प्रकार

Monday, March 12, 2007

सवयींचे गुलाम

हल्लीच एक गोष्ट लिहायला घेतली असताना त्यातील पात्राच्या तोंडी 'मला तिची सवय झाली होती.' असे वाक्य टाकायचे होते. सहज मनात विचार आला की "सवय" या शब्दाची व्याख्या कशी करता येईल? मला वाटतं त्यानुसार, एखाद्या सुखावणार्‍या, उत्तेजीत करणार्‍या किंवा दुखावणार्‍या, बोचणार्‍या, सलणार्‍या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया थंडावते त्यावेळेस आपण आपल्याला त्या गोष्टीची सवय पडली असे म्हणतो. याचबरोबर एखाद्या बोचणार्‍या, डसणार्‍या, सलणार्‍या गोष्टींविरूद्ध मनाने शोधलेला विरोधाचा मार्ग म्हणजे सवय लागणे.

आपल्या समजूतीनुसार आपण एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरवत असतो उदा. मला बाहेर जाताना परफ्यूम फवारण्याची सवय आहे आणि मला ती आवडते. बाहेर जाताना हात आपसूक परफ्यूमच्या कुपीकडे वळतात, अर्थातच माझ्यामते ती चांगली सवय आहे. माझ्या लेकीच्या मते, "मम्मा! वॉलमार्टात जायला परफ्यूम कशाला लागतो? कसली ही सवय?" तिला माझी सवय नेहमीच आवडते असे नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या वाटणार्‍या सवयी दुसर्‍याला चांगल्या वाटतीलच असा नेम नसतो. सवयीचेही एक गणित आहे. सवय लागणे हे ती सवय घालवण्याच्या मानाने फार सोपे असते.

सवयीचेही वेगवेगळे प्रकार असतात की काय याचा थोडासा विचार करत असता एका मित्राने बोलताना मला सुचवले की 'बघ! सवयीने स्वयंपाक चांगलाही होऊ शकतो.' मला सवयीचा पहिला प्रकार मिळाला. 'अंगवळणी पडणे', एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील खाचाखोचा कळून आपल्यात सुधारणा करणे किंवा तशी सफाई कळत-नकळत येत जाणे. हा सवयीचा प्रकार माणसाला अचूकतेच्या जवळ नेतो म्हणून चांगला म्हणावा लागेल तर कधीतरी तो माणसाला यांत्रिकही बनवू शकतो, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील नाविन्य, आवड संपून, ती गोष्ट कोणतेही नवे बदल टाळून उरकूनही टाकली जाते. दुसरा प्रकार मिळाला तो म्हणजे लकब; हा शब्दही सवयीशी मेळ खातो. एखाद्या अभिनेत्याची लकब जशी देव आनंदच्या हाता, खांद्यातील त्राण निघून गेल्यागत हालचाली. लकब हा शब्द सहसा एखाद्या वाईट सवयीसाठी वापरला जातो. जसे केसांवरून सतत हात फिरवण्याची सवय, नाक उडवायची सवय. सवयीचा तिसरा आणि बरीचशी नकारात्मक बाजू दाखवणारा शब्द म्हणजे चटक आणि चाळा. हे दोन्ही शब्द नकारात्मकता दाखवतात.

सवयीचा सर्वात नकारात्मक आणि धोकादायक प्रकार असावा व्यसन; मध्यंतरी मुक्तांगणावरील 'आहे हे असं आहे' या अनुदिनीवरील काही वाचनीय लेख, पुण्यातील रेव पार्टी, सिनेकलावंतांची अनेक प्रकरणे हे सर्व वाचनात आले तेव्हाही सवयीवर काही लिहावेसे वाटले होते. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यास माणसाला वेळ लागतो परंतु वाईट सवयी लवकर लावून घेता येतात यावरून सवयीची वर केलेली व्याख्या बरोबर असावी असे वाटते. धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी मनुष्य फार चटकन जातो परंतु या सवयी सोडायला मात्र बराच काळ लागतो किंवा इतरांची मदत लागते. इतके करूनही जर मनावर ताबा नसेल तर ही व्यसने पुन्हा पदरी पडण्याची शक्यता बळावते.

वर उल्लेखल्याप्रमाणे माझ्या या गोष्टीतील नायकाला ज्या स्त्रीची सवय झाली होती, ती त्याला सोडून गेल्याने तो खोलवर कोठेतरी दु:खी आहे. माणसांची सवय व्यसनांप्रमाणेच घातक असते. एखादी रोज दिसणारी, रोज भेटणारी, घरातील व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिण यांच्या वियोगाने माणसाच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी वेडापिसा झालेला जीव कोणतीतरी दुसरी घातक सवय स्वत:ला लावून घेण्याची शक्यता अधिक असते.

