकारे फुटते. मुले या काळात मूडी बनतात, आई-वडिलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मित्र-मैत्रिणींवर अधिक अवलंबून राहतात किंवा आपल्याकडे आईवडीलांचे लक्ष वेधून घेण्याचे नवीन मार्ग अवलंबतात. शम्मी कदाचित तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असावी. ”
“म्हणजे कसे? ” जान्हवीने कुतूहलाने विचारले.
“तुला माझी एक केस सांगतो. एका सधन, सुशिक्षित घरातील नवरा बायको येऊन मला सांगायला लागले की त्यांच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या पाठीवर कुणीतरी फुल्या काढते, तिचे केस कुणीतरी ओढते आणि असे बरेच काही. आई-वडील हा भुताखेताचा प्रकार आहे म्हणून हवालदिल झाले होते. प्रत्यक्षात मात्र वाढत्या मुलीला आपल्या व्यवसायांत सतत व्यग्र असणार्या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यांना काय सांगावे कसे पटवावे हे तिला कळत नव्हते पण असे काहीतरी केल्यावर आई-वडील आपल्याकडे लक्ष पुरवतात ही कल्पना तिला आली होती. शम्मीची केसही अशीच असावी का हे तूच मला सांग. या नव्या घरात तुम्ही आलात. तिची शाळा बदलली, परिसर बदलला, मित्र-मैत्रिणी बदलल्या याचा त्रास तिला होत असावाच ना आणि तो नेमक्या शब्दांत व्यक्त करता येतही नसावा कदाचित. आणखीही काही बदल असतील तर सांग बघू. ” काकांच्या बोलण्यात तथ्य वाटत होते.
“काका, या नवीन घरात शम्मीला आम्ही तिची स्वतंत्र खोली दिली. घर मोठं आहे, खोल्याही आहेत. तिलाही पसंत होती. अक्षय मात्र अजूनही माझ्या बाजूला झोपतो. हे कारण असेल का? ”
“असावे, असू शकते. शम्मी काही फार मोठी झालेली नाही. स्वतंत्र खोली हा विचार रात्री एकटं झोपायची वेळ येईपर्यंत उत्तम वाटतो परंतु एकांतात आई आपल्या लहान भावावर आणि आपल्यावर एकसमान प्रेम करत नाही अशी भावना मनात येऊ शकेल. शम्मीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून बघ. तिला रोज नाही तरी अधेमधे तुमच्याबरोबर झोपायचे असेल तर तशी परवानगी दे. शाळेत जाऊन तिच्या टीचर्सशी बोल. एखाद्या टीचरचा किंवा वर्गातील मुलामुलींचा तिला त्रास होतो का याची चौकशी कर.... ”
“काका, एक सहज प्रश्न विचारू? या सर्वामागे शम्मी नसून खरंच काही वेगळं असेल तर? ”“अगं वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना? ”
जान्हवीच्या मनात काकांना तो भांडणाचा प्रसंग सांगण्याचे आले होते पण तिने स्वत:ला थांबवले. सुधीरच्या आणि सासूबाई-दादांच्या कानावर तिने काकांचा सल्ला घातला. सकाळी झालेल्या प्रकाराने सासूबाई थोड्या काळजीत होत्या.
“शम्मीला रात्री आमच्याबरोबर झोपू दे. नको तिला खोलीत एकटीला. माझी झोप गाढ नसते हल्ली. लक्ष राहील तिच्यावर. ”
“चालेल आई तसे करू. ” सासूबाईंचा बदलेला सूर जान्हवीला धीर देऊन गेला पण दिवसभरात तिच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. "खरंच! शम्मी असं काही करत असेल? " आणि काकांचे शब्दही मनात पिंगा घालत होते. - वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना!
रात्री सासूबाईंनी शम्मीला आपल्याजवळ झोपायला घेतले. अक्षय आणि सुधीरही झोपायला बेडरूममध्ये गेले होते. मागचं उरकून जान्हवी झोपायला आली आणि गादीवर टेकली. सुधीर आणि अक्षय शांत झोपले होते. तिने अक्षयच्या अंगावरची चादर सारखी केली आणि खिडकीकडे कूस बदलली. थंडगार वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती. तिने आपल्या अंगावरही चादर ओढली अन डोळे मिटले. किती वेळ गेला कोणजाणे, जान्हवीचा डोळा लागत होता.
