प्रकार

Tuesday, September 25, 2007

भूलनगरी

सूर्यप्रकाशाची तिरिप डोळ्यांवर पडली तशी सीमाने डोळे किलकिले केले. सकाळ झाली आहे हे क्षणभर तिला कळलेच नाही. शेजारी रवी अजूनही ढाराढूर घोरत होता. ती गादीवर उठून बसली आणि बेडरूमच्या भिंतीकडे भकास नजरेने पाहू लागली. का कोणास ठाऊक, तिला थोडसं कलकल्यासारखं वाटलं. समोरच्या भिंतीवर लटकणारा त्यांच्या लग्नातला फोटो गायब होता.

’अं?’ मनाशी आश्वर्य करत सीमाने सभोवार नजर फिरवली. तिचे ड्रेसिंग टेबल, त्यावरील क्रिस्टलची फुलदाणी, तिच्याबाजूचा दोघांचा फोटो, उजव्या कोपर्‍यातलं कपाट, खिडकीला तिने लावलेले नवे सिल्कचे पडदे सगळेच नाहीसे झाले होते.

’आई गं!’ तिच्या मस्तकात तीव्र कळ उठली तसा तिने हात कपाळावर नेला. कपाळावर रुपयाच्या नाण्याएवढं टेंगूळ आलं होतं. क्षणभर ती विचारात पडली आणि त्यानंतर तिने रवीला गदगदा हलवायला सुरुवात केली.

“उठ रवी! हे बघ काय आहे? आपण बघ कुठे आहोत? अरे उठ, आपण आपल्या घरात नाही आहोत. भलतीकडेच कुठेतरी आहोत.” रवी उठला तो डोकं गच्च धरूनच. "कशाला बोंबलते आहेस? आधीच डोकं जाम चढलंय माझं.” तो सीमावर डाफरला.

“चढेल नाहीतर काय? इतकं प्यायची गरज होती का पार्टीत काल? अरे पण बघ ना! आपण कुठे आहोत नक्की? हे आपलं घरंच नाहीये.” सीमाच्या नजरेत काळजी दिसत होती. रवीनेही खोलीवरून नजर फिरवली. त्याच्या ओळखीचे त्या खोलीत काहीच नव्हते पण खोली छान प्रशस्त होती. तो ताडकन उठला आणि त्याने आपल्या विस्कटलेल्या केसांतून बोटे फिरवली.

“ऑं! असं कसं झालं?" सभोवार नजर फिरवून रवी म्हणाला, "काल रात्री कार तू चालवत होतीस. तूच कुठेतरी घेऊन आलीस. कोणाच्या घरात आहोत आपण? चल या खोलीच्या बाहेर पडू. घरात कोणी असेल त्यांना विचारू इथे कसे पोहोचलो ते.”

रवी आणि सीमाच्या एका मित्राने, मोहनने नुकतेच खंडाळ्याच्या जवळ एक फार्म हाऊस घेतलं होतं. काल त्याने सर्वांना पार्टी ठेवली होती. बरेच दिवसांनी मित्र-मित्र जमल्याने रवीने नेहमीपेक्षा थोडी जास्तच घेतली होती. रात्री गाडी चालवणं अशक्य झालं तसं सीमाने ड्रायविंग करण्याचं ठरलं. मोहनने आणि त्याच्या बायकोने; नीताने, रवी आणि सीमाला फार्म हाऊसवरच राहण्याचा आग्रहही केला होता. शनिवारची रात्र होती, दुसर्‍या दिवशी रविवार होता पण रवीला काही कामं निपटायची होती त्यामुळे परत येणं भाग होतं.




---

रवी आणि सीमा दोघे त्या खोलीच्या बाहेर पडले तसे त्यांना जाणवलं की त्यांची बेडरूम पहिल्या माळ्यावर होती. जिना उतरून खाली येताना रवीने मोठ्याने विचारलं, “अहो कोणी आहे का इथे? हलो!!” घरातली शांतता अजिबात बिघडली नाही. कोणी नव्हतंच बहुधा घरात. तळमजल्यावर लिविंगरुमला लागून स्वयंपाकघर दिसत होते. तिथे कोणी असेल तर म्हणून रवी आणि सीमा स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. यावेळेस सीमाने हाक दिली, “कोणी आहे का घरात? इथे कसे पोहोचलो आम्ही?” घर तरीही शांतच राहिले. त्या दोघांनी आणखी दोन चार हाका मारल्या पण घरातून कोणतीही हालचाल झाली नाही.

