प्रकार

Tuesday, October 30, 2007

भयोत्सव

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी असा कसा हा सण? यामुळे समाजात आणि विशेषत: लहान मुलांत भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे अनुभवास आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख उपक्रमावर देत आहे.

हॅलोवीनचा इतिहास: हॅलोवीनची पाळेमुळे प्राचीन ब्रिटन व आयर्लंड मधील केल्टिक संस्कृतीत सापडतात. नोव्हेंबरची पहिली तारीख हा नूतन वर्षारंभाचा दिवस मानला जाई. तसेच, तो त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस मानला जाई. त्यानुसार या दिवसापर्यंत पशुपालन व शेतीची बरीचशी कामे उरकली जात. या दिवसानंतर काळोखी आणि गारठवून टाकणार्‍या थंडीचा ऋतू सुरु होई. नेमकी हीच वेळ गेल्या वर्षभरात जे कोणी मरण पावले त्यांचे मृतात्मे घरी परतण्याची समजली जाई.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

या दिवशी मृतात्म्यांनी आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये म्हणून त्यांना भिवविण्यासाठी गावकरी गावाजवळील टेकड्यांवर किंवा घराबाहेर मोठा जाळ करत. जनावरांचा बळीही त्याठीकाणी दिला जाई. याचबरोबर ते भयानक मुखवटे व भीतिदायक वेष धारण करत; यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणाऱ्या मृतात्म्यांना खरी माणसे कोण व मृतात्मे कोण हे समजणे कठीण होईल अशी गावकऱ्यांची धारणा असे. इसवी सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने ब्रिटन आणि आयर्लंडवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर "पोमोना" या फळा-झाडांच्या रोमन देवतेची पूजा करण्याचा सणही याच दिवशी साजरा होऊ लागला. ऍपल बॉबिंग (एका मोठ्या बादलीतील किंवा हौदातील पाण्यात सफरचंदे सोडून, ती हात मागे बांधून तोंडाने पकडणे) हा हॅलोवीनचा प्रसिद्ध खेळ पोमोनाला समर्पित आहे. यानंतर सुमारे सातव्या शतकात १ नोव्हेंबर हा संतांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी चर्चकडून संतपद मिळालेल्या किंवा न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच ऑल हॉलोज डे किंवा होली डे किंवा होलीमस (holy day = 'पवित्र दिवस') मानले जाऊ लागले व या दिवसाची पूर्वसंध्या हॅलोवीन म्हणून साजरी केली जाऊ लागली.

DSC00560
पोहोण्याच्या तलावात सफरचंदे पकडणारी मुले



आर्यलंडमधून विस्थापित होऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या आयरिश लोकांनी हॅलोवीनचा सण अमेरिकेत आणला. हॅलोवीनचा सण प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोर्टो रिको (प्वेर्तो रिको), आयर्लंड व ब्रिटन मध्ये साजरा केला जातो. अमेरिकेत १९व्या शतकात या सणाने मूळ धरल्याचे उल्लेख वाचायला मिळतात.

हॅलोवीनच्या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जॅक-ओ'-लॅन्टर्न नावाचा भला मोठा भोपळा कोरून केलेला कंदील. अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेता येते आणि हॅलोवीनच्या हंगामात ते तयारही होते. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन त्यावर डोळे, नाक, तोंड कोरणे दिसतेही भीतीदायक. ३१ तारखेपर्यंत या भोपळ्यांवर मुखवटे कोरले जातात. रात्री या भोपळ्यांत मेणबत्ती पेटवली जाते. दिवाळीत आपल्याकडे जसा कंदील बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी लावला जातो तसाच हा जॅक-ओ'-लॅन्टर्न प्रज्वलित करून बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी ठेवला जातो. या जॅक-ओ'-लॅन्टर्नची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

कथा जॅक-ओ'-लॅन्टर्नची: या कथेची विविध रूपे आहेत, तरी बऱ्याच कथांतील एक कथा उचलून येथे थोडक्यात देत आहे.

जॅक नावाच्या एका अत्यंत हुशार परंतु तितक्याच आळशी आयरिश इसमाने आयुष्यभर काहीही केले नाही. त्याने कधी कुठले चांगले काम केले नाही की कधी कुठले वाईट काम केले नाही. त्याच्या मृत्यूची वेळ जशी जवळ आली तसे त्याला आणायला सैतान आला, परंतु आपल्या हुशारीने त्याने सैतानाला चकवून आपले आयुष्य वाढवून घेतले. असे दोन-तीन वेळा झाल्याने सैतान त्याच्यावर रुष्ट झाला व तुला आणायला परत येणार नाही असे वैतागून सांगून निघून गेला.