“घर माझं आहे. सोडून जा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ” कुणीतरी कानात कुजबुजलं तशी जान्हवी ताडकन उठून बसली.“सुधीर, सुधीर ऊठ. कुणीतरी आहे इथे. ” जान्हवीचा आवाज घाबरा झाला होता.“काय आहे? ” सुधीर पुटपुटला.“अरे कोणीतरी कानात कुजबुजत होतं माझ्या कानात? ”“काहीतरीच काय? प्लीज झोप. मला लवकर उठायचं आहे उद्या. ”
जान्हवीने पुन्हा उशीवर डोके टेकवले. १०-१५ मिनिटे शांततेत गेली असावीत. पुन्हा तिच्या कानात तोच आवाज घुमला. यावेळेस आवाज गेल्यावेळेपेक्षा स्पष्ट होता आणि निर्जीव. जान्हवीच्या अंगावर काटा फुलला.
“सुधीर ऊठ रे. खरंच कोणीतरी आहे इथे? ”“कुठे? कोण आहे? ” सुधीर झोपाळलेल्या आवाजात म्हणाला तरी त्याने जान्हवीचा थरथरता आवाज ऐकला होता.“असं कर. तू माझ्या जागेवर झोप. मी खिडकीकडे झोपतो. ”
दोघांनी जागांची अदलाबदल केली आणि अगदी पाच मिनिटांत सुधीर घोरायला लागला. जान्हवीचा डोळा अद्याप लागला नव्हता पण तिने डोळे गच्च मिटून घेतले होते.
“च्यायला! हे काय आहे? ” आता सुधीर उठून बसला होता. “माझ्याही कानात कोणीतरी बोलत होते. इतका थंडगार निर्जीव आवाज मी कधी ऐकला नव्हता. ” त्याने जान्हवी आणि अक्षय दोघांना जवळ घेतले. जान्हवीला हुंदका फुटला.
“सुधीर, काहीतरी आहे रे या घरात. ”
“मी चौकशी करतो. आजूबाजूचे, शेजारी, दुकानदार कोणाला तरी माहीत असेलच. ” दुसर्या दिवशी सकाळी घराबाहेर निघताना सुधीर म्हणाला. “मी निघतो आता. तुम्ही सगळे सांभाळून राहा. ”
“सुधीर, हे घर सोडता येईल का रे? ” जान्हवी बिचकत म्हणाली. प्रश्नाचे उत्तर काय असावे ही कल्पना तिला होती.“कठिण आहे गं. पैसे गुंतवून बसलो पण तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू. अशा घरात फार दिवस राहण्यात अर्थ नाही हे मलाही कळतंय. आई-दादा, तू, मुलं यांच्यापेक्षा पैसा मोठा नाही. तू राजवाडेकाकांना बोलावून घेतेस का? ते काय म्हणतात ते बघू किंवा एखादा शांतीपाठ करूया का?“आपण गृहप्रवेशाची पूजा घातली होतीच ना रे. असे उपाय काम करतात का ते कळत नाही. त्यापेक्षा मी राजवाडेकाकांना फोन लावते. ”
राजवाडेकाका येईपर्यंत घरात बरेच काही घडून गेले होते. कधी पावलांचे दणदणा आवाज, कधी खोल्यांतील सामान अस्ताव्यस्त होणे. एके रात्री जान्हवीला आपल्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याचा भासही झाला पण तिला स्वत:पेक्षा मुलांची काळजी लागून राहिली होती. सासूबाईंचे ब्लडप्रेशरही थोडे वाढले होते. दादांनाही अस्वस्थ वाटत होते. आपल्या सर्वांव्यतिरिक्त घरात कोणीतरी आहे ही जाणीव प्रत्येकालाच होत होती. घराचे एकूण स्वास्थ्य बिघडले होते. राजवाडेकाका लोणावळ्याला आले त्यानंतरची गोष्ट...
राजवाडेकाका आणि दादा बैठकीच्या खोलीत चहा घेत बसले होते. शम्मी शाळेत, सुधीर साईटवर, जान्हवी आणि सासूबाई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या. अक्षय घरातच खेळत होता. अचानक, दादांना त्याची हाक ऐकू आली.
“आजोबा, मी उडी मारू? ”
अक्षय वरच्या मजल्यावर पायरीच्या अगदी टोकाशी उभा होता. दादांनी त्याचे बोलणे नीटसे ऐकले नव्हते.
“अरे मागे हो. किती कडेशी उभा आहेस. पडशील. ” म्हणत ते उभे राहिले.“उडी मारू का आजोबा? हा काका म्हणतोय की मार. ”
राजवाडेकाका आणि दादा दोघे ताडकन पायर्यांपाशी आले. दादांनी क्षणाचा उसंत न घेता पायऱ्या चढायला सुरुवात केली पण तोपर्यंत अक्षयचा पाय वरच्या पायरीवरून सटकला होता...