"मला वाटतं रवी की काहीतरी घोटाळा आहे. आपण स्वत:हून इथे आलो नाही, आपल्याला इथे कोणीतरी घेऊन आलं आहे.” सीमा हळूच म्हणाली.

“हो? मग तू आठव ना, तू ड्रायविंग करत होतीस. तुला आठवायला हवं की आपण इथे कसे आलो? आपल्याला इथे कोणी आणलं?.”
“मी ड्रायविंग करत होते आणि तू मागच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरला होतास. मला इथे कसे आलो ते काही आठवतच नाही.” सीमा वैतागून म्हणाली.
“काल तू कोक पीत होतीस त्यात काही घातलं होतंस का गं हळूच!” रवीच्या चेहर्‍यावर मिश्किल झाक होती.
“मस्करी करू नकोस रे! मला ना जरा भीती वाटायला लागली आहे.”
“बरं! बरं! असं करू, मोहनला फोन करू. तो फार्महाऊसवरून येईल इथे आणि घेऊन जाईल आपल्याला.” असं म्हणून रवी आपले खिसे चाचपडू लागला. “अरेच्चा! माझा सेलफोन आणि पाकिट गाडीत राहि्लं वाटतं”.
“गाडीत राहिलं की कोणी लंपास केलं?” सीमाचा चेहरा उतरला होता.“लंपास करणारे माझ्या हाताचं रिस्टवॉच, तुझं मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी तसंच टाकून जातील का? ... बाहेर लिविंगरुममध्ये फोन आहे तिथून फोन करतो.”

रवीने बाहेरच्या खोलीत जाऊन फोन उचलला आणि कानाला लावला. पलीकडून काहीच आवाज नव्हता. त्याने वायर तपासली. वायर हवेत लोंबकळत होती. स्वयंपाकघराच्या दारात सीमा उभी होती तिला त्याने ती वायर दाखवली. “कोणीतरी फोन डिसकनेक्ट करून ठेवला आहे.”

“रवी इथून बाहेर पडूया. आपली गाडी आहे का बाहेर ते पाहू.” सीमा पुटपुटली.“अगं पण माझं डोकं जाम दुखतंय. थोडा चहा करतेस का? घरात ज्याने झोपायला दिलं तो आपण कपभर चहा प्यायला म्हणून काही म्हणणार नाही.”

सीमाने नाखुशीने फडताळातले शिस्तीत लावून ठेवलेले डबे उघडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व डबे रिकामे होते. सीमाने स्वयंपाकघरातली लाकडी कपाटे उघडायला सुरुवात केली परंतु ती कपाटे इतकी घट्ट बसली होती की तिच्याच्याने ती उघडेनात. “ए रवी! हे कपाट दे ना रे उघडून. त्यात खायला काही सापडते का ते पाहते.”

रवीनेही नेटाने प्रयत्न केला पण दार घट्ट बसले होते. त्याने असेल नसेल तो सर्व जोर काढून दार खेचलं तसा दाराचा नॉब त्याच्या हातात आला. “ऑं! हा काय प्रकार आहे? हे दार कोणीतरी घट्ट चिकटवून बंद केले आहे की काय?” रवी आश्चर्याने मागे सरकला. त्याने झटदिशी सीमाचा हात पकडला आणि तो तिच्या कानापाशी पुटपुटला, “इथून बाहेर जाऊया! काहीतरी घोटाळा दिसतो.” घाईतच ते दोघे घराबाहेर पडले.

सकाळचे १० वाजले असावेत. रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्याच्या दुतर्फा घरं होती, दुकानं होती मात्र कोठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. रवी आणि सीमाने नजर फिरवून सर्वत्र पाहिलं पण कोणतीही हालचाल त्यांच्या नजरेने टिपली नाही.

“सीमा! चल शेजारच्या घराची बेल वाजवूया. कोणीतरी असेल तर पाहू. विचारू काय प्रकार आहे तो.” रवीने सीमाचा हात धरून तिला ओढतच शेजारच्या घराकडे नेलं. दाराची बेल वाजवली तशी ती वाजल्याचा आवाजच आला नाही म्हणून त्यांनी दरवाजा ठोठवला, पण आतून कोणतीही चाहूल लागली नाही तशी ती दोघं पुन्हा रस्त्यावर आली.

