भिकारीण
“इतक्या थंडीच्या सकाळी काय रे खरेदीला निघायचं सुचलं आज?” घराबाहेर पडलो तसे हातात हातमोजे सरकवत मी नवर्याकडे नाराजीने तक्रार केली. कालच अर्धा फूट हिमवर्षाव झाला होता आणि आज तापमापीचा पारा शून्याखाली ८-१० डी. सहज उतरला असावा. रविवारच्या दिवशी दुलईत पडून राहण्यापेक्षा धडपडत खरेदीला निघायची माझ्यामते अजिबात गरज नव्हती.
“अगं कारने तर जाणार. ख्रिसमसचे दिवस आहेत. मॉल लवकर उघडतोय. सेल आहे. खरेदीही करायची होतीच. उरकून टाकू की सकाळीच मग दिवस मोकळा! नाही का?” त्याने कारचे इंजिन सुरू केले आणि गाडीचा हीटरही सुरू केला. रस्ते निसरडे झाले होते, त्यात बोचरं वारं आमच्याकडे पाचवीला पुजलेलं. सावकाश गाडी हाकत आम्ही मॉलदर्शन घेतलं. मागच्या सीटवर लेकही सकाळी उठायला लागल्याबद्दल नाराज होती.
कुरकुरत का होईना पण आमची खरेदी नेहमीप्रमाणेच व्यवस्थित झाली. पैशांनी किती गोष्टी खरेदी करता येतात? या प्रश्नाला बर्याच आणि थोड्याशाच असे दुहेरी उत्तर आहे. मॉल्समध्ये गेले की आपल्याकडे पैसे असल्याचा आनंद आणि आपल्याकडे पैसे नसल्याचे दु:ख एकत्रित मिळून जाते. जे हवे असते त्याच्या किंमती परवडत नसतात आणि जे नको असते ते हमखास निम्म्या किंमतीला मिळत असते.
खरेदी झाली तेव्हा सकाळ उलटायला आली होती. “किती फिरफिर फिरलो रे या दोन चार दुकानांतच? वेगळा व्यायाम करायची गरजच नसते नाही या मॉलच्या चकरा मारल्या की. जीममध्येही पैसे देऊनच व्यायाम करतो आपण. इथे पैसे देऊन खरेदी करता करता व्यायाम होतो.” माझ्या टोमणामिश्रित विनोदाचा नवर्यावर गेली कित्येक वर्षे काहीही परिणाम होत नाही. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून खरेदीच्या पिशव्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि कार सुरू केली.
दिवस वर आला असला तरी बाहेर थंडी मी म्हणत होती, वारंही सुटलं होतं. रस्त्यांच्या बाजूला बर्फाचे ढिगारे दिसत होते, रस्त्यांचा निसरडेपणाही जसाच्या तसा होता. हे असले दिवस नेहमीच नकोसे वाटतात त्यात मला, आता घरी जाऊन स्वयंपाकाचा श्रीगणेशा करायचा या कल्पनेने वैताग आला होता.
“सगळी सकाळ इथे गेली आता घरी जाऊन भूक भूक कराल, “ कंटाळलेल्या सुरात मी तक्रार केली.
“अगं ब्रंच करून जाऊ, आता कुठे घरी जाऊन स्वयंपाक करत बसणार.” हा समजुतीचा स्वर मला भयंकर प्रिय आहे. मागच्या सीटवरूनही सकाळपासून पहिल्यांदाच आनंदी हुंकार ऐकू आला. गाडी "ल पीप"च्या दिशेने वळली तशी पोटात आगीचा डोंब उसळल्याची जाणीव झाली. तसंही बाहेर खायचं म्हणजे सडसडून भूक लागतेच लागते. रेस्टॉरंटातल्या उबदार वातावरणात तर ती आणखीच प्रज्वलित होते असा नेहमीचा अनुभव आहे.
खाऊन बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो. समोरच्या सिग्नलला गाड्यांची बरीच गर्दी झाली होती. वेग मंदावून नवर्याने खिसे चाचपडायला सुरुवात केली.
“काय रे काय झालं? पाकीट, सेल विसरला तर नाहीस रेस्टॉरंटात? काय शोधतो आहेस?”
“काही नाही, पाकीटच शोधत होतो. जरा एक डॉलर काढशील.” त्याने हात स्टीअरींगवर पुन्हा ठेवत म्हटले.
“एक डॉ. कशाला रे?”“समोर बघ सिग्नलजवळ एक भिकारीण दिसत्ये, तिला देतो.”