जॅक’ओ लॅन्टर्न


तरीही एके दिवशी अचानक नकळतच जॅकला मृत्यू आला व आपण स्वर्गाच्या मोतिया रंगाच्या फाटकापाशी उभे आहोत हे त्याला जाणवले. स्वर्गाच्या दारात उभ्या असणार्‍या सेंट पीटरने जॅकला सांगितले, 'तू आयुष्यात एकही चांगले काम केले नाहीस. तुला स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. तेंव्हा तुला बहुधा नरकात जावे लागेल.'

जॅक यानंतर सैतानासमोर गेला. सैतानाच्या मनात जॅकला अद्दल घडवायची असल्याने त्याने जॅकला सांगितले, 'तुला नरकातही प्रवेश मिळू शकत नाही कारण आयुष्यभरात तू कोणाचेही वाईट केलेले नाहीस.'

यावर हिरमुसला होऊन जॅकने विचारले, 'तर मग मी या अंधारात जाऊ तरी कोठे?' यावर सैतानाने जवळ पडलेल्या एका कोरलेल्या पोकळ भोपळ्यात नरकातला पेटता कोळसा घातला व सांगितले, 'जेथून आलास तेथेच परत जा आणि कायमचा अंधारात हा कंदील घेऊन भटकत राहा.'

कधी कधी हॅलोवीनच्या रात्री दूरवर अंधारात अजूनही जॅक दिवा घेऊन भटकताना दिसतो म्हणतात.

अमेरिकेतील हॅलोवीन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील दुकाने हॅलोवीनच्या विविध साहित्यसामुग्रीने भरलेली असतात. यांत नानाविध आकारांचे भोपळे, भोपळ्याच्या आकाराचे प्लॅस्टिकचे कंदील, भयानक मुखवटे व वेष, हॅलोवीनची शुभेच्छापत्रे, आणि या सणाला साजेशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया यांचा समावेश असतो. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी बनावट वटवाघुळे, काळ्या मांजरी, कोळी आणि कोळिष्टके, हाडांचे सापळे अशा अनेक भयप्रद गोष्टी विकायला ठेवतात. या सर्व गोष्टींचे रंग शिशिर ऋतूच्या रंगांशी मिळतेजुळते असतात. जसे, काळा, केशरी, जांभळा, लाल व हिरवा. या काळात घराघरांतून भोपळ्यांची खरेदी होते. 'पंपकिन पीकिंग' म्हणजे भोपळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे भोपळेही खरेदी करता येतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून लहान भोपळे रंगवतात तर मोठे भोपळे कोरून पोकळ करतात. अमेरिकेत या सणाला धार्मिक महत्त्व नाही.

ट्रिक ऑर ट्रिटींगसाठी सज्ज बालकंपनी




३१ तारखेच्या संध्याकाळी ड्रॅक्युला, फ्रॅन्केस्टाईन, ईजिप्शियन ममीज, गॉबलिन्स या खलनायकांप्रमाणे किंवा पर्‍या, राजकुमार्‍या, परीकथांतील नायक इ. प्रमाणे वेषांतर केलेली लहान मुले जवळपासच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावतात व "ट्रिक ऑर ट्रीट" असे ओरडतात. यजमानांनी सहसा "ट्रीट" असे म्हणून या मुलांजवळ असलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये मिठाया टाकायचा रिवाज आहे.(ट्रिक म्हटले असता मुले यजमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात.) गोड खाल्याने मनाला लागणारी हुरहुर, काळजी, चिंता आणि भीती तात्पुरती दूर होते असे सांगितले जाते. ट्रिक ऑर ट्रीटला मिठाई वाटण्याची परंपरा यांतूनच सुरु झाली असावी का काय कोण जाणे.

अमेरिकन कुटुंबात या दिवशीची संध्याकाळ एखादा भयप्रद सिनेमा पाहण्यात, भयकथांचे मोठ्याने वाचन करण्यात किंवा एकमेकांना भयप्रद किस्से सांगण्यात व्यतीत करण्यात येते. या दिवसांत झपाटलेले वाडे, भूतबंगले, स्मशाने यांची सफर या सारख्या भयप्रद मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. सर्व कुटुंबीय मिळून अशा कार्यक्रमाचा आस्वाद लुटतात.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतीय सणांबरोबरच या अमेरिकन सणांची मजा लुटण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. या मागची भावना इतकीच की आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे.