“ हे रे कुठे आलो भलतीकडे आपण? इथे सर्वत्र स्मशानशांतता आहे. मला भीती वाटायला लागली आहे. सगळी घरं कशी बंद दिसताहेत. त्यांत कोणीतरी लपून आपल्याला पाहात असेल तर? आपल्यावर पाळत ठेवून असेल तर?”

“घाबरतेस काय? मस्त कोवळं ऊन पडलंय. कोण खायला येतंय सकाळच्या वेळी? आपली कार असती तर बसून सरळ हायवेला लागलो असतो पण तुला आठवतच नाही कार कुठे गायब झाली ते.” रवीचा टोमणा सीमाला फारसा आवडला नसावा.

“रवी, मला वाटतं की काल आपण रस्ता चुकलो होतो. मी काल ड्राईव करत होते ना तेव्हा हायवेवर मध्येच रस्त्यावर दिवेच नव्हते. एकेठिकाणी मला रस्ता थोडा अरुंद झाल्यासारखा वाटला. ओळखीचा वाटत नव्हता, आणि मग नंतर काय झाले ते नाही आठवत.... तुला कित्तींदा सांगितलं की इतकी पित जाऊ नकोस. मला रात्रीबेरात्री गाडी चालवण्याची सवय नाही हे माहित होतं तुला.” सीमाने बोलता बोलता आवाज चढवला.

“मला आता कळेनासं झालंय की प्यायलं कोण होतं? मी प्यायलो होतो म्हणून मला आठवत नाही पण तुलाही कसं आठवत नाही की पुढे काय झालं ते? आर यू शुअर की तू एखादा पेग मारला नाहीस?”

“पुरे हं रवी! वाट्टेल ते विनोद करू नकोस.” सीमाने त्याला तिथेच तोडलं. “आता आपण काय करायचं ते सांग. या रस्त्यावरून सरळ चालत जाऊया. हाका मारूया लोकांना. सकाळची वेळ आहे. कामासाठी घरातून बाहेर पडणारी माणसं, शाळेला जाणारी पोरं तरी दिसायला हवी होती. रवी, आपण एखाद्या ग्रेव्हटाऊनमध्ये नाही ना आलो.”

“म्हणजे ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसं? गावातले सगळे मृत असतात आणि ते झोंबी का काय बनून जिवंत माणसांच्या मागे जातात...” रवीने दोन हात हवेत पसरले आणि सीमाकडे पाहून दात विचकले.

“प्लीज बी सिरिअस रवी! तुला काहीच वाटत नाहीये का रे? आपण कुठेतरी येऊन फसलोय हे नक्की. चल ना त्या समोरच्या दुकानात जाऊ. ते उघडलंय म्हणजे कोणीतरी असणार आत.”

ते दोघे दुकानासमोर उभे राहिले. दुकानात अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. त्यांनी बराचवेळ हाका मारल्या तरी कोणी बाहेर आले नाही. रवीने सीमाकडे पाहून डोळा मारला आणि दुकानात समोर ठेवलेला बिस्किटांचा पुडा हळूच आपल्या खिशात सरकवला. सीमाने रागाने त्याच्याकडे पाहिले तसे तो चटकन दुकानाबाहेर पडला. “हे काय केलंस?” सीमा मागोमाग येत खेकसली.

“अगं, काहीतरी पोटात नको का ढकलायला? बिस्किटं तर बिस्किटं!” म्हणत रवीने पुड्याचे वेष्टन फोडले आणि आ वासून तो पुड्याकडे पाहात राहिला. “अरेच्चा! पुडा चक्क रिकामा आहे की...असा रिकामा पुडा का ठेवला असावा त्या दुकानात?” रवीने डोळे विस्फारले आणि पुडा भिरकावून दिला. "विक्षिप्तच प्रकार आहे सगळा.” असे म्हणून तो रस्त्यावरून पुढे जाऊ लागला तसे सीमाने त्याला धावतच गाठले. रस्ता अद्यापही निर्मनुष्य होता.

“ए रवी तू एक पाहिलंस या ओसाडवाडीत पक्षांचा किलबिलाटही नाही, झाडंही किती तुरळक आहेत आणि कशी बावलेली, मृतवत दिसताहेत. एखादं भटकं कुत्रंही नाही.” सीमा पडेल आवाजात म्हणाली.