या सर्वावर काही उपाय असावा का हा मनातील पुढचा विचार. प्रत्येक मनुष्य येन केन प्रकारेण सवयींचा गुलाम असतो. सवय कधीतरी सोडून जाण्यापेक्षा माणसालाच स्वत:बरोबर फरफटत घेऊन जाते अशा सवयींपासून कालांतराने फारकत घेणे कधीही फायद्याचे असते.मनाचा निग्रहच या सवयी सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. माणसांची सवय विसरणे थोडेसे कठिण असले तरी काळासारखे उत्तम औषध नाही हेच खरे. तो काळ जाऊ देणे आणि मनाला एखाद्या चांगल्या सवयीत गुंतवणे कधीही उत्तम.

मध्यंतरी एका व्यक्तीने माझ्या अनुदिनीवरील 'आयुष्य आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.' हे वाक्य उचलण्याची परवानगी मागितली होती. असाच मनात आलेला एक विचार म्हणून ते वाक्य मी अगदी सहज तेथे टाकले होते पण ते कोणाला तरी समर्पक वाटेल असे वाटले नव्हते. सवयींच्या संदर्भातही हे वाक्य चपखल बसू शकते. कधीतरी इतरांना आणि स्वत:लाच जाचक ठरणार्‍या सवयी आपण लावून घेतो आणि त्याचा त्रासच आपण स्वत:ला आणि इतरांना करून घेत असतो, अशा जाचक सवयींतून मुक्त होणे अवघड असेल परंतु त्या मुक्ततेत एक वेगळाच आनंद असावा.

Friday, March 02, 2007

आम्ही मराठी

मध्यंतरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांचा लेख वाचण्याचा योग आला. वाचताना मनात अनेक विचार येऊन गेले. यावर एके ठिकाणी विस्तृत लेख लिहावा असे मनात होते, त्यानिमित्ताने काही विस्कळीत विचार मांडत आहे. माझ्या अनुदिनी मित्रपरिवाराकडून काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ज्यामुळे या लेखाची अंतिम बांधणी करणे सोपे जाईल.

मराठी विश्वाकडून बरेचदा नव्या पिढीला मराठीशी बांधून ठेवणे अशक्य होत आहे, नवी पिढी मराठीची हेटाळणा करते, परदेशी गेलेल्या मराठी माणसांनी मराठी भाषेशी आपली नाळ तोडून टाकली आहे असा सूर बरेचदा ऐकू येतो. यांत १००% म्हणता आला नाही तरी मोठ्या प्रमाणात तथ्यांश आहे. विशेषत: अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांचा सहवास मला घडतो आणि मातृभाषेबद्दल त्यांच्या मनातील औदासिन्य कोठेतरी हृदयाला बोचते.

आपल्या मातृभाषेबद्दल एक प्रकारचा तिरस्कार केवळ आपण भारतीयच बाळगतो की काय ते कळत नाही परंतु मातृभाषा शिकून फायदा नाही, नव्या पिढीला कोठे मातृभाषा लिहिता वाचता येते, करायचे आहे काय तिचे संवर्धन करून? असा कोठे भविष्यात मातृभाषेचा उपयोग होतो आपल्याला? असा विचार करणारे सर्वत्र आढळून येतात. केवळ मराठीचा विचार करताही आपल्या मराठी समाजात अशीच भावना रूजत असल्याचे दिसते. इंग्रजीच्या तोडीस तोड उतरून मराठी पैसे मिळवून देऊ शकेल का? असा प्रश्न बर्‍याचजणांना पडतो.

या आणि अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे काय द्यावीत याचा विचार केला असता; मराठी ही माझी मातृभाषा आहे, कळायला लागल्यापासून मी ती बोलते/तो आहे. माझे आई-वडिल, मित्रमंडळ, नातेवाईक मराठीच बोलत होते/ बोलतात. तिला इतिहास आहे, व्याकरणदृष्ट्या ती सक्षम आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजकालच्या तरूण लेखक- लेखिकांपर्यंत वाचण्यासारखे, त्यातून शिकण्यासारखे, मंथन करण्यासारखे मराठीत मुबलक साहित्य आहे, मराठी माणसे गुणी आहेत, मराठीचे संवर्धन करण्याची त्यांची योग्यता आहे आणि म्हणून मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, माझी भाषा राहिली पाहिजे. आपल्या मातृभाषेबद्दल बेफिकिर, बेजबाबदार किंवा न्यूनगंडपिडीत राहण्यात कोणताही मोठेपणा नाही.

