प्रकार

Tuesday, July 25, 2006

मुंबईचा महापूर (एक आठवण)

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मी आणि माझी मुलगी मुंबईला गेलो होतो. चांगले दोन महिने राहण्याचा बेत होता. घरात भावाच्या बाळाचा जन्म झाल्याने काही कार्यक्रम होते. माझी सात वर्षांची मुलगी यापूर्वी न कळत्या वयात मुंबईला येऊन गेल्याने निदान या वर्षीतरी तिला मुंबई दाखवावी असा बेत होता. काही ठिकाणी जाण झालं, पण मुंबई शहराच्या बाजूस फारसं जाण झालं नाही. शेवटचे १०-१५ दिवस राहिले तसे मी ठरवले काही झाले तरी गेट वे ऑफ इंडिया व नेहरू तारांगणाला भेट द्यायची, काय बुद्धी झाली कुणास ठाऊक पण जायचा दिवस ठरवला तो, २६ जुलै २००५ चा.

सकाळीच उठून घराबाहेर पडायचे, टॅक्सीने सगळीकडे फिरायचे, बाहेरचे जेवायचे असा झक्कास बेत होता. दोघींनीच काय जायचं म्हणून मी माझ्या आई बाबांनाही तयार केले. बाबा यायला तयार नव्हते पण बऱ्याच आग्रहानंतर ते तयार झाले. दिवस थोडा फार ढगाळ होता(partly cloudy). आकाशात ढग होते पण पाऊस पडत नव्हता, वाराही नव्हता. घरातून निघता निघता फोन वाजला. फोनवर मावसबहीण होती. तिच घर दादर चौपाटीला लागूनच आहे. जुजबी बोलण्यानंतर तिला आमचा बेत कळवला तशी ती म्हणाली, "कशाला बाहेर पडता आज? बाहेर समुद्रावरचं आकाश अगदी भरून आलंय, एकंदरीत रंग अगदीच वेगळा दिसतोय. उद्या जा पाहिजेतर."

"काहीतरीच काय? इथे तर आकाश बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि आमची तयारी सुद्धा झाली आहे. घरातून बाहेर पडायच्याच बेतात होतो, आता बदल कशाला? असं करतो की परत येताना वेळ मिळाला तर तुझ्याकडेही चक्कर मारतो," असं सांगून मी फोन बंद केला आणि घराबाहेर पडले.

सुमारे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास आम्ही गोरेगाव ते गेट वे प्रवास करून मुंबईच्या एका टोकाला पोहोचलो. आकाश इथे जरा जास्तच ढगाळलेलं होतं पण पाऊस पडत नव्हता. माझ्या मुलीने आजी आजोबांबरोबर फोटो काढून घेतले. मनसोक्त हुंदडूनही घेतले. हळू हळू थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली. अंगाला लागेल न लागेल असा पाऊस. आम्हाला छत्री उघडण्याचीही गरज वाटली नाही. साडे बाराच्या सुमारास दुसरी टॅक्सी करून आम्ही चर्चगेटला पोहोचलो. स्टेशनजवळच एका रेस्टॉरंट मधे जेवून सुमारे तासाभराने बाहेर पडलो तर पावसाची मध्यम सर आली होती. आता नेहरू तारांगण गाठायचं होत.
तारांगणाला पोहोचलो तसा तिथे काही शाळांच्या सहली आल्याने गर्दी होती म्हणून तारांगणाला नंतर येऊ आधी महालक्ष्मी जवळ असलेल्या नेहरू सायन्स सेंटरला जाऊ असं ठरवून पुन्हा टॅक्सीत बसलो आणि सायन्स सेंटरला पोहोचलो.

तो पर्यंत पावसाने जोर धरला होता. बरंच झालं आपलं पाहून होईपर्यंत पाऊस ओसरेल असा विचार करून आम्ही आत शिरलो आणि बाहेरच्या जगाशी आमचा संबंध तुटला. सुमारे चारच्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय? पाऊस वेडा वाकडा कोसळत होता. विजांचा चकचकाट, कानठळ्या बसवणारा गडगडाट, झाडांना वाकविणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा भर्रभर्राट भितीत भर घालत होता. नेहरू सेंटरच्या प्रवेशद्वारातून पाण्याचे लोटच्या लोट आत शिरत होते.