रवीलाही गावातला वेगळेपणा जाणवू लागला होता. सीमासारखं आपल्याला भिऊन चालणार नाही हे त्याला कळत होतं. त्याचं डोकं अजूनही ठणकत होतं. “थोडसं पाणी मिळेल तर बरं होईल, तहान लागली आहे.” त्याची नजर सभोवार फिरत होती. काही अंतराने रस्ता सोडून डावीकडे एक विहिर त्याच्या नजरेला पडली तसं दोघांनी विहिरीकडे जाणारा रस्ता पकडला. विहिरीवर आडाला बांधलेला पोहरा रवीने घाईघाईने आत सोडला.

’टण्ण!!’ आश्चर्याने रवीने विहिरीत डोकावून पाहिले. विहिर साफ सुकी होती. आत पाण्याचा टिपूसही नव्हता. पोहरा जोरात जमिनीवर आदळल्याचा आवाज झाला होता. रवीने भुवया आक्रसल्या, “सीमा, खरंच घोटाळा आहे काहीतरी इथे. विचित्रच गाव आहे. एकही सजीव गोष्ट दिसली नाही आपल्याला आतापर्यंत. काल आपला ऍक्सिडेंट झाला का गं? म्हणजे आपण मेलो असलो तर?”
“रवी अरे काहीतरीच काय बडबडतो आहेस?”
“काहीतरीच कसं? आपण मेलो असलो आणि हा नरक असला.. आपल्या पापांची शिक्षा अशाप्रकारे दिली असेल तर? अनंतापर्यंत आपण याच गावात राहायचं.. फक्त मी आणि तू.”
“पापांची शिक्षा? आपण कोणती पापं केली आहेत? आणि नरक काय असा असतो?” रवी चिडवतो आहे की गंभीर आहे ते न कळल्यानं सीमा तडकून म्हणाली, “हे बघ! मी इथे जास्त वेळ काढू शकत नाही. तू येतो आहेस ना? मी मुख्य रस्त्याने चालायला सुरुवात करणार आहे. गावाबाहेर हायवे मिळेल नाहीतर एखादा मोठा रस्ता. तिथे काही ट्रान्सपोर्ट मिळतो का पाहू.”

रवीने निमूटपणे तिच्याबरोबर चालायला सुरुवात केली तरी नजरेने तो सतत हालचाल शोधत होता. मुख्य रस्त्यावर दूरवर त्यांना एक देऊळ दिसले तसे रवीने चेहर्‍यावरच्या रेषा सरळ करत सीमाचे लक्ष देवळाकडे वेधले.

“आहा! सीमा, म्हणजे आपण नरकात नसणार. ते बघ देऊळ दिसतंय. त्यात पुजारी भेटतो का पाहू.” असं म्हणून रवीने पुन्हा सीमाचा हात पकडला आणि तिला ओढतच तो देवळाच्या दिशेने जाऊ लागला. देवळाच्या मोजक्या पायर्‍या चढून त्या दोघांनी चौथर्‍यावर प्रवेश केला. देवळातही शुकशुकाट होता. गाभार्‍याच्या दिशेने जात त्यांनी पुजार्‍याला हाका मारायला सुरुवात केली. कडक उन्हातून गाभार्‍यात प्रवेश केला तशी दोघांच्याही डोळ्यासमोर अंधारी आली. काही क्षणांनी डोळे किलकिले केल्यावर सीमाला देवळाचा गाभारा रिकामा दिसला. मूर्ती, समया, दिवे, कलश कशाकशाचाही त्या गर्भगृहात पत्ता नव्हता. भरला होता केवळ अंधार.

“हे काय अभद्र?” सीमा चित्कारली. हे एखादे मृतांचे गाव असावे अशी कल्पना गेला काही वेळ तिच्या डोक्यात घोळत होती ती खरीच असावी असे तिला पुन्हा एकदा वाटून गेले. धावतच ती बाहेर आली आणि देवळाच्या पायर्‍यांवर डोकं धरून बसली.

खांद्यावर रवीचा हात पडला तशी ती मुसमुसू लागली. “इथून बाहेर पडू रवी. आता इतर कुठे थांबायचं नाही, सरळ रस्त्याला लागूया. आपल्याला फसवून कोणीतरी इथे आणलं आहे. मगासपासून आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवून असल्यासारखं वाटतंय.”

