प्रकार

Tuesday, December 12, 2006

मुखवटे

"संपूर्ण जगात तूच सुंदर," असे सांगणारा जादूचा आरसा स्नो व्हाईटच्या गोष्टीतल्या सावत्र आईकडे खरंच होता का असा प्रश्न मला बरेचदा पडतो. म्हणजे विचार करायला लागलं तर नेमकी काय गरज अशा आरशाची? आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात? मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि "मीच सर्वांत सुंदर!" यांत नेमका फरक तो कोणता? सौंदर्याचा बेगडी मुखवटा धारण करणार्‍यांना आपला खरा चेहरा पाहावासाच वाटत नसेल तर?

मध्यंतरी एके ठिकाणी माणसांचे गुण-दोष, आवड-नावड त्यांच्याच शब्दांत वाचण्याचा योग आला. प्रत्येकाने आपल्या गुणांचे आणि आवडींचे वारेमाप वर्णन केले होते, परंतु जेथे दोष आणि नावडीबद्दल लिहायचे होते तेथे थोडक्यात मला भ्रष्टाचाराचा राग आहे, मला स्वत:ची टिमकी वाजवणार्‍या व्यक्ती आवडत नाहीत, मला अस्वच्छता आवडत नाही, मला भिकार्‍यांचा, राजकारण्यांचा राग येतो असे प्रचारी मुद्देच मांडलेले आढळले. अगदी अभावाने एखाद्याने 'मी नकार पचवू शकत नाही, एखाद्याने माझे मत नाकारले तर माझा संताप अनावर होतो.' असे लिहिले होते. इतरांना आपले म्हणणे इतक्या परखडपणे आणि सुस्पष्टपणे मांडता आले नाही याचे कारण 'इतरांनी मला चांगले म्हणावे, माझे दोष इतरांना दिसू नयेत' अशी भीती असते की 'मी स्वत:ला आहे तसा स्वीकारू शकत नाही, माझे दोष मलाच दिसू नये याची मी काळजी घेतो' असा स्वार्थ असतो कोणास ठाऊक? मला व्यक्तिशः दुसर्‍या विधानावर जास्त विश्वास वाटतो.

यावर पुढील प्रश्न निर्माण झाला की जगात कितीजणांना नकार स्वीकारता येतो? जी उत्तरे मिळाली त्यावरून तो तसा बर्‍याचजणांना पचवता येतो पण तो पचवला जातो याचे खरे कारण त्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून. जेथे तो स्वीकारायचा नसतो तेथे समोरच्या माणसाला येन केन प्रकारेण नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्याचा अपमान करणारी, मारहाण करणारी, एखाद्याची बदनामी होईल असे उद्योग करणारी आणि कुटील कारस्थान रचणार्‍या माणसांपासून ते प्रेयसीला जाळणारी माणसे याच प्रकारात मोडतात.

माणसाला जनाची नाहीतरी मनाची लाज हवी असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र माणूस स्वत:चे अंतरंग लपवून समाजात आपली पत, प्रतिष्ठा राखण्यासाठी कोठल्याही प्रकारे चकचकीत मुखवटा लेऊन तयार असतो असे दिसून येते. जनाची लाज बाळगणारे जगात बहुसंख्य आहेत पण मनाची लाज बाळगणारे अगदी कमीच असावेत की काय असे वाटते. या माणसांना आपला चेहरा आरशात सुंदर दिसत असावा का? याचे उत्तर "हो" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा? इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय? कदाचित हा रंगवलेला मुखवटाच आपला चेहरा असावा या भ्रमात जगणे ही माणसे पसंत करत असावीत.

मुखवटे चढवणे वाईट असे म्हणता येत नाही, बरेचदा ते चढवणे आपल्या आणि इतरांच्या फायद्याचेच असते, कधीतरी आत्यंतिक गरजेचेही असते. परंतु सतत मुखवटे चढवून मिरवणारी माणसे स्वत:ची आणि इतरांची फसवणूकच करत असतात. माणसाने या मुखवट्यांच्या आणि रंगांच्या गर्दीत स्वतःला विसरून जावे याचे कोठेतरी आश्चर्यही वाटते.

मध्यंतरी वाचनात आले होते की काही सिने नट-नट्या झोपतानाही आपला मेक-अप उतरवत नाहीत. केवळ या भीतीपोटी की सकाळी उठून आपण स्वत:लाच ओळखले नाही तर काय घ्या? भारतीय नट नट्यांचे फारसे माहीत नाही पण मायकेल जॅकसन तोंडाला रंग लावूनच झोपतो असे ऐकले होते. विनोदाचा भाग सोडला तर या कलावंतात आणि सामान्य माणसात फार फरक आहे असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष जगातही बरेचजण मुखवट्यालाच चेहरा समजून जगत असावेत आणि आरशात स्वत:ला सर्वात सुंदर समजत असावेत याचा मनाला कोठेतरी खेद वाटतो.

marathi blogs