वळणावर ती येते
हल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून लवकर निघताही येतं. संध्याकाळी क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतर माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.
पहाटेचा मी घराबाहेर पडतो तेव्हा बाहेर मिट्ट काळोख असतो. गाडीच्या प्रकाशात रस्ता दिसतो तेवढाच, बाकी सर्वत्र अंधाराचे राज्य. गेले आठ-दहा दिवस मी मुख्य रहदारीचा सोडून एक लहानसा शॉर्टकट घेतो आहे. हा रस्ता एकपदरी आणि अरुंद आहे, वळणावळणांचा नागमोडीही आहे. गाडीचा वेगही बराच कमी ठेवावा लागतो पण मायलेज आणि गॅस बर्यापैकी वाचतो आणि धडधडत ऑफिस गाठण्यापेक्षा रमत गमत, शीळ घालत, पहाटेचा वारा खात जाण्यात काही और मजा असते. ऑक्टोबर लागल्यापासून गेले काही दिवस हवा थंड झाली आहे तरी गाडीच्या काचा खाली सरकवून आरामात प्रवास होतो. या रस्त्याच्या एका बाजूला मोठा तलाव आहे आणि दुसर्या बाजूला रान माजलं आहे. त्या रानामागे उंचच उंच झाडं पसरली आहेत. काळोखात तळ्यातल्या पाण्यावर शुभ्र धुकं तरंगताना काहीतरी रहस्यमय आकार घेताना दिसतं. पहाटेच्या मंद वार्यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकता येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशात संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात प्रवास करताना एक अनोखा थरार जाणवतो. मात्र निसर्गाचं हे लोभस रुप हे एवढेच हा शॉर्टकट घेण्याचे कारण नाही.
मुख्य रस्ता सोडून या लहान रस्त्याला लागलं की फर्लांगभर अंतरावर रस्ता अचानक वळतो. इथे गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो, फारतर ५-१० मैल. गाडीने वळण पूर्ण केल्याशिवाय पुढे काय आहे याचा पत्ताही लागत नाही. वळण धोकादायक असल्याची पाटीही येथे दिसते. वेग किंचित जास्त असेल तर बाजूच्या झाडावर आपटून किंवा समोरून येणार्या वहानाने धडक दिल्याने कपाळमोक्ष ठरलेला. आधीही बरेच अपघात झाले आहेत म्हणतात इथे पण इतक्या पहाटे इथे वर्दळ नसते आणि गेल्या आठ दिवसांत मी हे वळण अंगवळणी पाडलं आहे...... कारण वळणावर ती दिसते.
भल्या पहाटे फेरफटका मारायची सवय असावी तिला. पांढरा सफेत टिशर्ट आणि पँट घालून पाठीवर रुळणारे केस सावरत रोज ती याच वळणावर नजरेस पडते. चंद्रप्रकाशात तिचं रुप पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मती गुंग होणे म्हणजे नेमकं काय ते कळून आलं. इतकं अप्रतिम लावण्य घेऊन स्वर्गातली अप्सरा तर रोज इथे येत नसावी ना अशी शंका मनाला चाटून गेली आणि भारावल्यासारखा रोज मी या वाटेने येऊ लागलो. गाडीचा वेग वळणावर कमी केला की तिला निरखण्यात जो आनंद जिवाला होतो त्याचं वर्णन शब्दांत केवळ अशक्य आहे. त्या वळणावर केवळ क्षण दोन क्षण ती मला दिसत असावी. नंतर माझी गाडी वळते आणि ती दिसेनाशी होते पण त्या एका झलकेसाठी मी वेडा झालो आहे. कधीतरी तिला थांबवून विचारण्याचा, तिची चौकशी करण्याचा मोह होतो पण अजून हिम्मत बांधलेली नाही. तिची ओळख काढायची अनिवार इच्छा आहे हे निश्चित, मात्र काहीतरी रहस्यमय आहे तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचतं आणि थांबवूनही ठेवतं.
तिच्याशी ओळख काढून घ्यायला मी का थांबलो आहे यावर गेले काही दिवस विचार करतो आहे. माझी भीड, सभ्यता की आणखी काही? तसा मी बायकांच्याबाबत प्रसिद्ध नसलो तरी माझं व्यक्तीमत्व कोणावरही छाप पाडणारं आहे. बायकांशी सभ्यतेने बोललं की त्यांच्याकडून फारसा विरोध होत नाही ओळख करून घेण्यात असा अनुभवही गाठीशी आहे.
वळणावर गाडीचा वेग कमी केला की तिच्याकडे क्षणभर का होईना निरखून पाहता येतं. ते काळेभोर केस, कपाळावर रुळणार्या बटा, सरळ चाफेकळी नाक, नाजूक जिवणी आणि डोळे. तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण नाही..नाही निष्प्राण कसे असतील? पण थिजलेले आहेत. ते डोळे तर मला तिच्याशी ओळख वाढवून घेण्यापासून थांबवून ठेवत नाही ना हा प्रश्न मनाला मी दोन चारदा विचारला आहे पण निश्चित उत्तर मिळत नाही. तिच्याकडे पाहून काल स्मितहास्यही केलं होतं पण तिच्या त्या डोळ्यांत अस्पष्ट कुतुहलाखेरीज दुसरे कुठले भाव दिसले नाहीत.