"पाऊस थोडा कमी झाला ना की आता सरळ घरीच जाऊया," आईने सुचवलं.वीस पंचवीस मिनिटे आम्ही थांबून वाट पाहिली पण पाऊस ओसरण्याच चिन्ह दिसत नव्हतं. आता अजून किती वेळ एका जागी थांबून राहायचे त्यापेक्षा बाहेर टॅक्सी मिळते का पाहावं म्हणून छत्र्या सावरत आम्ही बाहेर पडलो आणि त्याच क्षणी भिजून ओलेचिंब झालो. बाहेर एकही रिकामी टॅक्सी दिसत नव्हती. रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी साचलं होत. काही वेळाने एक रिकामी टॅक्सी दिसली तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?" माझ्याकडे मख्ख चेहऱ्याने पाहत त्याने मान वळवली आणि आपली टॅक्सी पुढे दामटली. मग दुसरा, तिसरा अशा अनेक टॅक्सीवाल्यांनी या ना त्या प्रकारे नकार दिला. शेवटी गोरेगावचा हट्ट सोडून निदान प्रभादेवीला मावस बहिणीकडे जायचं ठरवलं. तरीही सर्वांकडून नकारच. आता पुढे काय? असा विचार करत आम्ही भर पावसात कुडकुडत उभे होतो आणि तितक्यात एक टॅक्सीवाला समोर येऊन उभा राहिला.

"कहॉं जाना है?", "प्रभादेवी, चलोगे?"

"लेकिन आगे सब रस्ते बंद है। पानी भर गया है। चाहो तो टॅक्सीमें बैठ जाना, जब बारीश कम होगी तब छोड दूंगा।... वैसे भी छोटी बच्ची के साथ कहां भिगते रहोगे?"

चला बुडत्याला गाडीचा आधार असं म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो. निदान जितकं होईल तितकं तरी पुढे जाऊया असा विचार करून ड्रायव्हरने टॅक्सी पुढे दामटली. थोडं फार पुढे जातो तोच पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली. टॅक्सी ड्रायव्हर आता पुढे जायला नाही म्हणू लागला, "अभी पानी में तो टॅक्सी नहीं ना डाल सकता, नुकसान होगा, एलफिस्टन में मेरा सेठ रहता हैं वहां जायेंगे। टॅक्सी बंद पड गयी तो लेने के देने पडेंगे।" आमच्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. पाऊस धो धो कोसळतच होता. कुठल्यातरी गल्ली बोळांतून रस्ता काढत त्याच्या मालकाची इमारत थोडी उंचवट्यावर होती त्या आवारात त्याने टॅक्सी स्थानापन्न केली आणि तो आत निघून गेला.

रस्त्यावर तोपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, वाहनांची वर्दळ थांबली होती. सगळीकडे शुकशुकाट होता. संध्याकाळचे साडे पाच वाजायला आले होते. मधे एक दोन वेळा ड्रायव्हर आणि त्याचा मालक येऊन चौकशी करून गेले. आम्ही मुकाटपणे टॅक्सीत बसून होतो. हात पाय आखडून गेले होते. ओल्या कपड्यात थंडी वाजत होती. टॅक्सीच्या काचा खाली करण्याचीही सोय नव्हती. करणार काय? वाट पाहत राहण्याखेरीज दुसरा पर्यायही नव्हता. साडे सहाच्या सुमारास वारा थांबला, हळू हळू विजा, गडगडाट, पाऊसही थांबला. टॅक्सी ड्रायव्हर पुन्हा एकदा चक्कर टाकून गेला, "बैठे रहो, जब भाटा आयेगा तब पानी उतर जायेगा, फिर प्रभादेवी पहुंचा दूंगा। आपको चाय पीनी हो तो बाजू में ही दुकान है।"

आता पाणी ओसरेल नंतर ओसरेल असं म्हणता म्हणता सात... आठ... नऊ वाजले. पाऊस थांबला होता. रस्त्यावरचे पाणी मात्र तसूभर घटले नव्हते. वाहनं दिसत नव्हती पण लोक रस्त्यावरून हळूहळू चालत होते. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच बोलणं ऐकून येत होतं.... रेल्वे, बसेस, इतर वाहतूक ठप्प होती. कुठे घरं पाण्याखाली गेली होती, शहरातली बऱ्याच ठिकाणची वीज बंद होती, कुणीतरी वाहून जाणाऱ्या जीवाला हात देऊन आलं होतं तर कुणीतरी वाहून जाणाऱ्यांकडे असहाय नजरेने पाहत हळहळून आलं होतं. एक एक गोष्ट ऐकून जीवात धडकी भरत होती. कसही करून या संकटातून सुटका कशी होईल ही एकच ओढ लागली होती. गोरेगाव गाठणं केवळ अशक्य होतं निदान प्रभादेवीला मावसबहिणीकडे जाता येईल का पाहावं म्हणून तिला फोन करायचं ठरवलं. माझ्याकडे सेल फोन नसल्याने इमारतीतील एकांकडून ताईला फोन लावला आणि झाला प्रकार सांगितला. कसही करून आणि कितीही उशीर झाला तरी तुझ्या घरी पोहोचतो असं सांगून मी तिला सहजच विचारलं की, 'समुद्राला ओहोटी लागली का? पाणी का ओसरत नाहीये?'

