प्रकार

Monday, March 10, 2008

बादशहा अकबर आणि वादंग

लहानपणी अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या नाहीत असा माणूस मिळणे विरळा. बादशहा अकबर आणि त्याचा वझीर (प्रधान) बिरबल. साधा,सरळ आणि थोडासा बिनडोक अकबर बादशहा आणि तल्लख बुद्धीचा हजरजबाबी बिरबल. यांच्या गोष्टी कोणा मोठ्याच्या तोंडातून ऐकताना खूप मजा वाटत असे. जंगलातला देव बनवून बादशहाला घाबरवणारा बिरबल आणि "क्यों बिरबल कैसा सेव?" असे बादशहाने विचारल्यावर "जंगल में जैसे था देव" असे उत्तर देऊन त्याला चारीमुंड्या चीत करणारा बिरबल, थंडीत कुडकुडणारा माणूस दूरवरच्या दिव्याची उब घेत होता म्हणून त्याला बक्षिस नाकारणार्‍या बादशहाला उंचावर हंडी बांधून मंद जाळावर खिचडी पकवत चिडवणारा बिरबल आणि आंब्यांबरोबर साली आणि कोयीही खाल्ल्यास म्हणून बादशहाला चिडवणारा आणि त्याच्या बेगमेचीही मर्जी संपादन करणारा बिरबल. मला अजूनही हा आपला सांस्कृतिक वारसा बिरसा वाटतो.

मला या गोष्टी ऐकताना नेहमी प्रश्न पडे की खरंच बादशहा इतका मूर्ख होता? जर इतका मूर्ख होता तर बादशहा कसा बनला? आता या विचारांचे हसू आले तरी एक प्रश्न मला कधीच पडला नव्हता आणि का ते कळत नाही. बादशहाच्या कथेत येणार्‍या त्या बेगमेचे नाव काय? मी हा प्रश्न कधी विचारल्याचे मला आठवतच नाही आणि आज त्यावर विचार केला तेव्हा ज्युली चित्रपटातील एक दृश्य आठवले.

"ओमप्रकाशचे बॉस त्याच्या घरी आलेले असतात. ओमप्रकाशची बायको नादीरा त्याला आपण अँग्लो-इंडियन असल्याबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल काहीतरी मोठ्या अभिमानाने सांगत असते. मध्येच हा बॉस तिला विचारतो, 'तुझी आई कोण होती?' त्याबरोबर ती पटकन काहीसे असे सांगते, "आईचे नाव महत्त्वाचे नाही. ते कोणी लक्षात घेतं का?" का कुणास ठाऊक पण जोधा-अकबराच्या गोंधळात हा प्रसंग नेमका आठवला.

राजा मानसिंगाची बहिण अकबराला दिली होती आणि म्हणून राजा भारमल आणि त्याचा पुत्र मानसिंग यांचा अकबराशी घरोबा होता. इतका घरोबा की आपल्या विशाल सैन्याचे सेनापती अकबराने या दोघांना नियुक्त केले होते असा इतिहास वाचलेला आठवतो. अकबराच्या पत्नीने त्यात विशेष काय केले हे मात्र आठवत नाही. तिचं नाव जोधा नसून वेगळे असते तर नेमका काय फरक पडता? मुख्य गोष्ट अशी होती की अकबराने आपल्या सेनापतीच्या मुलीशी लग्न करणे त्याच्या धोरणी स्वभावाला साजेसे वाटते. असो, मूळ इतिहासाचा, माझा आणि बादशहा अकबराचा संबंध इतकाच असावा.

यानंतर अकबर बादशहा आठवतो तो मुघल-ए-आज़म मधल्या पृथ्वीराज कपूरचा. मूल होण्यासाठी आतुरलेला आणि पुत्राच्या जन्माची वार्ता कळताच सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट दासीच्या पदरात ओतणारा राजा. आपल्या हिंदू राणीच्यासह कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवात "मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे" या नृत्य-गीताचा आस्वाद घेणारा पती. पुत्राच्या बंडाने कासावीस झालेला आणि त्याविरुद्ध शस्त्र उचलणारा सम्राट. "सलीSSम, अनारकली तुम्हारे काबील नहीं" असे बेंबीच्या देठापासून ओरडणारा पिता आणि शेवटी दासीला दिलेले वचन अनिच्छेने का होईना पण पाळणारा बादशहा.