“सुधीर, हे घर घेताना चौकशी केली होती? काही पूर्वातिहास वगैरे? ” राजवाडेकाकांनी विचारले.
“पूर्वातिहास...म्हणजे” सुधीरचा आवाज अडखळला.. “या बंगल्याचा केअरटेकर होता गुलाबराव. दारुड्या होता. बंगला त्याच्या ताब्यात. मालकाच्या ऐटीत तोच वापर करत असे. माणूस मोठा रंगेल होता आणि बदमाशही असं म्हणतात. मी आजूबाजूला, किराणा दुकानात चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्यावर्षी या घरातच त्याचा मृत्यू झाला. त्यात अनैसर्गिक काही नव्हते, अतिदारूपानाने मेला. दर दोन दिवसांनी बाहेरची बाग राखायला माळी येतो त्याला बंगल्यात हालचाल दिसली नाही तेव्हा घर फोडले. स्वयंपाकघराच्या भिंतीशी त्याचा देह मिळाला. ”
“दादा, मला त्यात काही गैर वाटले नाही. घर रिसेलचे होते, नवे नाही. प्रत्येक घरात काही ना काही किस्से घडलेले असतातच. ”
“गैर वाटले नाही? पोराच्या जिवावर बेतले आज. काही वेडेवाकडे झाले असते म्हणजे. गेले किती दिवस घरातले वातावरण बिघडले होते. ” सासूबाई जान्हवीकडे बघत म्हणाल्या.
जान्हवीचे डोळे पाण्याने भरले. “स्वयंपाकघरात... " तिच्या अंगावर शहारे आले. "मला या घरात राहायचे नाही. ”
“मी काही बोलू का? ” राजवाडे काका म्हणाले. “मला अक्षयला काही विचारायचे आहे. अक्षय राजा, तुला कोणी सांगितले पायरीवरून उडी मारायला? त्या काकाला काही नाव आहे का? ”
“लाकशश काका. ”
“काय म्हणतोय गं हा? ” राजवाडेकाकांनी काही न कळून विचारले तशी जान्हवीने अक्षयला पुन्हा तोच प्रश्न केला.
“लाकशश काका. त्या भिंतीवर होता ना. ” स्वयंपाकघराकडे बोट दाखवत अक्षय म्हणाला.
“राक्षस काका" विस्मयाने जान्हवी म्हणाली आणि तिला त्या भिंतीवरील धब्ब्यांची आठवण झाली. त्या धब्ब्यांत अक्षयला राक्षस दिसला होता आणि तो गुलाबराव त्याच भिंतीपाशी.... तिने अक्षयला जवळ घेतले आणि ती मुसमुसू लागली. “माझ्या मुलांच्या जिवावर उठला आहे राक्षस मेला. ”
“किंवा तुम्हाला फक्त घाबरवायचा प्रयत्न करतो आहे. ” राजवाडेकाका म्हणाले.
“याला विश्वास म्हणावे की नाही ते मला माहीत नाही. वैद्यकशास्त्रात या जगातील प्रत्येक गोष्ट नमूद आहे असे नव्हे. इथे या घरात भूत, पिशाच्च, हैवान आहे असंच मला म्हणायचं नाही. कदाचित, चुंबकीय क्षेत्र असेल, एखादी ऊर्जा किंवा शक्ती असेल पण सोयीसाठी गुलाबरावाचे भूतच आहे असे मानू. प्रश्न हा आहे की ही शक्ती तुमच्या जिवावर उठली आहे किंवा तुम्हाला घाबरवते आहे का? तर मला वाटते हो. सध्या घाबरवते आहे पण तुम्ही घाबरत नाही म्हटल्यावर पुढचा प्रयत्न करून बघेलच आणि हे काही भूतपिशाच्चांबाबत होते असे नाही तर आपण सर्वच एक उपाय चालत नाही म्हटल्यावर दुसरा करून बघत असतो त्यातलाच प्रकार आहे.