अमेरिकेतील सर्वांना हॅलोवीनच्या अनेक शुभेच्छा!

Monday, October 01, 2007

गूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते. गूढ, थरार आणि रहस्य यांचे सुप्त आकर्षण फार पूर्वीपासून मानवी मनाला वाटत आले आहे. रहस्य उकलण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळेच अनेक शोध लागले आणि संशोधने केली गेली.

गूढ आणि रहस्य हे शब्दांचा भीतीशीही अतिशय घनिष्ठ संबंध आहे. केवळ गूढ या शब्दाचा आयाम पाहिला तर अज्ञात, अनैसर्गिक, अमानवी, अथांग, गहिरे असे अनेक शब्दार्थ डोळ्यासमोर तरळतात. एक प्रसिद्ध वाक्प्रचार म्हणून असं म्हणता येईल की जगात दोन प्रकारची माणसं असतात -- एक, ज्यांना गूढाची उकल करायला आवडते आणि दुसरे, जे या अज्ञातापासून चार हात दूर राहणे पसंत करतात आणि या दोहोंचा संबंध भीतीशी जोडता येतो. पहिल्या प्रकारची माणसे आपली आणि आप्तांची भीतीपासून मुक्तता व्हावी म्हणून रहस्याची उकल करायला धजतात तर दुसर्‍या प्रकारची माणसे अज्ञाताच्या भीतीने रहस्यापासून लांब राहायचे ठरवतात.

गूढकथा लिहिताना मला नेहमी जाणवते की वाचक कथेतून अगदी सहजपणे एका अनैसर्गिक, अमानवी घटकाची अपेक्षा करतात. बर्‍याच लेखकांतर्फे रहस्य, थरार आणि गूढ हे ओंगळ, हिडीस आणि बटबटीत स्वरुपात समोर ठेवले जाते आणि वाचकही प्रत्येक कथासूत्रातून अशाच गोष्टींची अपेक्षा ठेवू लागतो. खरे पाहायला गेले तर भीती ही आपल्याच मनाचा एक भाग असते. तिचा अनुभव घ्यायला पडक्या हवेल्या, स्मशाने, धुक्याने आच्छादलेले रान गाठण्याची काही एक गरज नसते. भीती ही माणसाच्या मनातच वसलेली असते आणि आयुष्यात कधीतरी अचानक ती दत्त म्हणून समोर उभी ठाकते. माणसाला वाटणारी भीती किती प्रकारची असते बघा -- उंचीची भीती, पाण्यात बुडण्याची भीती, अंधाराची भीती, कोंडून घातल्याची भीती, गर्दीची भीती तर कधी एकांताची भीती. एखाद्या लहानशा प्राण्याची किंवा किटकांची भीती तर आपण सर्वच अनुभवून असतो. कधीतरी हे भय मूर्त स्वरुप घेऊन समोर येते आणि त्यातून थरार, रहस्य निर्माण होत जाते.

गूढपटांचा विचार करताना एक ठळक नाव डोळ्यासमोर उभे राहते ते आल्फ्रेड हिचकॉकचे. अतिशय संयत, ओंगळ होऊ न देणारे, क्लासिक चित्रपट निर्माण करणारा सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून हिचकॉक आजही सर्वश्रेष्ठ गणला जातो. प्रणय, रहस्य आणि विनोद यांचे अप्रतिम मिश्रण हिचकॉकच्या चित्रपटांतून उभे राहते. सर्वसामान्य थरारपटांतून येणारे धक्कातंत्र हिचकॉकच्या चित्रपटात सहसा दिसत नाही. अंगावर काटा उभा राहणे, डोळे गप्पकन बंद करावेसे वाटणे, किळस आणि बीभत्स या अनुभूती हिचकॉकपटांत सहसा अनुभवायला मिळत नाहीत. उलटपक्षी, या रहस्यपटांत प्रेक्षक हे केवळ प्रेक्षक न राहता चित्रपटाचा हिस्सा बनतात. त्यांना चित्रपटात काय शोधायचे याची जाणीव करून दिली जाते. बरेचदा चित्रपटातील रहस्य पात्रांना लक्षात येणार नाही परंतु प्रेक्षकांना सहज दिसेल असे मांडले जाते आणि पात्रांकडून रहस्याची उकल कशी होणार या उत्कंठेवर संपूर्ण चित्रपट तरून जातो.