साधूंनी या लेखात म्हटल्याप्रमाणे मातृभाषेबाबत बेफिकिरी दाखवण्याचा हा प्रश्न जगात बहुधा सर्वांनाच भेडसावत असावा. जगाच्या बाजारात टिकाव धरायचा तर इंग्रजीला पर्याय नाही परंतु जर ज्ञानभाषा आणि मातृभाषा अशा दोन्ही भाषांचे संवर्धन जर आपण सारख्या प्रेमाने केले तर यांत नेमके नुकसान कोणते? अमेरिकेत राहून कधीतरी लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे मी कधीही चिनी आई-वडिलांना आपल्या मुलांशी खाजगीत इंग्रजी बोलताना पाहिलेले नाही. ते व्यवस्थित हेल काढून आपली मातृभाषा बोलतात. अनेक युरोपीयही आपल्या मुलांशी खाजगीत मातृभाषेतून बोलतात, याविरुद्ध भारतीय माणसे सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आपापसात आपल्या मुलांशी इंग्रजीत संभाषण करण्यात धन्य मानतात. का ते त्यांचे तेच जाणोत. अर्थात यात चुकीचे काहीच नाही परंतु नेमके बरोबर तरी काय असावे?

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी मुले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात. त्यांचे विचार अधिक परीपक्व असतात, त्यांची आकलनशक्ती इतरांपेक्षा खचितच अधिक असते. भारतीय आणि इतर आशियाई देशांतील मुलांची प्रगती पाहता या विधानावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे.

जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत असता शर्यतीतून कधीतरी मराठी पाठी पडली. तिला दुर्लक्षित ठेवण्यास जबाबदार आपणच आणि ती दुर्लक्षित ठेवण्यात धन्य मानणारेही आपणच. गेले वर्षभर मी नेटाने मराठीत लिहित असल्याने भारतीय आणि परभारतीय मराठी वाचक मराठीला कसा तगवून आहे याची बरेचदा प्रचीती आली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हे करण्यात परदेशांतीलच अनेक मराठी माणसांचा सहभाग आहे. इंटरनेटवरील जोमाने वाढणारी संकेतस्थळे, अनुदिनी (blogs), वर्तमानपत्रे पाहिली की मराठी भाषेचा र्‍हास होत आहे ही ओरड मिथ्या वाटू लागते. आजमितीला मराठीत दरवर्षी दीड दोन हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जात असतील तर त्यांना वाचकगण आणि खप असणारच, याचा मनाला आनंद होतो. परदेशातूनही मराठी मंडळांतर्फे निघणारे मराठी अंक मराठी भाषा तगवून ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु लक्षपूर्वक पाहिले असता २०-२५ वयाच्या दरम्यानची तरूण पिढी अभावानेच लेखन करताना आढळते, या विसंगतीचा कोठेतरी विशाद वाटून जातो. नव्या पिढीबरोबरच आपल्या मातृभाषेपासून त्यांना वंचित ठेवणार्‍या आणि तिच्याविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही न करणारे पालकही या अनास्थेस जबाबदार आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच पाहण्यात आलेला ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभातील एनिनो मोरोकोनी या जगप्रसिद्ध इटालियन संगीतकाराचे उदाहरण द्यावेसे वाटते. The good, the bad and the ugly ची सुप्रसिद्ध धून इतर अनेक चित्रपटात मोहवून टाकणारे श्रवणीय संगीत देणार्‍या या ज्येष्ठ कलाकाराने ऑस्करच्या व्यासपीठावर आपले भाषण इटालियन भाषेत केले. इंग्रजी न बोलल्याची खंत किंवा लाज त्याच्या चेहर्‍यावर आणि प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर कोठेही नव्हती. आपला पुरस्कार त्याने आपल्या पत्नीला समर्पित केल्यावर त्या दोघांच्या डोळ्यांतील भावना लाखो प्रेक्षकांपर्यंत नेमक्या पोहोचल्या. आपले कलागुण दाखवण्यासाठी इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेची गरज नक्कीच आहे परंतु आपली मातृभाषा कोणत्याही प्रकारे आणि ठिकाणी कनिष्ठ दर्जाची नाही हेच यातून दिसले.

यावर्षीच्या मंडळाच्या अंकाच्या संपादनात मदत करताना मला अनेक लोकांचे विचार आणि भावना कळल्या. कोठे उत्साह दिसला तर कोठे औदासिन्य, परंतु अनास्थेचे प्रमाण उत्साहाच्या प्रमाणापेक्षा फार मोठ्या प्रमाणात होते हे नमूद करावेसे वाटते. या संमिश्र भावनांतून मनात आलेले विचार येथे मांडले आहेत.

marathi blogs