प्रकार

Thursday, December 04, 2008

का?

कितीतरी दिवसांत या ब्लॉगवर काही लिहिलं नाही. हल्ली लिहावसं वाटत नाही. लिहिण्यासारखं काही नसतं.वेळ नसतो, वाचन नसतं, इच्छाही नसते. मनात येणारे विचार मूर्त स्वरूपच घेत नाहीत. का त्यांनी मूर्त स्वरूप घेऊ नये अशी माझी इच्छा असते? ठरवण्यात मी असमर्थ आहे.

जेव्हा लिहिता येत नव्हतं तेव्हा लिहिण्याची जबरदस्त इच्छा होती, मनात आलेलं सर्व उतरवून ठेवावसं वाटायचं. जसजसं लिहिता येऊ लागलं तसतसे विषय कमी होत गेले. मनापासून लिहिण्याची ओढ कमी झाली. लोक वाचू लागले, लेखन त्यांच्यासाठी येऊ लागले. माझ्यासाठी काहीच नाही.

अजूनही मी लिहिते - लेख उतरतात पण ते माझ्यासाठी लिहिलेले नसतात. लोक वाचतात, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल, त्यांना पटेल असं लिहिते. लोक ओळखतात, लेखन ओळखतात, शैली ओळखतात, चुका दाखवतात, अपेक्षा करतात. मी त्या पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करते. पण माझ्या अपेक्षा अपूर्ण राहतात. मला काय लिहायचं आहे हे ठरवता येत नाही. लोकांना काय वाचायचं आहे याचा मात्र कधीतरी ठाव घेता येतो. लेखनातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. अतृप्ततेची भावना मनात सतत घोटाळते. काहीच साध्य होत नसल्याची तक्रार डोक्यात असते. अस्वस्थता इतरांवर फटके मारण्यास भरीला का पाडते याचे उत्तर मिळत नाही.

मी माझ्यासाठी लिहित नाही. का? कारण शोधते आहे.

marathi blogs