तो
त्याला भेटण्याची संधी मिळेल न मिळेल या बद्दल मी कधीच विचार केला नव्हता. कुठे तो आणि कुठे मी. जगाच्या दोन टोकांवर. तशी त्याला नावाने ओळखत होते एवढचं. कधीतरी फोटोंमधेही पाहिलं होत. म्हणून काही त्याने माझं मन वगैरे जिंकलं नव्हतं. असेल कोणीतरी? त्यात काय मोठं? असं म्हणून खांदे उडवणे हीच काय ती माझी प्रतिक्रिया. पण आयुष्य मोठ विलक्षण असतं. कधी कोणाची कशी गाठ भेट घडून येईल हे विधात्यालाच माहित.
सर्व प्रथम त्याला भेटण्याचं ठरवल तेव्हाही थोडी फार उत्सुकता होती एवढच. पण आता त्याची माझी भेट ३-४ वेळा झाली आहे आणि प्रत्येक भेटीत त्याच्या विषयी अधिकाधिक ओढ निर्माण झाली आहे. अगदी पहिल्यांदा त्याच दर्शन झालं ना तेव्हा काळजाचा ठोका चुकला पण त्या नंतरच्या प्रत्येक भेटीतही एक वेगळीच धडधड मी अनुभवली आहे. प्रथम दर्शनी प्रेमावर यापूर्वी माझा कधीही विश्वास नव्हता पण त्याला पाहिलं आणि माझ्या विश्वासाला कधी तडे गेले ते कळलचं नाही. त्याला वेडावलेलं माझ मन पाखरु बनून त्याच्या अवती भवती घोटाळत राहिलय.
पण त्याला हे सगळं कुठे माहित्ये? आपल्याच मस्तीत, गुर्मीत वावरणारा तो, माझ्या सारख्या कपर्दिक व्यक्तीची तमा कशाला बाळगणार? प्रत्येक वेळी लांबून त्याचा आवाज ऐकला ना कि त्याच्याकडे धावत जाण्याची इच्छा होते. तासन तास टक लावून पाहिलय त्याला. प्रचंड गर्दीत त्याने मला एकदातरी पाहिलं असेल का? यावर अनेक वेळा विचार केलाय. मी मात्र त्याला लांबून, जवळून, उजवी कडून डावीकडून पाहिलय. डोळे विस्फारुन पाहिलय आणि डोळे मिटून ही पाहिलय. हात पुढे सरसावून त्याला स्पर्श करायचा प्रयत्नही केलाय. ओरडून त्याला "तू मला खूप खूप आवडतोस," असं सांगितलय आणि मनातल्या मनात त्याच्याशी संवाद ही साधलाय. त्याने ते ऐकलंय का नाही ऐकल याची मी कधी काळजी केली नाही. पण माझी खात्री आहे की त्याने ते ऐकलय.
त्याचा तो खळखळणारा आवाज, त्याची गुर्मी, रुबाब, ते निर्ढावलेपण, त्याचे अनेक रंग, त्याचं विशालपण मनात घर करुन राहिल आहे. त्याचं प्रत्येक रुप डोळ्यात, मनात आणि कॅमेरात साठवून घेतलं आहे. त्याच्या कुशीत शिरावं, त्याच्या स्पर्शाने ओलं चिंब होऊन जाव याची किती अनिवार इच्छा झाली आहे काय सांगू. त्याच्या या रुपाची अनामिक भीतीही मनात असते. वाटून जातं त्याच्या माझ्यात एक सुरक्षित अंतर असलेलच बरं, मनात कितीही आलं तरी त्याच्याकडे असं झोकून देणं तरी कसं शक्य आहे?
खरतरं माझा त्याच्यावर कुठलाच हक्क नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला भेटणं झालं तेव्हा तो फक्त माझा असतो, माझा एकटीचा. त्याचं रुप माझ्यासाठी असतं, त्याचा तो रुद्र आवाज, त्याचं ते उग्र स्वरुप, त्याचे इंद्रधनुषी रंग सगळं सगळं काही माझ्यासाठीच असतं आणि त्या भेटीत माझ्या जगात फक्त आम्ही दोघेच असतो.... मी आणि माझा नायगारा.