आपण मानूया की इथे गुलाबराव नावाचा अमानवी हैवान आहे आणि पुढे चलू. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याच्या नजरेत तुम्ही परके आहात आणि या घरावर कब्जा करून आहात. म्हणतात की कधीतरी काळ एका क्षणी गोठतो. ती ऊर्जा त्या जागी, त्या वेळी सीमित होते. वैज्ञानिक भाषेत याची तर्कनिष्ठता पडताळून पाहता येईलच असे नाही पण गुलाबराव या घराशी अद्याप बांधलेला आहे हे टाळता येत नाही. आता पुढचे तुम्ही ठरवायचे. एक कुटुंब म्हणून तुम्हाला या घरात राहायचे आहे का ते? मला असं वाटतं की हे प्रकार बंद होणार नाहीत. पूजापाठ, शांतीपाठ यांनी फरक पडतो असे मला वाटत नाही. फारतर वातावरण बदलते, श्रद्धेचे बळ मिळते. अशा बदलेल्या वातावरणाचा फायदा तुम्हाला होईल पण तो तात्पुरताही असू शकतो. ”
“मला अजिबात इथे राहायचे नाही. ” जान्हवीने निकराने सांगितले. “माझ्या मुलांना घाबरवेल, त्यांच्या जिवावर उठेल अशा जागी मला राहायचेच नाही. काका, हे घर सोडले तर हा उच्छाद थांबेल ना. हे घर त्या गुलाबरावालाच लखलाभ होवो. ”
“थांब! इथे मुलांना घाबरवण्याचे प्रयत्न आहेत असं मला वाटत नाही. एक लक्षात घे. या घरातली सर्वात घाबरलेली व्यक्ती आहेत तू. तू दिवसभर घरात असतेस, तुला मुलांची काळजी आहे, घराची, नवर्याची, सासू-सासर्यांची काळजी आहे. मी तुला म्हटले तसे ही शक्ती या घराचा ताबा मागते आहे, या घरावर मालकी हक्क दाखवते आहे. अनेकांचे अनुभव सांगतात की अशा शक्ती त्या जागेपुरत्या मर्यादित असतात. घर सोडणे हा उत्तम पर्याय आहे पण अशा शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाही. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याची इच्छा, वासना, हक्क या घरावर असल्याचे तो तुम्हाला दाखवून देतो आहे. मला वाटतं की विषाची परीक्षा न बघता तुम्ही हे घर सोडावेत. बाकी निर्णय तुमचा आहे. ” राजवाडेकाकांनी सुधीरकडे पाहत म्हटले.
“काका, घर सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. ”
“अरे, हा रोजचा त्रास आणि भीती बाळगणं सोपं आहे का रे? ” सासूबाई अक्षयच्या पायावरून हलकेच हात फिरवत म्हणाल्या. दादांनीही राजवाडेकाकांच्या मताला अनुमोदन दिले. जान्हवी तर काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. शेवटी, सुधीरने मुंबई-पुण्यात निदान भाड्याने घर घ्यावे असे ठरले आणि तोपर्यंत शांतीपाठ करून घ्यायचा असा सर्वांनी निर्णय घेतला.
***
घर घेई-घेईपर्यंत पुढचे तीन चार महिने गेलेच. साग्रसंगीत शांतीपाठाने घरातले वातावरण निवळल्यासारखे झाले होते. या तीनचार महिन्यांत त्रास झाला नाही असे नाही पण जिवावर बेतेल असे काही झाले नाही. कदाचित, लवकरच आपल्याला घराचा ताबा मिळणार आहे हे गुलाबरावलाही कळले असावे.
कोथरुडसारख्या गजबजलेल्या वस्तीत सुधीरने फ्लॅट घेतला तेव्हा जान्हवीला हायसे वाटले. शहरात वातावरण कसं मोकळं असतं. माणसांची, वाहनांची वर्दळ, रोजच्या कामांत माणूस इतका गुंतलेला असतो की वेडेवाकडे विचार करायलाही त्याला वेळ नसतो. शाळेचे वर्ष संपत असताना शम्मीची ऍडमिशन होणे कठिण झाले होते पण ओळखी काढून सुधीरने कशीबशी शम्मीच्या शाळेची व्यवस्थाही केली. जान्हवीने अक्षयलाही बालवाडीत घातले होते. पुढल्या वर्षी त्याचीही शम्मीच्या शाळेत ऍडमिशन होणार होती. या नव्या घरात कसं सर्व सुरळीत झालं होतं.
“जान्हवी, इथे जरा स्वयंपाकघरात येतेस का? ” सासूबाई स्वयंपाकघरातून बोलावत होत्या.
“आले हं! ” जान्हवीने हातातील शर्ट टाकला आणि ती बेडरूमच्या दरवाज्याकडे वळली. दारात तिची पावलं एकदम थबकली. तिला आठवलं की आज ती घरात एकटीच होती. सासूबाईंना झाल्या प्रकारातून थोडासा बदल हवा होता म्हणून दादा आणि सासूबाई आज सकाळीच मेधाकडे बडोद्याला गेले होते. जान्हवीच त्यांना सकाळी बसमध्ये बसवून आली होती.
राजवाडेकाका म्हणाले होते, ' या शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.'
गुलाबराव आता त्या घराशी बांधलेला नव्हता.....
(एका तथाकथित सत्यघटनेवर आधारीत)