स्पर्श
किशोर कुमार बाजूला हळुवार आवाजात हे गाणं म्हणतोय आणि त्या स्पर्शाने मोहरून गेलेलं माझं मन वेड्या वा-यासारख धावतंय.
माणसाला अमूल्य ठेवा म्हणून मिळालेल्या पंचेंद्रियातील एक इंद्रिय; स्पर्श. शरीराला होणारी एक वेगळीच अनुभूती. स्पर्शाचे प्रकार तरी किती? स्पर्श दुसऱ्या शरीराचा, स्पर्श पाण्याचा, वाऱ्याचा, स्पर्श आगीचा, मृदू स्पर्श, खरखरीत स्पर्श, झोंबरा स्पर्श, सुखद स्पर्श, गरम स्पर्श, थंड स्पर्श, किळसवाणा स्पर्श, गुदगुल्या, मार, .... आहेत ना अनेक?
या शारीरिक स्पर्शापेक्षा एक वेगळा स्पर्श म्हणजे मनाला आणि हृदयाला होणारा स्पर्श. मानवी संवेदनांशी निगडित. सहजपणे आपण ज्याच वर्णन "हृदयस्पर्शी", "मनाला चाटून जाणारे" असे करतो, एखाद्या गोष्टीच वाईट वाटून गेलं सांगताना "मनाला लागलं" म्हणतो या वेळी आपण कळत नकळत स्पर्शाची अनुभूती देत असतो.
माणसाला सगळ्यात पहिला स्पर्श कुठला आठवत असावा. नक्कीच आईच्या शरीराचा. तान्हे बाळ आईला स्पर्शावरून ओळखते म्हणतात. त्या स्पर्शात ओथंबलेले प्रेम मूल सर्वप्रथम अनुभवते. पण आईच काय?? ती ही त्या तान्हुल्याला स्पर्शावरून ओळखते का? मला आठवत की मी माझ्या बाळाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मनात खूप काही झालं नाही. त्या इवल्याशा जीवाला हात लावला मात्र, आणि जी अनुभूती घेतली ती मला क्षणात "आई" करून गेली.
प्रियकराने किंवा प्रेयसीने केलेल्या सर्वप्रथम स्पर्शाचेही असेच कौतुक अनेक गाण्यांतून ऐकायला मिळते. "छू लेने दो नाजूक होठों को" म्हणत आसुसलेला प्रियकर प्रेयसीकडे अशाच स्पर्शाची मागणी करतो. हा पहिला वहीला स्पर्श जगावेगळाच असल्याचंही अनेकजण सांगतील. आशीर्वाद देतानाही डोक्यावरून हात फिरवला जातो. मिठी, अवघ्राण, चुंबन, कवटाळणे, पदस्पर्श हे सर्व शब्द स्पर्शाची महती वाढवणारे आहेत. तर आवळणे, खेचणे, ढकलणे, मारणे या स्पर्शाच्या नकारात्मक बाजू ठरतील. एकंदरीतच स्पर्शातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणता येईल.
आता या स्पर्शांचंही एक वेगळंच गणित असतं, वेगळे नियम असतात. जसं की कचेरी मधे साहेबांनी नोकरवर्गाला केलेला सहज स्पर्श चालून जाण्यासारखा असतो पण उलट प्रक्रिया मात्र आक्षेपार्ह समजली जाते. साहेबांनी येऊन एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्यात काहीच वावगं वाटत नाही परंतु एखादा कर्मचारी हेच वर्तन साहेबांशी करू शकत नाही. हस्तांदोलन हे सभ्यपणाचे लक्षण असते तर तळव्या व्यतिरिक्त हाताचा कुठलाही दुसरा भाग हातात घेणे हे मैत्रीपासून शत्रुत्वा पर्यंत कसलेही लक्षण ठरू शकते.
एखादा स्पर्श आक्षेपार्ह ठरू शकतो. अर्थातच तो कुठे, कसा व कुणी केला यावर अवलंबून आहे. नको असलेल्या स्पर्शाचा राग, किळस किंवा घृणा वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. अगदी अशा स्पर्शाची मनात भिती ही बसू शकते. तसाच दुसरा एखादा स्पर्श हवाहवासा असू शकतो. रात्री गादीचा स्पर्श, उन्हाळ्यात थंड पाण्याचा स्पर्श, मोरपिसाचा स्पर्श वगैरे.
प्रत्येक समाजाचेही स्पर्शाचे एक गणित असते. जसे, ग्रीस, इटली आणि काही अरब देशांतही पुरुषाने पुरुषाला चेहऱ्यावर चुंबन देणे हे आतथ्याचे लक्षण मानले जाते तर जगात इतर ठिकाणी ते नक्कीच आक्षेपार्ह समजले जाते. मध्यंतरी एका कार्यक्रमात भारतात एक पुरुष बाई ऐवजी दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर हात ठेवू शकतो यावर आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहिले आहे कारण पाश्चिमात्य जगात पुरुषाने पुरुषाच्या अंगचटीला जाणे स्वाभाविक नाही.
एकूणच माणसाच्या जीवनात स्पर्शाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचेंद्रियांचे वर्गीकरण सर्वप्रथम ऍरिस्टॉटलने केले असे म्हटले जाते. या लेखाच्या निमित्ताने त्यात माझ्याकडून थोडाशी भर घालणारा हा स्पर्श महिमा.