आल्फ्रेड हिचकॉक


स्वत:च्या बायकोच्या खुनाचा कट रचणारे "डायल एम फॉर मर्डर" आणि "स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन"मधील नवरे. चुकीची ओळख पटल्याने गोत्यात आलेले "द रॉंग मॅन" आणि "नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट" मधील कथानायक. स्मृतीभ्रंश झालेल्या गुन्हेगाराच्या प्रेमात पडून त्याला मदत करणारी "स्पेलबाऊंड"मधील मानसोपचारतज्ज्ञ. आपल्याच मित्रांवर हेरगिरी करताना गोत्यात आलेली "नटोरिअस"मधील स्त्रीहेर. उंचावर जाण्यास भिणारा आणि प्रेमात फसवला गेलेला "वर्टिगो"मधील निवृत्त पोलिस अधिकारी, पक्ष्यांच्या भयंकर हल्ल्याने भयचकित झालेले "द बर्डस"मधील कॅलिफोर्नियातील रहिवासी अशा अनेक हिचकॉकिअन अस्सल कथाबीजांवर अगणित हॉलिवूड आणि बॉलिवूडपट येऊन गेलेले आहेत, येतात आणि येत राहतील.

सशक्त कथासूत्रांवर निर्माण केलेले हे चित्रपट आजही मनाला भुरळ घालतात. ज्यांना क्लासिक किंवा मास्टरपीसेस म्हणावं अशा मला आवडणार्‍या काही खास हिचकॉकपटांबद्दल या लेखात थोडी माहिती पुरवायला आवडेल.

१. रिबेक्का: अचानक एका धनाढ्य बिजवराच्या प्रेमात पडून त्वरित लग्न करून मोकळी झालेली एक गरीब, अल्लड युवती आपल्याला या नव्या ऐश्वर्यसंपन्न आयुष्यात सामावता येईल का या शंकेने भयग्रस्त असते. नवरा पहिल्या बायकोला विसरू शकत नाही, नोकरचाकर या पहिल्या पत्नीची अद्याप मनात पूजा करतात आणि संपूर्ण घरावर या मृत स्त्रीचा छाप आहे, एक विलक्षण पगडा आहे हे लक्षात आल्याने ही युवती आपल्या वैवाहिक आयुष्यात दु:खी होऊ लागते आणि त्यात तिला या प्रथमपत्नीचा खून झाल्याचा उलगडा होतो आणि एका दु:खद रहस्याला सुरुवात होते.

१९४० सालच्या या चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने मानांकित केले होते. आजही हा चित्रपट एका जागी बसून पाहावासा वाटतो. या चित्रपटावर हेमंतदांनी विश्वजीत आणि वहिदा यांना घेऊन "कोहरा" हा चित्रपट निर्माण केला होता.

२. द मॅन हू न्यू टू मच: सुट्टी घालवायला आफ्रिकेचा वारीवर निघालेल्या कथानायकाच्या कुटुंबाला बसमध्ये एक अनोळखी माणूस भेटतो आणि त्यांची मैत्री जमते. दुसर्‍या दिवशी भर बाजारात या माणसाचा खून होतो आणि त्याला माहित असलेले रहस्य त्याने नायकाकडे उघड केले असावे या समजूतीतून नायकाच्या मुलाचे अपहरण केले जाते. मुलाला वाचवायला धडपडणारे आणि त्याचवेळी रहस्याचा उलगडा करायचा प्रयत्न करणार्‍या आई-वडिलांची ही कथा अतिशय उत्कंठावर्धक आहे. डोरिस डेच्या खणखणीत आवाजातील "के सेरा सेरा" हे गाणे या चित्रपटाची शान वाढवते.

३. रिअर विंडो: तार्किकदृष्ट्या हा भयपट नाही पण तरीही भीतीशी निगडीत आहे. अतिशय सुस्वरूप प्रेयसी (ग्रेस केली) असणारा आणि तात्पुरते अपंगत्व आलेला एक छायाचित्रकार लग्नाला आणि त्यातून येणार्‍या जबाबदारीला मनातून घाबरत असतो. पाय फ्रॅक्चर झाल्याने दिवसभर खिडकीशेजारी बसून इमारतीतील इतर व्यक्तींना न्याहळण्याची त्याला सवय लागते आणि त्यांचे प्रेमआयुष्य किंवा वैवाहिक आयुष्य कसे कंटाळवाणे आहे यावर तो विचार करत बसतो. लोकांना न्याहाळण्याच्या वेडातून इमारतीतील एका इसमाने आपल्या बायकोचा खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे असा त्याचा ग्रह होतो आणि तो आपला आणि आपल्या प्रेयसीचा जीव धोक्यात घालतो.