सिग्नलपाशी एक मध्यमवयीन बाई कळकट कोट, टोपी, हातमोजे घालून थंडीत कुडकुडत उभी होती. हातात "गरीबाला मदत करा" लिहिलेला एक पुठ्ठ्याचा बोर्ड होता.
“हं? सर्व सोडून भीक द्यायला कुठे निघालास?” मी आश्चर्याने विचारलं, "काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ” किती वर्षांनी भीक द्यायची वेळ आली होती कोणास ठाऊक. मागच्यावेळी नेमकी कधी भीक दिली ते आठवणेही कठिण होतं.
“असू दे गं. ती भीक मागते आहे इतक्या थंडीची. आपल्याला दोन क्षण बाहेर राहणं कठिण होतंय आणि ती केव्हाची उभी आहे कोण जाणे? सणाचे दिवस आहेत दिला एक डॉलर तर काय मोठा फरक पडणार आहे.”
“प्रश्न फरक पडण्याचा नाही, पण मग चार भिकारी उभे असते तर चारांनाही भीक दिली असतीस का? आणि भीक मागणे हा तिचा नाइलाज नसून धंदा असेल तर? ज्या पैशांसाठी आपण राबतो त्यातला एक पैसाही ऐतखाऊंना का द्यायचा?” गाडी अद्यापही गर्दीत अडकून होती.
“किती विचार करते आहेस एका क्षणात. मी इतका विचारही केला नव्हता. आनंदाचे दिवस आहेत. आपण खरेदीला निघालो. मनपसंत खरेदी झाली, बाहेर खाणं झालं. एखाद्या आनंदाचा क्षण त्या भिकारणीलाही देता येईल असं वाटलं. या मॉल्समध्ये आपण जातो, मूळ किंमतींच्यापेक्षा कितीतरी किंमत त्यातल्या वस्तूंसाठी मोजतो. त्या काउंटरवरल्या पोरींचं खोटंखोटं स्मितहास्य, दिव्यांची रोषणाई, सजावट या सर्वांचा फुकट खर्चही आपण भरतो. रेस्टॉरंटात गेलो तर वेटरला टीप दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. असं तो वेटर काय अधिकच करतो आपल्यासाठी? पण रीत म्हणून आपण त्याला पगार मिळत असतानाही टीप देतो. मग जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि तरीही दिला तिला आपल्या आनंदातला थोडासा हिस्सा एके दिवशी तर काय मोठा पहाड कोसळला? काहीतरी नसेल तिच्याकडे जे आपल्याकडे आहे. काहीतरी असेल जे तिला भीक मागायला प्रवृत्त करतंय आणि आपणही कधीतरी नकळत भीक मागतो. अगदी आपल्या हक्काच्या सुट्टीचीही भीक मागावी लागते ऑफिसात.”
“हो पण देण्याचंच झालं तर संस्था, अनाथालये वगैरे आहेत ना.” मी माझा हेका सोडला नाही.
“त्यांनाही देतोच ना! की देतच नाही? जे आपल्याकडे आहे ते जर त्यांच्याकडे नसेल तर प्रत्येकवेळीच मोजूनमापून विचार करून दुसर्याच्या पदरात टाकावं असं थोडंच आहे?” त्याने थोडंसं वैतागून विचारलं.
गाडी एव्हाना त्या भिकारणीच्या जवळ सरकली होती. त्याने गाडीची काच खाली केली तशी भप्पकन गार हवेचा झोत अंगावर आला आणि सर्वांगावर नकोशी शिरशिरी आली. तिने काच खाली झाल्याचं हेरलं असावं. ती लगबगीने खिडकीच्या दिशेने आली आणि आशेने खिडकीत डोकावत थंडीने गारठलेली मूठ तिने घाईने पसरली. तिच्या फाटक्या हातमोजांत डॉ. बिल पडलं तसं ’गॉड ब्लेस यू. हॅपी हॉलीडेज!" म्हणत तिने तोंडभरून हास्य फेकलं. तिच्या पाणीदार डोळ्यांतली लकाकी त्या पिवळ्या दातांच्या हास्यात मिसळून आनंदाची एक आगळी चमक क्षणभर दिसली, एक वेगळा आनंदही नवर्याच्या डोळ्यांत क्षणभर चमकून गेला आणि मनातील सर्व विचारांना खीळ पडली.
जसं आमच्याकडे काहीतरी होतं जे तिच्याकडे नव्हतं तसंच, काहीतरी वाटत होतं त्याला जे मला वाटतं नव्हतं इतकाच विचार करून मी हायवेतल्या गर्दीत मिसळून गेले.