'ओहोटी तर कधीच लागली, दोन तास होऊन गेले असतील,' तिने सांगितलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. ओहोटी बरोबर जर हे पाणी ओसरणार नसेल तर संपूर्ण रात्र, उद्याच्या दिवसात तरी ते उतरेल की नाही कुणास ठाऊक आणि इतक्या पाण्यातून टॅक्सी जाणे केवळ अशक्य होते. म्हणजे संपूर्ण रात्र रस्त्यावर काढायची की काय या विचाराने जीवाचा थरकाप उडाला. आपल्या बरोबर एक लहान मूल आणि दोन वयस्क माणसं आहेत आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर याची प्रकर्षाने जाणीव झाली.

'असं करा तुम्ही जिथे आहात तिथपासून माझं घर फार लांब नसावं, तुम्ही चालत का येत नाही? प्रयत्न तर करून पाहा,' ताईने सुचवलं. पण हे करणं तितकंसं सोपं नव्हत. अनोळखी जागा, रात्रीची वेळ, साचलेले पाणी, परिसराची वीज गेल्याने सर्वत्र अंधार, त्यातून बाबांचा पाय वयोमानाने दुखरा, भरलेल्या पाण्यात मुलीला कडेवर उचलून घ्यावे लागणार होते. कुठे पाय घसरला, खड्डा असला, पाण्यातून शॉक लागला तर काय करायचं? सारच कठीण वाटत होतं. कुणाच्यातरी सोबतीची गरज होती.

टॅक्सीवाल्याला विचारलं तसा तो रस्ता दाखवायला तयार झाला. दोन अडीच किलोमीटर चालावं लागेल म्हणाला. आई बाबा घाबरत होते पण करणार काय म्हणून चालायचं ठरवलं. टॅक्सीवाल्याला बाबांचा हात धरण्याची विनंती केली. थोडं पुढे जातो न जातो तोच पाणी वाढू लागले. मुलीला मी कडेवर उचलून घेतले आणि आम्ही जवळ जवळ छातीभर पाण्यातून आम्ही रस्ता काढू लागलो. पंधरा वीस मिनिटे पाणी तुडवल्यावर कूर्मगतीने दादरच्या दिशेने जाणारी एक बस दिसली. 'चला बरं झालं, बस निदान आपल्याला पुढे तरी नेईल या विचाराने आम्ही धावत पळत बसच्या दिशेने जाऊ लागलो, बसही आमच्यासाठी थांबली आणि आम्ही आत जाऊन बसलो. पण कसंच काय, आमच्यासाठी थांबलेली बस काही केल्या सुरू होईना.. तिथेच ढेर झाली आणि आमची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली.

रात्रीचे दहा वाजून गेले होते. बसमध्ये १०-१२ माणसे होती. सर्वांच्या डोळ्यात काळजी दिसत होती. संपूर्ण परिसरात अजूनही वीज नव्हती. पाणी कमरेवर होतेच. बसच्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहचत होते. त्या पाण्यातूनही बरेचजण रस्ता काढत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या एकाने खालनच बसमध्ये डोकावून पाहिले. पटकन आपल्या बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढून माझ्या हातात कोंबला,"तुमच्या मुलीला द्या. भूक लागली असेल हो तिला," असं म्हणून तो अंधारात दिसेनासाही झाला. त्याचा चेहराही दिसला नाही. धन्यवाद मानायचे दूरच राहिले. घरातून निघाल्याला आता बारा तास उलटून गेले होते. बसमध्ये तरी कितीवेळ बसून राहणार पण जायचं म्हटलं तर इतक्या अडचणी. डोळे मिटून शांत बसून राहाण्याखेरीज दुसरा कसलाही मार्ग दिसत नव्हता.