“बरं चल!” रवीला प्रकरणातील गांभीर्याची कल्पना आली होती. त्याने सीमाला उठायला मदत केली. दोघांनी पुन्हा मुख्य रस्ता धरला. सूर्य डोक्यावर तळपायला लागला होता. किती चालायचं, कुठे जायचं, कसं जायचं या सर्व प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता पण एका जागी वाट बघत बसण्यापेक्षा कुठेतरी गेलेलं बरं असं म्हणून दोघे पावले ओढत निघाले. अदमासे अर्धा मैल चालणे झाले असावे. समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.

“सीमा पळ! ही एसटी आपल्याला पकडायलाच हवी.” असं म्हणत रवी वेड्यासारखा धावत सुटला आणि त्याच्यामागे सीमाही. एसटी मंदगतीने जात होती. रवीने चालत्या एसटीत झटकन उडी मारली आणि मागून येणा‍र्‍या सीमासाठी हात पुढे केला, “हात दे!” असे म्हणून त्याने सीमालाही आत घेतले.
धापा टाकत दोघे दरवाजाशेजारच्या सीटवर कोसळले. “रवी! वाचलो रे, सुटलो एकदा या विचित्र जागेतून.” असं म्हणत सीमाने आपले डोके रवीच्या खांद्यावर टाकले. रवीनेही डोळे बंद करून आपले डोके सीमाच्या डोक्यावर टेकवले. क्षणभराने रवीने डोळे उघडले तसे एसटीत कोणीही चिटपाखरू नजरेस पडले नाही. एसटीचा वेग अचानक वाढल्यासारखा वाटला. सीमानेही डोळे उघडून इथेतिथे नजर फिरवली.
“सीमा, एसटीत कोणी नाहीये. फक्त आपण दोघेच!” रवी कुजबुजला. सीमाने हे अपेक्षितच असल्याच्या आविर्भावात फक्त मान डोलवली. ती आश्चर्याने खिडकीतून बाहेर पाहत होती. रवीने खिडकीबाहेर नजर टाकली आणि काहीच क्षणात त्याला काय घडतं आहे याचा अंदाज आला. एसटी त्या माळरानावर गोल गोल चकरा मारत होती. एकाच ठीकाणी!

“मी..मी पुढे जाऊन ड्रायव्हरला विचारतो की हे काय चाललय?” रवी पुन्हा कुजबुजला तसा सीमाने त्याचा हात घट्ट पकडला, “रवी! मला नाही वाटत आपली यातून सुटका आहे असं.” तिला हुंदका अनावर झाला.“वेडी का? समोर ड्रायव्हर दिसतो आहे. मी विचारतो त्याला.” म्हणून रवी जागेवरून उठला.“सांभाळून रे!” चालत्या एसटीत ताडताड पावलं टाकत रवी ड्रायव्हरच्या जवळ उभा राहिला. "थांबवा! ही एसटी थांबव इथेच नाहीतर..." सर्व त्राण एकवटून त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले... नाहीतर आपण काय करणार याची त्याला कल्पनाही नव्हती.

करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता.

“ओ सायेब! वरडताय कशापाय? काय जालं बोंबलायला? ह्ये घ्या थांबवली यश्टी!” त्याने उलटा आवाज काढला. रवी धडपडत उभा राहिला. सीमाही मागच्या सीटवरून धावत त्याच्यापाशी आली.“कुठे जाते आहे ही एसटी? कोणत्या गावाला?” सीमाने तोंड उघडले.
“कोन्त्या बी गावाला जात न्हाय. हितंच फेर्‍या मारती हाय.” ड्रायवरने आपले तंबाखू खाऊन पिवळे झालेले दात उचकटले.
“रवी, चल आपण उतरूया आधी.” सीमाने काकुळतीला येऊन म्हटले. रवी आपल्या पायांवर स्थिरस्थावर झाला होता, त्याने पुढे सरून ड्रायवरची बकोट पकडली, “साल्या! काय प्रकर आहे तो सांग नाहीतर देतो तुला सटकावून.” अचानक हल्ल्याने ड्रायवर जागीच सटपटला, “ओ सायेब! कालची उतरली न्हाय वाटतं, च्यामारी! या लोकास्नी मदत करा आनी यांचा मार बी खा.. तुमा सायब लोकांची तराच न्यारी.”
“आं!” रवीने त्याची बकोट सोडली, “कसली मदत?”
“कसली मदत काय इचारता राव? काल तुमी दोगं तर्र हून गाडी हाकत व्हता. या बाईंनी गाडी रस्ता सोडून आन्ली आनी झाडाला ठोकली. दोगंबी तितंच ढेर जालं व्हतं. मी आनि रफिकचाचानं पायल म्हून बरं! तुमा दोगांना आन गाडीला फार काय जालं नवतं. तिचातूनच आनलं काल रातच्याला तुमाला हितं, आनी बंगलीत झोपवलं.”
“दोघंही तर्र होतो?” रवीने संशयाने सीमाकडे पाहिलं.
“नीता म्हणत होती की वाईन जुनी आहे, मुरलेली. थोडी चव बघ.” सीमा खजील होऊन म्हणाली.
“वा! आणि पिऊन तर्र झालो म्हणून शिव्या खायला मी,” रवी चरफडला.