या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे प्रसंग मुख्य पात्रांवर चालला असला तरी पार्श्वभूमीवर इमारतीतील दृष्ये प्रेक्षकांना दिसतात आणि नायकासह प्रेक्षक रहस्य शोधण्यात गुंततात, किंबहुना रहस्य उलगडण्यात नायकापेक्षा आपण दोन पायर्‍या वर आहोत ही अनुभूती नक्कीच मिळते.

४. सायको: या चित्रपटाशिवाय हिचकॉकविषयीचा लेख पूर्ण करणे केवळ अशक्य आहे. १९६० साली बनलेला हा चित्रपट आजही पाहताना हृदयाची धडधड वाढते.
सायकोमधील प्रसिद्ध दृश्य


कार्यालयात अफरातफर करून पळालेल्या एक युवतीला एका अंधार्‍या पावसाळी रात्री एक जुनाट मोटेल दिसते. रात्रीपुरता आसरा मिळावा म्हणून ती तेथे एक खोली घेते आणि तिची ओळख नॉर्मनशी, मोटेलच्या मालकाशी होते. नॉर्मनचे या युवतीकडे लक्ष पुरवणे त्याच्या आजारी आईला खपत नाही आणि त्यातून चमत्कारीकरित्या या युवतीचा खून होतो. हा खून आपल्या आईने केल्याचे नॉर्मनच्या लक्षात येते आणि तो खुनाचे पुरावे नष्ट करतो. पुढे या युवतीचा तिच्या कुटुंबीयांकडून शोध सुरु होतो आणि आईला घाबरणारा नॉर्मन गूढात गुरफटत जातो. यातून खून, रहस्याचा अप्रतिम थरार प्रेक्षकांसमोर उभा ठाकतो.

आईच्या संपूर्ण कह्यात असलेल्या आणि सतत तिला भिऊन जगणार्‍या मुलाची ही कथा आणि विशेषत: या चित्रपटातील युवतीचा शॉवर घेताना केला गेलेला खून हा भविष्यातील अगणित चित्रपटांचा भाग बनून राहिला आहे.

स्वत: हिचकॉकबद्दल असं सांगितले जाते की लहानपणी एकदा त्याच्या वडिलांनी त्याला एक पत्र घेऊन पोलिसस्टेशनला पाठवले. ते पत्र वाचून तेथील अधिकार्‍याने त्याला १० मिनिटांसाठी तुरुंगात डांबले आणि त्यानंतर सोडून दिले आणि सांगितले की "वाईट कामांची परिणिती ही अशी होते.” या प्रसंगाचा त्याच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की आयुष्यभर पोलिसांची त्याला भयंकर भीती वाटत असे. या खेरीज, एक विचित्र भीती त्याच्या मनात कायम राहिली आणि ती होती अंड्याची भीती. हिचकॉकच्या शब्दात सांगायचे तर "गुळगुळीत, वर्तुळाकार अंड्यांची मला अतिशय किळस वाटते. रक्त तरी लाल दिसतं पण अंड्याच्या पिवळ्या बलकाची मला इतकी किळस वाटते की मी आयुष्यात तो कधी चाखला ही नाही."

आपल्या गरोदर पत्नीच्या वाढलेल्या पोटाचीही त्याला किळस वाटत असे. हिचकॉकला अंड्याची भीती होती की गुळगुळीत, चकचकीत गोलाकारांची ते कळण्यास मार्ग नाही. या ठीकाणी हिचकॉकचे तुळतुळीत टक्कल डोळ्यासमोर उभे राहते.

रहस्यपटांच्या बादशहाचा शिक्का आपल्या कपाळावरून हिचकॉकला कधीही पुसता आला नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "मी सिंड्रेला चित्रपट निर्माण केला तरी प्रेक्षक कोचावर मृतदेह दिसतो का ते धुंडाळतील.” युद्ध, दहशतवाद आणि प्रगतीच्या वाटेवरील प्रचंड स्पर्धा या सर्वांनी बोथट झालेल्या आजच्या युगातील मानवी संवेदनांना हिचकॉकचे "क्लासिक मास्टरपीसेस" भुरळ पाडतील का हा प्रश्न या चित्रपटांच्या आजवर होणारी नकलेने निकालात निघतो. सर्वश्रेष्ठ गणल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्काराचा मानकरीही हिचकॉक कधी ठरला नाही पण रहस्यपटांचा बादशहा म्हणून आजही तो जनमानसांच्या हृदयात स्थानापन्न आहे.

marathi blogs