होता होता मध्यरात्र उलटून गेली. दिवस बदलला आणि चमत्कार व्हावा तशी ४-५ तरुण पोरं बसमध्ये घुसली. त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पुडे होते. त्यातल्या एक दोघांकडे सेल फोनही होते, "कुणाला घरी फोन करायचे आहेत का? त्यातल्या एकाने विचारले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझ्या बहिणीला फोन लावला आणि बसमध्ये आम्ही कसे अडकून पडले आहोत त्याची कल्पना दिली. आमच्यात जे बोलणं सुरू होत ते ऐकून त्यातला एक मुलगा म्हणाला, 'प्रभादेवी काही इथून फार दूर नाही. इथून १०-१५ मिनिटांच्या अंतराच्या रस्त्यावर पाणी आहे पण पुढे सैतान चौकीच्या आसपास रस्ता कोरडा आहे. तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. घाबरू नका आपण सावकाश जाऊ. द्या तो फोन माझ्याकडे मी बोलतो तुमच्या ताईंशी.' फोनवरून त्याने भाऊजींना जिथे पाणी नाही तिथपर्यंत कार घेऊन या म्हणून सुचवले.

बसमधल्या बायकांची सोय या मुलांनी त्यांच्या इमारतीतील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये केली. पुरुषांना काहीतरी खायला आणून देतो असं सांगून त्यातले चारजण आमच्याबरोबर यायला निघाले. बसमधून उतरून पुन्हा आम्ही छातीभर पाण्यातून हळू हळू चालू लागलो. रस्ता त्यांच्या पायाखालचा असल्याने काळोखातही ते सहज वाट काढत होते.आई बाबांच्या सोबत राहून, त्यांना व्यवस्थित सावरत, मध्येच माझ्या मुलीला माझ्या कडेवरून काढून स्वत:कडे घेऊन त्या मुलांनी आम्हाला सुखरूप ठरवलेल्या ठिकाणी पोहचवले. समोरचा रस्ता आता स्वच्छ होता आणि रस्त्याच्या कडेला भाऊजी कार पार्क करून वाट पाहत होते. त्यांना पाहून इतकं हायसं वाटलं की ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य.

त्या मुलांचे आभार मानून त्यांना पैसे हवे का म्हणून विचारले तर त्यांनी ठाम नकार दिला. निदान लोकांना मदत करताय म्हणून पैसे घ्या त्या पैशांनी थोडीफार मदत करा, फोनचे पैसे तरी घ्या म्हणून सांगितल्यावर त्यातला एकजण म्हणाला, 'ताई आमच्या घरची माणसं अजूनही घरी परतलेली नाहीत. माझा मोठा भाऊ अंधेरीला कामानिमित्त जातो त्याचा पत्ता नाही. ते जिथे अडकून पडले आहेत तिथे त्यांना कोणीतरी मदत करत असेलच ना. आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना... आणि पैसे घेतले असते का आमच्याकडून?' मी निरुत्तर झाले तसेही शब्दांनी आणि पैशांनी भरून निघण्यासारखे उपकार नव्हतेच त्यांचे.

पुढचे दोन दिवस आम्हाला ताईकडेच काढावे लागले. मुंबईतले पाणी ओसरले नव्हते आणि ओसरले तेंव्हा घरी वीज, पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते म्हणून जिथे होतो तिथेच राहायचे ठरवले. निदान ताईकडे सुखरूप पोहचलो ते काय कमी होते?

-----

Saturday, July 01, 2006

वय

माणसाचं वय आणि अक्कल या गोष्टी सम प्रमाणात असाव्यात अशी उगीचच माझी भ्रामक कल्पना आहे. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर माणसाच जस वय वाढत तशी त्याची शैक्षणिक, बौद्धिक पात्रता वाढत जाते. त्याच्या अनुभवांच गाठोडं मोठठ होत जातं, तो अधिक शहाणा होत जातो असा सर्वसाधारण समज असतो. अस असताना माणसाला आपल वय लपवून ठेवण्याची अनिवार इच्छा का बुवा असते? तस हे न सुटणारं कोड नाही. या कोड्याच उत्तर मला माहितही आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक व्यक्तिकडे आपल म्हणून काय कारण असेल हे जाणून घ्यायच कुतूहल मला असतं.

उगीच खडा टाकून पहावा तसा "लोकांना आपलं वय लपवायला का आवडत?" हा प्रश्न मी याहू आन्सर्सवर टाकला. अपेक्षेपेक्षा जास्त आणि अतिशय प्रामाणिक उत्तरे मिळाली. मिळालेल्या उत्तरांवरुन काढलेला निष्कर्ष असा --

लहानांना लवकर मोठ्ठ होण्यासाठी आणि मोठ्यांना कायम लहान रहाण्यासाठी आपलं वय लपवावसं वाटत. तसेच भिन्नलिंगी व्यक्तींवर आपला प्रभाव पडावा व आपल्या वयांतील तफावत झाकून रहावी म्हणून वय लपवले जाते.