एव्हाना रवी, सीमा आणि ड्रायवरचे त्रिकुट एसटीमधून खाली उतरले. “आणि आमची गाडी कुठे आहे?” रवीच्या आवाजातला संशय कायम होता.“हेडलाईट फुटलाना वं. रफिकचाचा रिपेअर करायला गेला हाय. सक्काळी धा वाजताच. यील थोड्यायेळानं. मग जा तुमी तुमच्या गावाला.”
“हं! आणि तुम्ही दोघे कोण? या गावातले वेताळ आणि संमंध?”
“आं!” ड्रायवरला काही समजलं नसावं, “मी चंदू. मी आनी रफिकचाचा हितलं केयरटेकर हाय.”
“केअरटेकर? साल्यानो या स्मशानालाही केअरटेकर लागतो होय.” रवीला अजूनही काहीतरी घोटाळा असल्यासारखे वाटले.
“ओ सायेब! शिव्या कशापाय देता? ह्ये समशान दिसतं का तुमाला?”
“नाही स्मशान नाही हे नंदनवन आहे. सकाळपासून गावात फिरून दमलो. एक जिवंत प्राणी नजरेला नाही आला. घरांत माणसं नाहीत, विहिर सुकी, दुकान रिकामं, देवळात देव नाही, या तुझ्या एसटीत प्रवासी नाहीत.” रवी घुश्श्यात म्हणाला.
“चला सायेब! चा पिऊ.” चंदूला हसण्याची उबळ आवरली नाही. “शामू शर्माच्या चित्रपटाचा स्येट हाय ह्यो. जंगी पिच्चर हाय म्हनतात. गेला म्हयनाभर समदं हितंच व्हतं, त्ये शूटींग चालू होतं. पन त्या हिरोचं आनी शामू सायबांच मधीच कायतरी बिनसलं बगा. गेले धा दिस शूटींग बंद व्हतं. उंद्यापास्न पुन्यांदा चालू व्हईल, म्हून काल खरेदीसाटी मी आन रफिकचाचा गेलो व्हतो. रातच्याला परत यीताना तुमची गाडी आमच्या फुडं, येकदम भन्नाट जात व्हती. धाडकन आपटली तशी आम्ही उतरलो आनि तुमा दोगांना भायेर काडलं आनी हितं आनलं. मला वाटलं दुपारपातुर उटनार न्हाय तुमी दोगं म्हून मी माजं काम करत व्हतो. या येश्टीची टेश्ट घ्यायची व्हती पर तुमी येवड्या गुश्श्यात याल आसं वाटलं न्हाय...”

रवीचा चेहरा गोरामोरा झाला होता. त्याने मान वळवून सीमाकडे पाहिले तशी तिने नजर खाली वळवली. रवीच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली, आता सर्व घोळ त्याच्या ध्यानात येत होता. त्याने चंदूच्या पाठीवर थाप मारली. “चंद्या! लेका चुकलो यार! तू आणि रफिकचाचा होता म्हणून आम्ही ठीकठाक आहोत. चल चहा पाज. डोकं अजून भणाणतंय आणि घशालाही कोरड पडलीये.” असं म्हणत त्याने आपला हात सीमाच्या खांद्यावर ठेवून त्तिला जवळ ओढलं आणि तोंड तिच्याजवळ नेऊन तो कुजबुजला, “झेपत नसेल तर पिऊ नये माणसाने आणि प्यायली तरी गाडी कधीच चालवू नये. चल! आता चंदूच्या हातचा चहा पिऊ.”

marathi blogs