आज घरातून निघताना लक्षात येतं आहे की आकाशात ढगांची गर्दी जमलीये. चंद्र क्वचित ढगांआडून बाहेर डोकावतो आहे तेवढाच. गाडीत बसता बसता पावसाचे दोन थेंब डोक्यावर शिडकतात. 'आज येईल का ती?’ मनात तिचेच विचार घोळत असतात. पावसाला सुरुवात होते. ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर? आज तिचं दर्शन होणार नाही. एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं? ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. काय विचारायचं? तिला काहीतरी विचारायचं असं मी मनाशी ठरवलं होतं पण नेमकं काय ते उलगडत नव्हतं. जिवाची घालमेल होत होती.
गाडी मुख्य रस्ता सोडून शॉर्टकटला लागली तेव्हा पाऊस रिपरिपत होता. रोजच्या वेगापेक्षाही मी थोड्या कमी वेगातच गाडी हाकत होतो. वळणावर ती येईल या आशेवर.
आणि वळणावर ती उभी होती. ओलीचिंब. तिचे ओले कपडे तिच्या भरदार शरीराला चिकटून बसले होते आणि तिच्या सौष्ठवाची जाणीव प्रकर्षाने करून देत होते. ओलेत्या बटा कपाळाला चिकटल्या होत्या. ती त्या मागे न सारता तशीच उभी होती. जशी कुणाची तरी वाट पाहत असावी. मी गाडी थांबवली, काच खाली सरकवली आणि चटकन गाडी अनलॉक केली.
"या लवकर, आत बसा. मी सोडतो घरी. " ती आत येईल की नाही अशी शंका मनाला चाटून गेली. तिने शांतपणे दरवाजा उघडला आणि ती सावकाश आत येऊन बसली. मी गाडी सुरु केली.
"कुठे सोडायचं तुम्हाला? " मी सहज आवाजात विचारलं.
"इथूनच पुढे. " ती माझ्याकडे न पाहता काचेतून सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता पण एक अनामिक रुक्षपणा त्यात भरलेला होता. घरी पोहोचण्याची घाई त्यात नव्हती की अनोळखी माणसाबरोबर त्याच्या गाडीत बसल्याची भीती. तिच्या आवाजात माझ्याशी बोलण्याची उत्सुकताही दिसत नव्हती. तरीही तिला बोलतं करणं भाग होतं. मी तिला मोजक्या शब्दांत माझी करून दिली. मी काय करतो, कुठे राहतो हे सांगता सांगता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती, वातावरणात गारवा होता. ती ओलीचिंब होती पण तिच्या अंगावर शहारा नव्हता. तिला थंडी वाजत होती किंवा ती थंडीने थरथरत असल्याचे मुळीच जाणवत नव्हते. मी तिच्या गोर्यापान भिजलेल्या हातांकडे बघत होतो. अचानक तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला आणि ओळख करून दिल्यावर मी एक हात स्टिअरींगवर घट्ट रोवून दुसरा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. तिने सावकाश नजर माझ्याकडे वळवली आणि माझा हात हातात घेतला.
एक जबरदस्त सणक माझ्या डोक्यात गेली.....तिचा हात बर्फासारखा थंड होता. जिवंत माणसाचा हात असा थंड नसतो. त्यात धुगधुगी जाणवते, ती तिच्या स्पर्शात जराही नव्हती. मी कोणाबरोबर गाडीत बसलो होतो? माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण? मी गोंधळलो आहे पण घाबरलेला नाही.
"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.
"माझा? " मी चकित झालो होतो. तिची नजर आता माझ्यावर रोखलेली होती पण त्यात आता कुतूहल नव्हते एकतर्हेचा विषाद जाणवत होता.
"आठ दिवसांपूर्वी, " ती क्षणभर थबकली आणि पुढे बोलू लागली "तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलेत आणि तेव्हापासून रोज त्या वळणावर आपण एकमेकांना दिसतो. "
"हो, " मी आवंढा गिळला.
"वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघात झाला होता. तेव्हापासून मी इथे... " म्हणजे माझी शंका खरी होती. ही तरुणी जिवंत नाही. तिचे ते थिजलेले डोळे, मोकळे केस, पांढरे कपडे सर्वांचा संदर्भ लागत होता. माझ्या गाडीत, माझ्या शेजारी बसलेली ही बाई मानवी नाही... पण मला जे विचारायचे होते ते हे नव्हतेच ते तर यापुढे होते.
"आणि मी? " माझे शब्द घशात विरतात का काय वाटून गेले.
पाऊस थांबला होता. चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला होत होतं. चंद्रप्रकाशात आता समोरचा परिसर उजळून निघाला होता.
“मी इथे कधीपासून?”
"आठ दिवसांपासून. मी तुम्हाला वळणावर दिसले आणि रस्ता वळताना तुम्ही पुन्हा मागे वळून पाहिलंत. " ती पुन्हा तेच सांगत होती पण या वेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. हेच तर तिला गेले आठ दिवस विचारायचं होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर आज माझं मलाच मिळालं होतं.
तिला पुन्हा एकवार पाहावं म्हणून मी त्या दिवशी गाडीच्या रिअर-मिररमध्ये डोकावून पाहिलं होतं पण आरशात कोणीच दिसलं नाही तेव्हा चमकून मान वळवून मागे पाहिलं होतं आणि त्या वळणावर गाडीवरचा ताबा सुटला होता.