अर्थातच, मला हा निष्कर्ष मनापासून पटला. त्याच्याकडे न्यूनगंड, स्वार्थ, फसवणूक अशा अनेक नजरेने पहाता येईल किंवा "सगळेच लपवतात म्हणून मी ही लपवतो" ही सर्वमान्य पद्धत म्हणूनही. सहज म्हणून काही संकेत स्थळांवर ओळखीच्या आणि अनोळखी लोकांची व्यक्तिगत माहिती तपासली. रहाण्याच गाव, व्यवसाय, आवडी निवडी, स्वभाव सांगायला उत्सुक असणारी बहुतांश माणसे वयाच्या खात्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. त्यातल्या त्यात २५ च्या दरम्यानच्या बऱ्याच माणसांनी (की इच्छूकांनी?) आपलं वय दिल्याचही लक्षात आलं पण २७-२८ वया नंतर सर्वत्र चिडिचूप होती. असं का याच उत्तर मला "न्यूनगंड" असंच वाटत. असो. प्रत्येकाकडे आपल कारण असेलच.

सहजच हा विचार डोक्यात घोळवत असताना काहि वर्षांपूर्वीचा एक किस्सा आठवला. एका वाहिनीवर एलिझाबेथ टेलरची मुलाखत चालली होती. त्यावेळी लिझ बाई पासष्टीच्या आसपास होत्या. वाहिनीचे नाव व मुलाखतकर्त्याचे नाव आता आठवत नाही.

मुलाखतकर्ता प्रश्न विचारता विचारता सहज विचारुन गेला,"तर मग तुम्हाला या वयात......"

त्याबरोबर लिझ बाई अशा उसळल्या, "या वयात म्हणजे? तुम्हाला म्हणायच आहे तरी काय?"

आता साक्षात एलिझाबेथ टेलर ती. मुलाखतकर्त्याला तरी भान नको कुणाला कसले प्रश्न विचारावे ते? क्षणभर त्याची भंबेरी उडली. त्याने कशीबशी वेळ सावरुन नेली खरी पण नंतरच्या सर्व मुलाखतीत लिझ बाईंचा मूड खराब झाल्याच कळून येत होतं.

म्हणजे लोकांना आपल वय सांगायला आवडत नाही तसं नकळत त्यावर चर्चा झालेली किंवा ते सहजच विचारलेलही आवडत नाही.

लहानांच सोडा पण मोठयांना आपण म्हातारे होत चाललो आहोत की काय या भीतीने वय लपवावस वाटत, हेच खरं. जे आकड्यांत आपल वय लपवू शकत नाहीत ते दिसण्यात आणि वागण्यात आपलं वय लपवायचा प्रयत्न करतात. एलिझाबेथ टेलरचं आठव लग्न यातलाच प्रकार होता की काय न जाणे?

हल्ली मला अमिताभच्या खारके सारख्या शरीरावर काळ्या केसांच टोपलं पहाण्याचा भारी वैताग आला आहे. आता त्याला "Grow up!!” सांगायच की आपल्या प्रेक्षकांना "Grow up!!” सांगायच हा आणखी एक वेगळा प्रश्न. पण टकलातला शॉन कॉनरी या वयातही फार देखणा दिसतो ही वस्तुस्थिती.

बायकांना वय विचारु नये, खरं उत्तर कधीच मिळणार नाही याची ग्वाही देणाऱ्या मंडळींसाठी एक किस्सा मी नेहमी राखून ठेवते.

काही वर्षांपूर्वी माझ्या कार्यालयातील एका मध्यमवयाच्या गृहस्थांना मला वय विचारण भाग पडल. आता त्यांच वय जाणून घेण्यासाठी HR ला भेट देण कठीण नव्हत पण काखेत कळसा गावाला वळसा कशाला म्हणून सरळ त्यांनाच वय विचारल. स्वारी काही उत्तर द्यायला तयार होईना. खूप टाळाटाळ केल्यावर त्यांनी एकदाच उत्तर दिले वर पुस्ती जोडली, "मी ४० वर्षांचा आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. बरेच लोक अजूनही त्यांच्या मुलींसाठी मला विचारतात."

यावर काय बोलणार आपण? शेवटी हेच म्हणायच, व्यक्ती तितक्या प्रकृती.

marathi blogs