खूप वर्षापूर्वी वाचल्याप्रमाणे पृथ्वीराज कपूरने अकबराचे कपडे चढवले की एक अनामिक शक्ती आपला ताबा घेत असे आणि त्या कैफात आपण ही भूमिका निभावत असू असे सांगितल्याचे आठवते. बादशहा अकबर म्हटले की आजही फक्त पृथ्वीराज कपूर डोळ्यासमोर उभा राहतो.


मुघल-ए-आज़मची रंगीत फीत आली तेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहिला आणि पूर्वी एवढाच आवडला. हे सर्व पहात असताना अकबर मुसलमान होता, जोधा त्याची बायको नव्हती, अनारकली त्याची बांदी नव्हती, इतिहासाला वेगळे वळण दिले आहे, के. आसिफने लोकांची फसवणूक केली आहे हे इतिहासाबद्दल मनापासून प्रेम असून कधी डोक्यातही आले नव्हते.

गोवारीकरांनी जोधा-अकबरची घोषणा केली तेव्हा ऋतिक रोशन नावाचा "एक पल का जीना" म्हणत "इधर चला,उधर चला" नाच करणारा किरकोळ शरीरयष्टीचा नायक देशाचा सम्राट म्हणून कसा काय शोभू शकेल असा प्रश्न पडला. आपल्या निर्णयावर अडून बसलेला बाप आणि प्रणयोत्सुक पती या दोन्ही भूमिका वेगळ्या असल्यातरी ऋतिकला पृथ्वीराज कपूरने निर्माण केलेले वलय आणि वजन पेलवेल का असा प्रश्न पडतो.



चित्रपट गोवारीकरांनी काढला म्हणजे त्यात काहीतरी विशेष असावं, जे त्यांच्या पारखी नजरेला दिसलं असावं. अमेरिकेत हिंदी चित्रपट एखादा दिवस लागतो आणि लगेच काढला जातो त्यामुळे नवे चित्रपट पाहण्यासाठी चांगल्या प्रतीची डिवीडी येईपर्यंत २-३ महिने थांबावे लागते. एखाद्या शुक्रवारी संध्याकाळी सिनेमा पाहिला आणि वेळ घालवला इतकीच एका चित्रपटाची महती माझ्यामते असते. लोकांना त्यावर रस्त्यावर उतरावेसे का वाटते ते तेच जाणोत.

अकबर खानने काढलेला "ताजमहल" मध्यंतरी पहायची संधी मिळाली. त्यात शहाजहानचे चित्रणही प्रेमळ आणि सत्शील बादशहा म्हणूनच केले गेले आहे परंतु त्यावरून कोणताही वाद निर्माण झालेला ऐकला नाही. (चू. भू. दे. घे) गोवारीकरांच्या अकबरावरच असे का व्हावे हे अद्यापही कळले नाही आणि हा प्रश्न विचारता ज्या अनपेक्षित उत्तरांना सामोरे जावे लागेल त्यावरून बहुधा कळणारही नाही.

शाळेत पास होण्यापुरता इतिहास शिकणारे, मोघलांचा इतिहास दोन चार धड्यांत पार पाडणारे, दहावीनंतर इतिहासाच्या पुस्तकाला हातही न लावणारे इतके असंख्य आहेत की तीन तासांचा चित्रपट पाहून त्यांचे मतपरिवर्तन होईल अशी त्या चित्रपटात गोवारीकरांनी नेमकी कोणती जादू भरली असावी?

----



अकबर बिरबलाच्या कथा येथे पाहता येतील.
चित्र टाईम्स नाऊ.टिवी च्या सौजन्याने

marathi blogs